Type to search

ब्लॉग

Blog : त्यांना कसला एक्झिट पोल?

Share

नाशिक | वैशाली शहाणे 

सगळ्यांच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती संभाव्य सरकारची आणि मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागते याची.

पण शहरापासून जेमतेम साठ-सत्तर किलोमीटरवरील काही गावांमध्ये मात्र कोठलेच वातावरण नाही. गावातील बायकांना ना निवडणुकीचे अप्रुप होते ना एक्झिट पोलचे. कदाचित त्यांना एक्झिट पोल हा शब्द देखील माहिती नसावा. आपला लोकप्रतिनिधी कोण आहे ते त्यांना नीटसे माहिती नाही. तो कधी गावात आला होता का याचे उत्तर ठामपणे देता येत नाही.

किती पक्ष निवडणूक लढवत होते. त्यातील कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार आहे. निकाल कधी लागणार आहेत. सरकार कोणाचे येणार आहे. आपण असे प्रश्‍न विचारत असतो आणि बायाबापड्या तोंडाला पदर लावून खुसखुसत असतात.

कारण, त्यांना सध्या तरी चिंता फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे आपल्या भाळी कायमची मारली गेलेली पाणीटंचाई आणि पोट-पाठ खपाटीला नेणारा दुष्काळ कधी संपेल याची.

पेठ तालुक्यातील अंबापूर, झरी आणि बेजावड अशा काही गावांमध्ये गेले होते. सर्वत्र निसर्गनिर्मित दुष्काळापेक्षा मानवनिर्मित दुष्काळाचाच अनुभव आला. नियोजनाचाच दुष्काळ असल्यामुळे काही ठिकाणी दरीच्या काठावरील आणि काही ठिकाणी गावाबाहेरील विहिरीतून पाणी भरणे बायकांच्या नशिबी आलेले. अंबापूर गावासाठी नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. गावात पाईप टाकले गेले पण विहिर घेतलेली नाही. पाईपांना आणि गावातील टाकीला नळ नाहीत. त्यामुळे बायका दरीच्या काठावरील विहिरीतून पाणी भरतात. गावातील टाकीला दोन-चार नळ बसवले तरी त्यांचे पाणी भरणे कमी कष्टाचे होईल. घराच्या नाही तरी निदान गावाच्या उंबरठ्याशी पाणी येईल.

पण हे करणार कोण आणि कधी?

झरी गावाची कथा फारशी वेगळी नाही. जेमतेम ७५ उंबर्‍यांचे गाव. गावातील एका विहिरीला बर्‍यापैकी पाणी. पाण्याचा रंगही बर्‍यापैकी हिरवा. विहिरीवरचा पंप वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे बायकांना पाणी शेंदावेच लागते. तो पंप दुरुस्त झाला तर इथल्याही बायकांचे पाणी उपसण्याचे कष्ट कमी होणार आहेत.

पण हे करणार कोण आणि कधी?

सरकार कोणाचेही आले आणि गेले तरी आपल्या परिस्थितीत फारसा फरक कधीच पडत नाही. आपली साधी साधी कामेही होत नाहीत हे मात्र त्यांना पक्के माहिती आहे. तसे ते बोलूनही दाखवतात.

बायका आणि पोरी तर लवकर समोरच येत नाहीत. आपल्याशी बोलायला त्यांना वेळही नसतो. दिवसभर त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरु असतो तो म्हणजे विहिरीवरुन पाणी भरणे. पोरीसोरी..गर्भार बायका..दीडदोन महिन्याचं लेकरु झोळीत झोपवून एखादी आई आणि गावातील म्हातार्‍या कोतार्‍याही पाणीच भरतात.

बायकांना कितीही प्रश्‍न विचारले तरी बायकांचं सगळ्या प्रश्‍नांचं उत्तर एकच असतं. ते म्हणजे पाण्याची सोय करा काहीतरी. आमचं काही फार मागणं नाही. फक्त गावात पाणी आलं पाहिजे. तेवढं झालं तर एकदम ब्येस होईल.

कधी येणार त्यांच्या गावात पाणी?

ज्यांचं आयुष्य फक्त पाण्याशी बांधलं गेलं आहे त्यांना कोण कसा समजावून सांगणार एक्झिट पोल आणि त्याचा अर्थ? निवडणुकीचे, त्यांच्या एका मताचे आणि सरकारचे महत्व?

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!