BLOG : डाव्यातील ‘उजवा’!

0

सांप्रत काळी नरेंद्र मोदी नावाच्या झंझावातापुढे सर्वांनीच शरणागती पत्करलीय. पुरोगामी विचारधारा आणि बलाढ्य संघटन असलेला काँग्रेस अजून पराभवातून सावरलेला नाही. तिथे प्रादेशिक पक्षांची काय कथा? डाव्यांकडे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते असतील. पण त्यांनी आपला पिंड सोडलेला नाही. इतरांचे पोट भाकरीने भरत असेल पण डाव्या विचारांच्या कार्यकत्यार्र्ंची भूक विचाराने भागते. त्यांच्या अंगातील कुर्ता-पायजमा अन् खपाटीला गेलेल्या पोटाकडे पाहून कोणीही हे निरीक्षण नोंदवेल. पोटाचं खळगं नाही भरलं तरी चालेल पण बौध्दिक खुराक मिळाला पाहिजे. हाच त्यांचा आजवरचा शिरस्ता. मात्र, मुळाला धक्का न लावता कन्हैयाकुमारसारख्या तरुणाने सर्व डाव्यांना ‘उजवं’ करून टाकलंय! परिणामी ‘उजव्यां’च्या डाव्या बाजूची धडधड वाढवलीय. कारण काय तर राजकीय 

विश्‍लेषकांना त्याच्यात मोठा नेता दिसायला लागलाय. या तरुण डाव्याचं हे ‘उजवं’पण देशभरात उठून दिसायला लागलंय. सांप्रदायिक पक्षांतील तरुणही त्याच्या भाषणाने भारावलेत. त्याच्या कॅम्पेनचा देशभर असाच सिलसिला सुरू राहिला तर कारवा बनेल. याची भीतीही मोदीसमर्थकांना सतावतेय.

अगदी अलीकडे म्हणजे नव्वदीच्या काळात उदयाला आलेल्या पक्षातील कार्यकर्ते ऑडी, फॉर्च्युनरसारख्या अलिशान गाड्यांमध्ये फिरताना दिसतात. बापूजींच्या विचारांच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केव्हाच साधेपणाला हरताळ फासलाय. मुळात त्या पक्षात किती कार्यकर्ते उरलेत हा संशोधनाचा विषय. त्यामुळे सतरंज्या उचलायच्या कोणी? हा त्या पक्षातील धुरिणांना पडलेला प्रश्‍न. गावपातळीवर काम करायला कोणीच तयार नाही. सर्वच प्रस्थापित पक्षांतील हे चित्र. या उलट स्थिती डाव्यांची. सगळा भर कार्यकर्त्यांवर. मात्र पोटाला चिमटा घेऊन वंचितांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार्‍यांच्या या पक्षात आता एका उजव्याचा जन्म झालाय. त्याने डाव्यांना उजवे बनविण्यासाठी लाँग मार्च काढलाय. कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत निघालेल्या या लाँगमार्चला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून उजव्यांच्याही डाव्या बाजूला धडधडायला लागलयं!
या लाँगमार्च दरम्यान कन्हैयाकुमारची अहमदनगरला सभा झाली. त्या सभेने सगळे राजकीय परिमाण बदलून टाकलेत. आणि प्रत्येक ठिकाणच्या सभेत त्याची व्याप्ती वाढतेय. विचाराने पोट भरत नाही, हा विचार केव्हाच गाडला गेला असला तरी या कॉलेजस्टुडंटचे विचार ऐकण्यासाठी प्रत्येक शहरात गर्दी उसळतेय. त्यात पुरोगामीच नव्हे तर हिंदुत्वादीही मोठ्या प्रमाणात सभेसाठी जमताहेत. जे राजकीय अडचणीमुळे आले नाहीत त्यांची गरज डाव्यांचे नवे शिलेदार कन्हैयाकुमारचे भाषण फेसबुकवर लाईव्ह करून भागवत आहेत.
कन्हैयाकुमार जेएनयूचा पीएच.डी.चा स्टुडंट. त्याच्यावर देशद्रोही वक्तव्य केल्याचा पोलीस यंत्रणेने ठपका ठेवला. नंतर कन्हैयाकुमारने तसे भाषण केलेच नाही, असाही रिपोर्टही दिला. या एका घटनेने कन्हैयाकुमारला हिरो केलं, असं म्हणणं त्याच्यातील प्रतिभेची अन् बंडखोरवृत्तीची हेटाळणी केल्यासारखं होईल. त्याच्या ओठावर अजून नीट मिशाही फुटल्या नाहीत तरी तो थेट पंतप्रधान मोदींना शिंगावर घेतो. आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पूर्वसुरींची थेट भेकड म्हणून संभावना करतो. अशा बंडखोराची सभा नगरमध्ये होते म्हटल्यावर सर्वांच्याच नजरा लागणे साहजिकच होतं.
आपल्या देवतूल्य पंतप्रधानांवर थेट तोफ डागणार्‍याचा समाचार न घेते ती भाजपा कसली. स्वतः बडे कोणी सामोरे न जाता युवा मोर्चाच्या पाच-दहा कार्यकर्त्यांनी चार-दोन घोषणा देत निवेदन देऊन विरोध केला. विरोधाची धार चढवून सभा उधळून लावली तर अँटी पब्लिसिटी होईल, अशी कूजबूज त्यांच्या गोटात होती. त्यामुळे त्यांनी आवरतं घेतलं. मात्र, या विरोधामुळे सर्वत्र मेसेज गेला. या पार्श्‍वभूमीवर सभेला परवानगी मिळेल का? ती मिळालीच तर गर्दी होते की नाही याचीही चिंता आयोजकांना लागून राहिली होती. ऐनवेळी परवानगी मिळाली अन् तुफान गर्दीही झाली. या दर्दी गर्दीला कन्हैयाकुमारने आपल्या वाक्चातुर्याने जिंकलं. यामुळे सभेपूर्वीचा आयोजकांच्या चेहर्‍यावरील चिंतेची जागा समाधानाने घेतली. ते गंगेला देवी मानतात की नाही हा भाग वेगळा. पण घोडे गंगेत न्हाल्याची भावना प्रत्येकाच्या तोंडून उमटली.
कन्हैयाने आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं असलं तरी त्याने संपूर्ण भारतीय समाजजीवन, अर्थकारण, निवडणुकीचे राजकारण असा लसावी-मसावी काढला. त्यामुळे त्याच्या विद्वत्तेची जाणीव पुन्हा एकदा झाली. पंतप्रधान मोदींच्या एकाधिकारशाहीची चर्चा विरोधक नेहमी करीत असतात. मात्र, त्यांना कन्हैयासारखं कोणी थेट अंगावर जाऊन आव्हान देताना दिसत नाही. काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी मोदींवर केलेली प्रत्येक टीका टिंगलीवारी नेली जाते. लालूप्रसाद छापासत्र आणि सरकार गेल्याने गलितगात्र झालेत. अरविंद केजरीवाल यांना दम लागलाय. शरद पवारांचा विरोध सोयीसोईने सुरू आहे. मुलायमसिंग यादव गृहकलहात बेजार झालेत. मायावतींच्या विरोधाला धार उरलेली नाही. अखिल भारतवर्षात कन्हैयाकुमार नावाच्या विद्यार्थ्याने मोदींवर बॉम्बफेक सुरू केलीय. त्यामुळे त्याला ग्लॅमर आलेय. तो सेलिब्रेटी बनलाय. मात्र, हे वलय मिळवण्यासाठी तो थोडा उजवीकडे झुकलाय.
मुळात डावे नेते प्रसिद्धीपासून चारहात लांब राहणारे. मोदी अँड कंपनीची सारी भिस्त मीडियावर. खास करून सोशल मीडियावर. डाव्यांच्यादृष्टीने आतापर्यंत क पदार्थ असलेली ही माध्यमे. परंतु सांप्रदायिक शक्तींपासून आजादी मिळवण्यासाठी कन्हैयाकुमारच्या टीमने या भांडवलशाहीच्या युगात चंगळवादी व्हॉटसअ‍ॅपादी साधनांचा अंगिकार करून मोदीविरोधाचा आवाज जगभर पोहोचवला. महागड्या गाड्यांतून प्रवासही त्यांच्यासाठी वर्ज्य. कन्हैयाकुमार मात्र, बड्या गाडीतून फिरतोय. त्याच्याभोवतीचं बॉडीगार्डचं कडं सुरक्षेसाठी असलं तरी त्याची इमेज बिल्डिंग करण्यासाठी पुरेसं आहे.
आयोजकांनीही त्यांची प्रतिमा उजळण्यासाठी यत्न केलेत. सभेचे बॅनर गावभर लावले जातात. उजव्या विचारांच्या पक्षात जो नेत्यांसोबत सेल्फी महोत्सव चालतो. तो कन्हैयासोबत झाला. खरे तर डाव्यांच्यादृष्टीने या फुटकळ गोष्टी. सभास्थानी प्रस्थापित पक्षांसारखा डामडौल नसला तरी अगदीच गरिबी दिसणार नाही, याची काळजी अ‍ॅड.बन्सी सातपुते, प्रा.डॉ.महेबूब सय्यद, कॉ.बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, अविनाश घुले आदी शेकडो आयोजकांनी घेतली. कन्हैयाकुमारने पंतप्रधान मोदींना प्रचारमंत्री म्हटलं असलं तरी त्याच्या सभेचा आजही समाजमाध्यमांवर प्रचार सुरू आहे. यात गैर मुळीच नाही. भांडवलशाहीतून जन्मलेल्या साधनांनीच भांडवलदारांवर शस्त्र उगारण्याचं तंत्र डाव्यांच्या नव्या पिढीने अवलंबलेय. हे कन्हैयाकुमारच्या सभेने अधोरेखित केलं.
मोदीवादाने बहुतांशी हिंदू पछाडलेत. मात्र, सर्वच हिंदू मोदीवादी नाहीत आणि सर्व मुस्लिमही दहशतवादीही नाहीत, असे त्याचे रास्त विश्‍लेषण होते. त्याच्या भाषणात अंगार असला तरी त्यात लोकशाहीची तत्त्वं होती. त्याच्या उच्चारवी मागणीत वंचितांची वेदना होती. त्यामुळेच ते माथी भडकावणारे नव्हते. कन्हैयाच्या सभेच्या निमित्ताने सर्व पुरोगामी, डावे, अल्पसंख्याक एकत्र आले. पदरमोड करीत त्यांनी सभेचा खर्च उचलला. ती बर्‍यापैकी वलयांकीत होईल, याची काळजी घेतली. वर्षानुवर्षे आपल्या विचारांच्या चौकटीत बांधून राहिलेल्या अनेक डाव्यांचे कन्हैयाकुमारच्या सभेच्या निमित्ताने माध्यमांना दर्शन झाले. त्यांच्यात एकप्रकारचे नवचैतन्य निर्माण झालेय. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या या तरुण कार्यकर्त्याने डाव्या पार्टीलाच नव्हे तर सर्व विरोधकांना, समाजवाद, मानवतावाद मानणार्‍यांना एकसुत्रात बांधले, हे त्याचे ‘उजवे’पण नक्कीच डोळ्यात भरणारे आहे.

LEAVE A REPLY

*