Type to search

Featured आरोग्यदूत ब्लॉग

Blog : तरूणांमध्ये वाढतोय थकवा !

Share
Blog : तरूणांमध्ये वाढतोय थकवा !, Blog Growing Tired In Youth

तारुण्य हा उत्साहाचा, चैतन्याचा काळ. आयुष्यातील उमेदीची वर्षं. या काळातच आयुष्याची खर्‍या अर्थाने पायाभरणी केली जाते. शरीरसंपदा कमावण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असतो; मात्र अलीकडील काळात 20 ते 30 वर्षे वयोगटातील अनेक तरुणांना सध्या थकवा येण्याची समस्या जाणवते आहे. अशा तरुणांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असल्याचे दिसून आले आहे. या वयात शरीर पूर्णपणे तंदुरुस्त आणि मजबूत असते. अशा काळातच जर थकवा येऊ लागला तर ते गंभीर आहे. युवकांना ही समस्या जाणवण्यामागे कोणती कारणे आहेत, याचा शोध आरोग्य तज्ज्ञ घेत आहेत. काही जणांच्या मते तरुणांना मानसिक कारणांमुळे थकव्याची समस्या जाणवू लागली आहे. 

काही अभ्यासकांच्या मते पुरेशी झोप न मिळाल्याने तरुणांना थकवा येऊ लागला आहे. माणसाला तंदुरुस्त राहण्यासाठी आणि कार्यक्षमतेने काम करण्यासाठी किमान सात ते आठ तास झोप मिळणे आवश्यक असते. एवढी झोप मिळाली नाही तर त्याचा परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो. रात्री उशीरापर्यंत स्मार्टफोनवर चॅटिंग करत बसणे, वेगवेगळे व्हिडिओ पाहाणे, टीव्ही पाहाणे अशी सध्याच्या तरुणांची जीवनशैली आहे. त्यामुळे या तरुणांना झोपण्यासाठी रात्रीचा एक वाजून जातो. सकाळी लवकर ऑफिसला जायचे असल्याने सात-साडेसात वाजता सक्तीने उठावेच लागते. त्यामुळे तरुणांना पुरेशी झोप मिळतच नाही. ही दिनचर्या दीर्घकाळ चालू राहिल्याने तरूणांच्या शरीराच्या कार्यक्षमतेवर अनेक विपरित परिणाम होऊ लागले आहेत. या जीवनशैलीमुळे तरुणांना थकवा येऊ लागला आहे. आपले लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही रात्री नऊ नंतर शक्यतो बंद ठेवा. मोबाइलवरून रात्री उशीरापर्यंत चॅटिंग करत बसणे टाळले पाहिजे. जर आपण आपल्या जीवनशैलीत अशा पद्धतीचा बदल केला तर आपल्याला पुरेशी झोप मिळू शकेल. पुरेशी झोप मिळाल्यास दुसर्‍या दिवशी आपण ताजेतवाने राहू.

अनेक तरुणांना रात्री उशीरा जेवण्याची सवयच लागलेली असते. रात्री उशीरा जेवून झोपी गेल्यास अन्न पचन होत नाही. अन्न न पचल्यास आपल्या शरीराच्या अंतर्गत यंत्रणेत बिघाड होतो. त्याचाही परिणाम थकवा येण्यात होतो. ज्यांना झोप येत नसेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही तक्रार दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. झोप येत नाही म्हणून रात्री उशीरापर्यंत स्मार्ट फोनवर चॅटिंग करणे, वाचत बसणे, टीव्ही पाहाणे यासारखे प्रकार टाळले पाहिजेत.

आपला आहार संतुलित नसेल तर थकवा येऊ शकतो. अनेक तरूण नोकरीसाठी किंवा कॉलेजसाठी बाहेर पडताना घरात नाष्टाच करत नाहीत. रिकाम्या पोटी बाहेर पडल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळत नाही. म्हणून घरा बाहेर पडण्या आधी भरपूर नाष्टा केला पाहिजे. नाष्ट्यासाठी परंपरागत भारतीय पदार्थांचा समावेश आहारात असला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये पालेभाज्या, फळे, फळभाज्या यांच्याही समावेश असावा. कडधान्ये, तृणधान्ये यांचाही समावेश आहारात असला पाहिजे. शरीराला तंदुरुस्त राखण्यासाठी प्रोटिन्सची आवश्यकता असते. अशा प्रोटिन्सचा पुरवठा कोणत्या खाद्य पदार्थांमधून होतो हे आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा होण्याकरिता कोणते खाद्या पदार्थ आहारात समाविष्ट करण गरजेचे आहे. या विषयीही आहारतज्ज्ञांकडून सल्ला घ्या. याखेरीज वडापाव, समोसे, पॅटिस यासारखे पदार्थ अतिरिक्त प्रमाणात खाऊ नका. शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला वारंवार थकवा येऊ लागतो.

तरुणींमध्ये लोहाची कमतरता झाल्यास त्यांना थकवा जाणवत राहातो. जर दीर्घकाळ लोहाची कमतरता जाणवल्यास अ‍ॅनिमिया हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणून चिकन, मटण, मसे, गुळ, यांचा समावेश आहारात असणे आवश्यक आहे. अनेक तरुणांना चहा आणि कॉफी जादा प्रमाणात घेण्याची सवय असते. चहा आणि कॉफीचे प्रमाण वाढले तर हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते तसेच रक्तदाबही वाढतो, त्यामुळेही थकवा येऊ लागतो. म्हणून चहा, कॉफीचे सेवन कमी करणे योग्य ठरते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!