BLOG: बळीराजाच्या भावनेचा उद्रेक!

0
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेले आहेत. अभुतपूर्व म्हणता येईल अशी ही घटना.

यावरून बळीराजाच्या मनात दाटलेला संताप आणि उद्वेग किती मोठा आहे, याची जाणीव व्हावी! अनेक चळवळींचे जन्मस्थान असलेल्या नगर जिल्ह्यातच या कल्पनेचे बीज रोवले गेले, ही आखणी एक दखलपात्र बाब. शेतकर्‍यांच्या नावे राज्य करायचे आणि सातत्याने त्याच्याकडे, शेतीविषयी प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करायचे. त्या विरोधात सुरू झालेला हा एल्गार कुठे जाणार, याची स्पष्ट कल्पना नाही. मात्र शेतकरी राजा यानिमित्ताने जागा झाला, याची नोंद घेतलीच पाहिजे. देशाचा कणाच मुळात शेतीव्यवस्थेवर! बळीराजाच्या जीवावर राज्यकर्त्यांनी सातत्याने आपल्या सत्तेचे इमले रचले. अलिकडच्या काळात शेती आतबट्ट्याचा खेळ होवू लागली. नैसर्गिक संकटे वारंवार आली. त्यांना तोंड देताना मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला सरकारकडून धीर देण्याऐवजी अवहेलना होऊ लागल्याने संतापाचा स्फोट होणार याचा अंदाज होताच. सरकारची शेतीविषयी धोरणातील धरसोड वृत्ती शेतकर्‍याच्या मुळावर उठली आहे. आतातर किमान धीर देणारे दोन शब्दही सरकारकडून उच्चारले जात नाहीत. त्याऐवजी शेतकरी आणि शेतीप्रश्‍नांची मस्करी केली जाते. रावसाहेब दानवेंसारखे ‘जबाबदार’ नेते शेतकर्‍यांना शिव्या घालतात. माधव भंडारीसारखे ‘विद्वान’ शेतकरी संपास कस्पटासमान लेखतात. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुन्या सत्ताधार्‍यांच्या नावे खडे फोडत जबाबदारी टाळतात. एकूणच हा प्रकार क्लेषदायक आहे. आधीच्या राज्यकर्त्यांनी फसविले म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसविले. या जनतेत शेतकरी वर्गाचाही समावेश आहे, याचा विसर पडल्यागत सरकारचे वागणे आहे. शेतकर्‍यांना राजकारणाशी काही देणेघेणे नाही. तरीही सत्ताधार्‍यांकडून हा संप राजकीय ठरविला जाणे, हेच मुळात या सरकारला शेतकर्‍यांचे दुखणे कळत नाही याचे द्योतक मानले पाहिजे. संप मोडून काढण्याचे सर्व हातखंडे वापरून झाल्यावरही शेतकरी संपावर गेला आहे, यातून काय बोध घ्यायचा तो घेतला पाहिजे. सरकारी मनसुब्यांविरोधात जाणारी प्रत्येक गोष्ट राजकारणाने प्रेरीत आहे, असा समज सत्ताधार्‍यांनी करून घेणे चुकीचे आहे. सत्ता आली की मती गुंग होते, या नियमाला सध्याचे सरकारही अपवाद ठरले नाही. कदाचित यामुळेच शेतकरी संपासारखी कल्पना राज्यभर वावटळासारखी पसरली. आज संपाचा पहिला दिवस आहे. कदाचित संप मोडून काढण्यासाठी बळाचा वापर होईल. शेतकर्‍यांनी पहिल्याच दिवशी दूध आणि भाजीपाला अडवला आहे. संप सुरू राहिला तर अनेक शहरांचे जनजीवन विस्कळीत होईल. जगाचा पोशिंदा समजुतदार आहे. मात्र सरकारच हेकेखोरपणा करत असल्याने त्यांचाही नाईलाज झाला आहे. अत्यंत शांततेच्या मार्गाने, कोणत्याही नेतृत्वाशिवाय शेतकर्‍यांनी पुकारलेला हा एल्गार आहे. तो शांततेच होईल. कारण देशातील सर्वात शोषिक आणि संयमी घटकच मुळात शेतकरी आहे. अनेक आस्मानी आणि सुलतानी संकटात तो डगमगला नव्हता. तो आपला संतापही शांततामय मार्गानेच नोंदविणार आहे. आता झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने लवकर जागे व्हावे!

LEAVE A REPLY

*