BLOG : बजाओ टाली…!

0

भारनियमनात पोळणार्‍या जनतेला दिलासा देण्यासाठी काय काय होत आहे बघा! कोणी आंदोलन करतोय, कोणी मोर्चा काढतोय तर कोणी घोषणा करतोय! यात काही थापाही आहेतच! जनतेला होणार्‍या त्रासाने सरकारचे काळीजही द्रवले. आता शहरी भागाला भारनियमनातून वगळून खेड्यांना अंधारात ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे खुद्द उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून टाकले आहे. यापुढे दररोज 16 तासांचे लोडशेडींग असेल. फक्त शहरात माणसे राहतात, हा आघाडी सरकारमध्ये असलेला समज या सरकारमध्येही कसा पाझरला, त्याचे हे उदाहरण! तशीही भाजपाची व्होटबँक फक्त शहरांत राहते, असा आरोप होतच असतो. आताचा निर्णय त्याअर्थाने राजकीयच म्हणता येईल. आघाडीच्या राज्यात भारनियमन असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तावातावाने बोलायचे? त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सरकार बदल हा त्यावरचा उपाय, हे त्यांचे तेव्हाचे सांगणे. सरकार बदलले पण जनतेच्या जीवनात काय बदल घडला? ऐन दिवाळीत घडत असल्याने रोष अधिक वाढला आहे. गंमत तर नगर शहरात झाली. काल-परवा सेना-राष्ट्रवादीने एकाच दिवशी आणि एकाचवेळी भारनियमनाविरूद्ध आंदोलन करून कमाल केली. त्यावर शहर भाजपाने कळस चढवला. वीज निर्मिती आणि वितरण हे राज्य सरकारचे कार्य! आता भारनियमन सुरू आहे, त्याला भाजपा सरकारचेच नियोजन कारणीभूत! तरीही जनतेची अतीव काळजी असल्याने शहरातील भाजपाने आपल्याच सरकारने पाडलेला अंधार दूर करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. दिवाळीत भारनियम करू नये. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा त्यांचा महावितरणच्या अधिकार्‍यांना सल्ला! या सल्ल्यावर या अधिकार्‍यांना नक्कीच गलबलून आले असणार! भाजपाच्या या काळजीवंतांनी जनतेचा हा त्रास आपल्या सरकारपर्यंत पोहचवणे अपेक्षीत होते. पण ते वीज द्या म्हणून महवितरणच्या अधिकार्‍यांशी भांडतात. जनतेच्या पाठीशी उभे आहोत, हा देखावा उभा करण्याचा प्रयत्न असला तरी यातील खुजेपण जनतेच्या नजरेतून सुटण्याची शक्यता धूसर! आपल्यास सरकारने वीजेचा केलेला बटट्याबोळ असा उघडपणे कबूल करण्याच्या धाडसासाठी शहर भाजपाचे कौतुक करावे की आगामी निवडणुकांच्या तोंडावर विरोधीपक्ष वरचढ ठरू नये, यासाठी केलेला कावा म्हणून याकडे पहावे, असा प्रश्‍न पडला आहे. कहर तर पुढे झाला. भाजपाच्या या आंदोलनानंतर म्हणे दिवाळीत शहर वीजेच्या प्रकाशात न्हावून निघणार आहे. त्या काळात अजिबात भारनियमन होणार नाही. हे ऐकताच आंदोलनासाठी गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. तिकडे मंत्री बावनकुळे काय आणि इकडे शहरातील पदाधिकारी काय, त्यांना आता भारनियमनाचे चटके बसणार याची जाणीव झालेली दिसते. भारनियमनावर लवकरच उपाय सापडला तर बरा! अन्यथा यापुढे ज्या टाळ्या वाजतील त्यामुळे राजकीय त्रास वाढेल, हे सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी ध्यानात ठेवावे!

LEAVE A REPLY

*