BLOG : नोटाबंदीचा सोटा गरिबांच्या पाठीत

0

नोटााबंदीने अच्छे दिन येतील, असे ढोल बडवले जात होते. मोदीभक्त गावोगाव त्यांची आरती ओवाळीत फिरत होते. त्यांचे हे मोदी गुणगाणाचे तुणतुणे रिझर्व बँकेच्या अहवालामुळे बंद झाले, हे बरे झाले. मोदी सरकारने उगारलेला नोटा बंदीचा सोटा आतंकवादी अन काळा बाजारवाल्यांच्या पाठीत पडल्याचा गवगवा केला जात होता. मात्र, तसे काहीच झाले नाही. उलटपक्षी सरकारच्याच पाठीत आतंकवाद्यांवर उगारलेला सोटा बसला. 500 आणि 1 हजार रूपयांच्या नोटा कागज का तुकडा झाल्यानंतर तब्बल 99 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत परत आल्या आहेत. एक टक्का म्हणजेच 16 हजार 50 कोटी रूपयांच्या नोटा बँकेत भरल्या गेल्या नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नात 23.56 टक्के घट आली. तसेच नोटांच्या छपाईसाठी सात हजार 965 कोटी रूपयांचा खर्च आला. नोट बंदी निर्णयाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल उत्पन्नात 2 टक्क्यांनी घट झाली. विकासदर घटल्याने अनेक आर्थिक आरिष्ट ओढावली गेली. केवळ व्यावसायिकच नव्हे तर मोलमजुरी करणार्‍यांना पोटाला चिमटा घेत कमी मजुरीत काम करावे लागले. बांधकाम व्यावसाय ठप्प झाला. शेतकर्‍यांचीही दमकोंडी झाली. संघटित क्षेत्रातील तब्बल 15 लाख लोकांना नोकर्‍यांना मुकावे लागेल. नोट बंदीच्या निर्णयाने काहीच साध्य झाले नाही. हे सरकारच्या पहिल्याच हप्प्यात लक्षात आले होते. त्यामुळेच जमा झालेल्या नोटांची आकडेवारी मोदी सरकार देत नव्हते. मात्र, आता त्यांचे पितळ उघडे पडले आहे. तरीही ते आपली चूक मान्य करायला तयार नाहीत. बँकेत जमा झालेला बहुतांशी पैसा हा व्यवहारात नव्हता. कर चुकवून तो दडवून ठेवला जात होता. आता तो करपात्र होईल. कॅशलेस व्यवहारास चालना मिळेल. पुढच्या काही वर्षात आपली अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल, अशी फायद्याची जपमाळ ओढली जात आहे. सरकारमधील मंत्री अरूण जेटली यांनी तर नोटाबंदी काय हे अनेकांना समजलेच नाही, असा टोला विरोधकांना मारला. हे सरकार आल्यापासून अनेक प्रकारचे सोंग करते. त्यांच्या सोंगात सहभागी होण्यास नकार देणार्‍यांना किंवा नावे ठेवणार्‍यांना ते थेट देशद्रोही ठरवून टाकते. पण त्यांना हे माहिती नसावे पैशाचे सोंग नाही आणता येत. सरकार नोटबंदीच्या निर्णयाचे धनुष्य छातीवर घेऊन पडले. ते सर्वांना दिसते आहे. एकंदर नोटबंदीने बनावट नोटा आणि काळ्यापैशावाल्यांचे कंबरडे मोडले की नाही, हा भाग अलाहिदा. प्रश्‍न फायदा-तोट्याचाही नाही. मनमानी करण्याची मनोवृत्ती सोकावते. याच हुकूमशाहीचाच देशाच्या लोकशाहीला मोठा धोका आहे. तो वेळीच न ओळखल्यास आपलीही गत पाकिस्तानसारखीच होईल.

LEAVE A REPLY

*