BLOG : नाट्य ‘मामा’यण!

0

मामा गेले, अन नाट्य चळवळ पोरकी झाली.

प्रा. मधुकर तोरडमल यांच्या निधनाने नगरसह राज्याच्या नाट्य चळवळीत अशा प्रतिक्रिया उमटल्या. हक्काने कान उपटणारा, अन चुकणार्‍याला पाठीत छडी मारणारा हा कडक शिस्तीचा प्राध्यापक. त्यामुळे सर्वार्थाने कलावंतांवर त्यांचा धाक. त्यांची करडी नजरच सहकलावंताला घायाळ करायची, तितकेच मायाळू. पणकधी कोणाची कातडी सोलतील सांगता यायचं नाही. नवखी मंडळी त्यांच्यापासून वचकून राहत, असे असले तरी ते सर्वांचे आदराचे स्थान.

मराठी रंगभूमीवर त्यांनी 1970 आणि 80चं दशक गाजवलं. आपल्या वकुबाच्या जोरावर त्यांनी नाट्यक्षेत्रात वेगळा पायंडा पाडला. सीना नदीकाठचा हा कलावंत समाजातील काळी बेटं हातात लाल बत्ती घेऊन दाखवित राहिला. नगरी कलावंतांची संकुचित मानसिकता आहे. ती सोडली तरच तुमचा भविष्य काळ उज्ज्वल, असं ते वडिलकीच्या नात्याने सांगायचे. ते रंगभूमीवरील भीष्माचार्य होते. आत्मविश्‍वास, आपली माणसं, बाळा, गाऊ कशी अंगाई, राख, सिंहासन, या चित्रपटांसह तरूण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकातून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. त्यांची सर्वाधिक स्मरणात राहिली ती म्हातारे अर्कमधील प्रा. बारटक्केची भूमिका. अभिनयासह त्यांनी लेखन, अनुवादक, निर्माता म्हणूनही मुशाफिरी केली. मामांच्या मोठेपणाचे बीजारोपण झाले होते ते अहमदनगर महाविद्यालयात प्राध्यापकीत. त्याही पूर्वी म्हणजे मराठी शाळेत असताना त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले होते.

राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी केलेले काळं बेट, लाल बत्ती कमालीचं गाजलं. तरूण तुर्कचे पाच हजार प्रयोग झाले. या नाटकावर समीक्षकांनी त्या काळी टीकेची झोड उठवली होती. महिलांना हे नाटक बघण्यालायक नाही. असा त्यांचा अभिप्राय होता. पण झाले उलटेच. अभिजन वर्गातील महिलांनी थिएटर्समध्ये नाटकासाठी तोबा गर्दी केली. नाट्यक्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्यांनी वेळोवेळी कडाडून प्रहार केला. नगरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात त्यांनी नाट्य परिषदेलाच लक्ष्य केलं. ‘भोजनभाऊंचा अड्डा’ अशी परिषदेची संभावना केली. ती तत्कालीन अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांच्या जिव्हारी इतकी जिव्हारी लागली की त्यांनी नगरमध्ये अन्नत्यागच केला.

दिवसभर ते केवळ पाणी पिऊन राहिले. मामांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे हे संमेलन बारगळते की काय या भीतीने आयोजकांच्या पोटात गोळा उठला होता. पण खासदार दिलीप गांधी, सतीश लोटके यांच्यासह आयोजकांनी ती वेळ येऊ दिली नाही. इतर ठिकाणी संमेलने झाली पण नगरच्या संमेलनाची आठवण सगळीकडे निघत राहिली.

तिसरी घंटा या आत्मचरित्रातून मामांनी आपला अभिनय प्रवास मांडलाय.. उत्तर मामायण या पुस्तकातूनही मामा उलगडत जातात. त्यांच्या पश्‍चात मिलिंद शिंदे, कामोद खराडेसारखे कलाकार चंदेरी पडद्यावर चमकत आहेत. ख्वॉडा, रूपयाचे दिग्दर्शक त्यांच्या लाईनमध्ये आहेत. मात्र,या सर्वांना मामांची लाल बत्ती प्रकाशवाट दाखवित राहील.

LEAVE A REPLY

*