BLOG : राजकीय अंधार!

0

भारनियमनाने राज्याला वेठीस धरले आहे. दिवाळी असल्याने विजेची मागणी वाढली आणि याच काळात कोळसा साठा घटला, असे यामागचे सरकारी कारण! ते फारसे पटण्यासारखे नाही. दिवाळी न सांगता आलेली नाही. कोळसा संपत आला हे विज निर्मिती करणार्‍यांना आणि त्यावर नियंत्रण ठेवणार्‍यांना कळत नसेल, तर तो जनतेचा दोष नाही. एकूणच हे संकट मानवनिर्मित आहे, यात दुमत नाही. कोणतेही सरकार स्वत:च्या चुकांची कबुली कदापि देत नाही. आता तर खोटेही रेटून नेण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे सरकार याबाबत आपण कमी पडलो, हे मान्य करण्याची शक्यता नाही. एक मात्र झाले, सणासुदीच्या काळावर या बळजबरीच्या भारनियमनाने विरजण पाडले. वीज कधी येणार आणि कधी जाणार, याचे वेळापत्रक नसल्याने गोंधळ उडणार हे अपेक्षित होते. या गोंधळात राजकारण्यांनी उडी घेतल्याने दिवाळीआधीच भारनियमनाचे राजकीय फटाके वाजत आहेत. नगर शहरात एकाचवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. दोघांचाही उद्देश एकच! सेना ही भाजपावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. नगर शहरात आगामी काळात महापालिका निवडणूक आहे. या निवडणुकीला सामोरे जायचे तर जनतेच्या नजरेत राहणे गरजेचे! त्यात सेनेचे उपनेते अनिल राठोड 25 वर्षे या शहराचे आमदार होते. महावितरणविरूद्ध आंदोलन करणे, हे त्यांच्या भात्यातील हुकुमी राजकीय शस्त्र! आघाडी सरकारने त्यांना यात कुशलता मिळविण्याची संधी वारंवार दिली. या गोष्टीची जाणीव असल्याने अलिकडे राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे समर्थक अशा मुद्यांवर अनेकदा आक्रमक दिसतात. काल दोघांचे समर्थक एकाच मुद्यावर आंदोलन करत असल्याने नगरकरांचीही पंचाईत झाली. वीज आलीच तर तो कोणाची, सेनेची की राष्ट्रवादीची असा प्रश्‍न त्यांच्यासमोर नक्कीच असेल. विजेसाठी भांडतांना ते कधी एकमेकांशी भांडायला लागले, हेच समजले नाही. यातून गोंधळ उडाला म्हणून पोलिसांनीही प्रकरणात उडी घेतली. सेना नेत्यांना धक्काबुक्की झाल्याने प्रकरण विजेवरून मनपानाकडे सरकले. अलिकडच्या काळात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ पोलिसांवर आली. पण यातून साधले काय? भारनियमन थांबले का? जनतेला विज मिळाली का? आधी राष्ट्रवादी सत्तेत होती, तेव्हा फार वेगळी स्थिती नव्हती. आता सेना सत्तेत आल्याने प्रकाश पडलेला नाही. प्रश्‍न जनतेशी निगडीत आहे. जनतेला त्रास होतो, हे खरेच आहे. पण हे भांडण येथे सरकारी अधिकार्‍यांशी भांडून सुटण्यासारखे नाही. विहिरीतच नाही म्हटल्यावर पोहर्‍यात येणार कोठून? विज निर्मितीच ठप्प आहे. तेव्हा आजी-माजी आमदार तिकडे सरकारशी भांडले तर अधिक बरे! शहर आधीच त्रासले आहे. त्यात राजकीय साठमारीची भर का सहन करायची? अंधाराचे हे राजकारण जनतेच्या उपयोगाचे नाही. आंदोलनाची एक पद्धत असते. राठोड म्हणतात, आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने असते. सेनेचा वाघ माणसाळला असेल तर त्याचे स्वागत आहे. दुसरीकडे शहर राष्ट्रवादीला जनतेच्या प्रश्‍नांवर अधिक पोक्त होण्याची गरज आहे, हे वेगळे सांगायला नको! या राजकीय आंदोलनात हमखास विज मिळण्याची खात्री असेल तर जनताही सामील होईल. पण स्टंट असेल तर जनतेच्या सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका!

LEAVE A REPLY

*