Type to search

Featured ब्लॉग

Blog – कोरोना : अफवांचे विषाणू कुक्कुटपालकांच्या मुळावर !

Share
BLog - कोरोना : अफवांचे विषाणू कुक्कुटपालकांच्या मुळावर !, Blog Corona Poultry Farming Ashok Pathare

कोरोना कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने होतो अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली गेली. याचा काय परिणाम होवू शकतो याचा विचार अफवा पसरवणारे करत नाहीत. अनेकांचा रोजगार कुक्कुटपालन व्यवसायावर अवलंबून आहे. अफवा पसरवल्याने त्यांना आपण बेरोजगार करत आहोत याचा विचार करायला हवा. अफवांच्या विषाणूंचा प्रसार करणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी.

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील तरुण कुक्कुटपालन व्यवसायाकडे आकर्षित झाला. एकट्या नगर जिल्ह्यातच शेकडोंच्या संख्येने तरुणांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय अंगिकारला. मात्र हा व्यवसाय विविध कारणांनी अनेकदा अडचणीत येतो. यंदाही हा व्यवसाय अडचणीत आला तो अफवांमुळे. चीनमध्ये अनेकांना विषाणूजन्य कोरोनाची लागण झाली. हा आजार जगातील अन्य देशांतही पसरला. या आजाराचे नेमके कारण काय याचा विचार न करताही हा आजार कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने होतो अशी अफवा आपल्या देशात पसरवली गेली. त्यामुळे ‘कोरोना’ कुक्कुटपालकांच्या मुळावर आला आहे.

कोंबड्यांद्वारे अथवा त्यांच्या मांसाद्वारे या रोगाचा प्रसार होतो असे कुठेही शास्त्रज्ञांनी म्हटलेले नसताना आपल्याकडे मात्र कोरोनाचे कारण कोंबड्यांचे मांस हे असल्याची अफवा पसरवली गेली. एखादी खरी व चांगली गोष्ट सोशल मिडियातून खूप धिम्या गतीने प्रसारित होते. बहुधा तीचा कोणी प्रसारही करीत नाही. अफवा मात्र खूप वेगाने फॉरवर्ड केल्या जातात. ही अफवा आहे हे माहिती असलेलेही त्यात सामील असतात. आपल्या या कृत्याने कुणाच्या रोजगारावर संक्रांत येईल याचाही हे लोक विचार करत नाहीत.

कुक्कुटपालनाने तरुणांना रोजगाराचा आधार दिला आहे. कुक्कुटपालनात भारत जगात दुसर्‍या स्थानावर आहे. जवळपास 900 कोटी अंडी उत्पादन भारतात होते तर 42 लाख टन बॉयलर चिकन तयार होते. विविध प्रकारच्या अडचणींमुळे अनेक तरुणांवर हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. पोल्ट्री मालकांना नोंदणीची झालेली सक्ती, त्याशिवाय नव्या नियमांची सुरु होत असलेली अंमलबजावणी यामुळे विविध अडचणींमध्ये भर पडत असताना अशा अफवांमुळे हा व्यवसाय संकटात सापडत असून त्यामुळे मोठ्या संख्येने बेरोजगारांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

यापूर्वी ‘एच 5 एन 1’ विषाणूमुळे बर्ड फ्लूचे संकट या व्यवसायावर आले होते. अधूनमधून एखाद्या राज्यात अजूनही हे संकट येते व हजारो कोंबड्यांचा बळी जातो. रोगांना बळी पडलेल्या कोंबड्यांपेक्षा अफवांच्या विषाणूंना बळी पडलेल्या नागरिकांमुळे कुक्कुटपालकांचे होणारे नुकसान अधिक आहे. बर्ड फ्लू बाधीत कोंबडीचे मांस चांगले शिजवलेले असेल तर त्यापासहून बर्ड फ्लू होत नाही हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलेले होते तरीही बर्ड फ्लूच्या काळात कुक्कुटपालन व्यवसाय दुहेरी संकटात आला होता. ‘कोरोना’च्याबाबतीत अफवा तर खूपच आहेत. त्यात कोंबडीच्या मांसामुळे हा आजार होतो अशा अफवा पसरवल्या गेल्या आहेत. अफवा पसरवण्याआधी आपण जी माहिती पसरवत आहोत ती खरी आहे का? यामुळे कुणाचे नुकसान तर होत नाही ना याचा विचार केला जात नाही.

कोरोनाच नव्हे तर अन्य कोणत्याही आजारांबाबत पसरलेल्या अफवा रोखण्यासाठी व सत्य परिस्थिती सांगण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. अफवेमुळे हजारोंचे रोजगार संकटात येवू घातल्याने याबाबत गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे. अफवा पसरवण्याचा विषाणू डोक्यात घुसलेल्यांच्या डोक्यातून हा विषाणू काढून टाकण्यासाठी अफवा पसरवणार्‍यांवर, त्यांचा प्रसार करणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी. कुक्कुटपालनासारखा व्यवसाय स्विकारलेल्या ग्रामीण तरुणांच्या व्यवसायावर अफवारुपी आपत्ती आणलेल्यांवर सर्जिकल स्ट्राईकपद्धतीचे कारवाई करुन त्यांच्या डोक्यातून अफवेचा विषाणू हद्दपार करायला हवा.

-अशोक पटारे
मो. 9404251840

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!