Type to search

Breaking News नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : उसाच्या रसाची मिशी आणि गोंडस चिमणी

Share

मी आणि माझ्या मैत्रिणींचा जेवणाच्या वेळेतला रोजचाच कार्यक्रम म्हणजे, ‘ऊसाचा रस प्यायला जाणे..’ नेहमीप्रमाणे आज रस प्यायला गेलो.

रसवंती गृहात प्रवेश केल्यानंतर भैयाला ऐटित ऑर्डर सोडली, ‘भैया 3 हाल्फ देना जरा…!” बाकड्यावर येऊन बसलो. शेजारी एक गोंडस 4-5 वर्षांची चिमुरडी तिच्या आईसोबत रस प्यायला आलेली होती.

आमचा ताजा-ताजा रस निघत होता मशिनमधून. भैयाने त्या शेजारच्या चिमणीच्या आईच्या हातात तिच्यासाठीचा रस दिला. तिला तिच्या आईन रस पाजायला ग्लास ओठांना लावला.

तर त्या चिमणीने तो ग्लास स्वतःच्या हातात घेतला आणि बोलली की, ‘आई..तू रस पाजते तेव्हा मला मिशी येत नाही… मीच पिते माझ्या माझ्या हाताने..!’

तिच्या आईने हसून तो ग्लास तिच्या हातात दिला. आम्हीही हसलो तिच्या आईकडे बघुन. आम्हीही रस पित होतो. तेवढ्यात मँडम बोलल्या, आई, पण या रसाला फेसच नाही..!

मला मिशी कशी येईन..? आम्ही खुप हसलो. चिमणीच्या आईने ग्लास थोडा गोलाकार हलवला आणि बोलली, ” हं… पी बर आता.. मोठी मिशी येणार मग माझ्या माऊला..!”

माऊताईंची स्वारी खुष झाली. हळु-हळु ओठांनाच ग्लास टेकेन एवढ्या हुशारीने माऊने रस प्यायला सुरूवात केली. माऊताईंनी रस पिता-पिता मधेच आईला अगदी हाताचे बोट दाखवून बजावले, ‘पण मला मोठी मिशी आली तर ती घरी जाईपर्यंत पुसायची नाही हं…!” माऊच्या आईने हात जोडून सांगितले, ‘नाही पुसणार गं, माझी राणी…

चल आवर आता लवकर..आमचा रस पिऊन संपला पण मी माऊताईंना कशी मिशी येते ते बघण्यासाठी तिथेच थांबले. आणि अशाप्रकारे नखरे करत करत माऊताईंचा रस पिऊन संपला.

माऊताईंनी तोंडाचा “शुळुsssक” असा आवाज करत हवा आत घेतली आणि डोळे अगदी मांजरीसारखेच बारीक करत आईला विचारलं, “कशी आहे माझी मिशी..?” आई उत्तरली अगदी मस्त..!”

आईने अगदी खळखळून हसून उत्तर दिले. माऊताई ऊसाच्या रसाच्या फेसाने आलेली मिशी सांभाळत बाकड्यावरून अलगद खाली उतरल्या आणि आईचा हात धरून घराच्या वाटेने अगदी ऐटीत निघाल्या.

आम्ही मिशीवाल्या माऊताईंसाठी अगदीच कौतुकाने हसलो आणि आँफिसच्या दिशेने निघालो. जातांना आपल्या मराठी भाषेतल्या प्रसिद्ध अलंकाराची सय झाली.

‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…!’ ‘रम्य ते बालपण…!’ असं म्हणतात.. ते याहून रम्य ते काय अशणार..? माऊताईंना त्यांचा ऊसाच्या रसाच्या फेसाच्या मिशीचा किस्सा कितपत आठवणीत राहीन माहित नाही.. पण, माऊताईंच्या आईला तिच्या माऊचं हे मिशीवालं बालपण किती रम्य होतं हे निश्चितच स्मरणात राहणार हे नक्की…!

  • सुजाता देशमुख-काटे, नाशिक
  • Sujatadeshmukh15@gmail.com
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!