BLOG : बेधुंद महाजन!

0

साखर कारखान्यानं निर्मित केलेल्या दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी सातपुडा येथे केलं आहे. केवळ दारुच नव्हे, तर हल्ली तंबाखू उत्पादनांनाही (विमल, हिरा) महिलांचीच नावं दिली जातात, असा दाखला त्यांनी अकलेचे तारे तोडले. एकीकडे महिला बाटली आडवी करण्यासाठी लढा देत असताना दुसरीकडे राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनीच असे वक्तव्य करावेत हा समस्त महिलांचा अपमान नव्हे तर दुसरे काय? मंत्री महाजन यांच्या बेधुंदी वक्तव्याने विरोधक आक्रमक झाले असून त्यांना आयते कोलीत मिळाले आहे. राज्य शासन एकीकडे अवैध दारू विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी कायद्याचे फास आवळत आहेत. महिलांनीही बाटली आडवीसाठी कंबर कसली आहे. अशा वेळेस मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे त्यांच्या पदाला शोभणारे नक्कीच नाही. महाजन यांनी पाणी टंचाई निवारण करण्याचे सोडून दारूचे मार्केटिंग कन्सल्टींग करू नये अशी मागणी आता पुढे येईल. एका अर्थाने ती बरोबरही आहे. दारूने अनेकांचे संसार उध्दवस्त केले आहे. दारूड्यांनी घरातील महिलांचे जीणे मुश्कील केले आहे हे महाजन विसरलेत का? असेच आता वाटू लागले आहे. गावागावातील महिला दारू विरोधात लढा पुकारून रस्त्यावर उतरल्या आहेत. आता दारूला महिलांचीच नावे देण्याचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार म्हणावा, दुसरे काय. एकीकडे अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलांना अधिकार देण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पुढाकार घेत असताना दुसरीकडे त्यांचेच सहकारी मंत्री महाजन असे बेधुंद वक्तव्य करत असतील तर सरकारचं डोक ठिकाणावर आहे? असे जनतेने विचारण्याची वेळ आली आहे असे समजण्यास हरकत नाही. दारूमुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे दारू विक्रीची दुकाने महामार्गालगत असू नये यासाठी कोर्ट पुढाकार घेत असताना सत्तेतील जबाबदार असलेल्या मंत्र्यांनी हे असले विधान करणे कितपत योग्य याचा न्यायनिवाडा जनतेनेच केलेला बरा. आपल्या वक्तव्यावरून गहजब झाल्यानंतर महाजन यांना उपरती झाली. कोणाची मने दुखावली असतील तर मला माफ करा. मी सहजगत्या म्हणून गेलो असा माफीनामा महाजन यांनी व्यक्त केला. परंतु एकदा हौदसे गयी वो बुँद से थोडी ना वापस आती है… महिलांविषयी व्यक्त करताना महाजन नेमक्या कोणत्या धुंदीत होते. ती धुंदी उतरल्याने त्यांना महिलांच्या भावना दुखावल्याचे समजले असावे. सत्तेची धुंदी असेल तर तीही उतरेल, असा आक्रमक पवित्रा महिला संघटनांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

*