BLOG : अधिवेशन काय साधणार?

0

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सोमवारपासून सुरू झाले. अलिकडे अधिवेशनामध्ये साधक-बाधक चर्चेऐवजी आरडाओरड आणि भरकटलेल्या चर्चा अधिक झडतात. राज्याची काळजी वाहणारे काळजीवंतांचे सभागृहातील वागणे अनेकदा क्लेषदायक ठरते. त्यामुळे यावेळी काय घडणार, याची उत्सुकता आहे. भाजपा-सेनेतील बेबनाव आधीच चर्चेत होता. अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांतही फूट पडल्याचे समोर आल्याने सभागृहात केवळ रणकंदनाचे नेपथ्य तयार झाले आहे. शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदी, बिघडलेली कायदा-सुव्यस्थेची स्थिती आणि राज्य भाजपाचे असले तरी होणारे घोटाळे असे गंभीर मुद्दे अधिवेशात गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र हे मुद्दे गाजत असताना त्यावर काही उपाय शोधले जातील की निव्वळ गाजावाजा अधिक होणार? शेतकरी कर्जमाफीच्या मागणीनंतर राज्यातील आंदोलनाने सरकारी झोप उडवली होती. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करत, वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर कर्जमाफीसाठी अनेक क्लिष्ट निकष आणि तत्वत: वगैरे सारखे शब्द वापरत, या योजनेबद्दल खुद्द सरकारनेच संशय निर्माण केला. पुढे विविध प्रकारच्या नियम बदलांनी खरेच कर्जमाफी मिळणार आहे का, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. याच मुद्यावरून गेले काही दिवस विरोधक सरकारला हैराण करत आहेत. मात्र अलिकडे यातील हवाही गुल होताना दिसते. विरोधकांमध्येच आता विविध मुद्यांवर एकमत नसल्याचे समोर येत आहे. अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र पत्रकार परिषद घेवून सभागृहात विरोधकांचे तोंडही विरुद्ध दिशेला असेल, याची जाणीव करून दिली आहे. अर्थात याचा फायदा सरकारला होणार आहे. विरोधकांचा जोर ओसरला तर सरकार निवांत होणार, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे शिवसेना अद्यापही भाजपाला डोळे दाखविण्याचे काम करते. समृद्धी महामार्गावरून सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. शेतकरी कर्जमाफी आणि समृद्धी महामार्ग या दोन विषयांवर सत्ताधारी असलेल्या सेनेची भुमिका भाजपापेक्षा वेगळी आहे. सेनेच्या या विरोधाची हवा काढून घेण्यासाठी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाने विरोधी पक्षात घडवून आणलेली मतफूट सेनेला सभागृहात किती शांत बसवू शकते, याकडेही लक्ष असेल. विरोधकांचे फुटलेले 11 आमदार एकप्रकारे सेनेलाही इशारा मानला जातो. सरकार कार्यकाळ पुर्ण करेल. मदतीसाठी अनेक अदृश्य हात तयार आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. याचा रोख सेनेकडेच होता. त्यामुळे सरकारवर विरोधकांपेक्षा अधिक तीव्र हल्ले करणार्‍या सेनेच्या सभागृहातील भुमिकेकडे लक्ष असेल. पण या गदारोळात जनतेच्या प्रश्‍नांकडे दर्लक्ष करत केवळ राजकारण साधले जावू नये, एवढीच अपेक्षा!

LEAVE A REPLY

*