BLOG : सरकारी छापे

0

कर्नाटकातील मातब्बर मंत्री डी के शिवकुमार यांच्या मालमत्तांवर काल प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या. 39 ठिकाणी टाकण्यात आलेल्या या धाडीत 11 कोटी रक्कम हाती लागल्याचा दावा प्राप्तिकर विभागाने केला आहे. या धाडीचे टायमिंग चर्चेत आहे. त्यामुळेच राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. भाजपच्या हाती नसलेल्या मोजक्या राज्यांपैकी एक! या सरकारमध्ये शिवकुमार मातब्बर मंत्री आहेत. त्यांचा व्यवसाय बांगुळुरूपासून दिल्लीपर्यंत पसरला आहे. याच व्यावसायिक ठिकाणांवर छापे पडले. यातील बंगळूर नजीकचे ईगलटोन रिसॉर्ट खास चर्चेत. करण याच रिसॉर्टमध्ये गुजरात मधील काँग्रेसचे 44 आमदार मुक्कामी आहेत. सध्या गुजरातचे राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापले आहे. काँग्रेसचे नेते शंकरसिंग वाघेला यांनी पक्ष सोडल्यापासून काँग्रेसला गळती लागली आहे. त्यांच्यांपाठोपाठ पक्षाच्या अन्य 6 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेस अडचणीत आली आहे. याच राज्यातून सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल राज्यसभेवर जातात. त्यांना विजयासाठी 45 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. या फुटीमुळे पक्षाकडे आता 44 आमदार शिल्लक आहेत. त्यातही गळती लागली तर पटेल यांनी संधी हुकलीच म्हणून समजा! नेमक्या याच गोष्टीसाठी भाजपाने जंगजंग पछाडले आहे. पटेलांना राज्यसभेवर पोहचू द्यायचे नाही हा भाजपचा मनसुबा लपून राहिलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर आमदार सुरक्षित स्थळी हलविण्याची वेळ पक्षावर आली. ज्या ठिकाणी हे आमदार मुक्कामी थांबले, नेमक्या त्याच ठिकाणी आणि ज्याने आश्रय दिला, त्या नेत्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे करवाईमगील राजकीय हेतू नाकारणे कठीण आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दडपण्याचा राजकारण आजचे नाही. काँग्रेसच्या राज्यातही हा प्रकार होताच. आता त्याचा घाऊक वापर होतो, हाच के तो फरक! सरकारी यंत्रणेचा वापर करून बिहारमधील राजकारणाला यशस्वी कलाटणी देण्याचा ताजा अनुभव भाजपकडे आहे. तेव्हा हे छापे केवळ गुजराती राजकारणासाठी वापरले जाणारे की कर्नाटका पुढील बिहार असेल?

LEAVE A REPLY

*