Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : लागली एकदाची सुट्टी..!

Share

सगळ्याबोर्डांच्या सगळ्या इयत्तांच्या आणि नववीतून दहावीत गेलेल्या मुलांनाही एकदाची सुट्टी लागली.
नववीतून दहावीत गेलेल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टयांसाठी नववीची वार्षिक परीक्षा झाल्यावर पंधरा दिवस जास्त वाट पाहावी लागली.

पूर्वी किती छान होतंं. वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर म्हणजे शाळेचा शेवटचा दिवस. त्या दिवसापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या. निकाल 1 मेला असायचा. मुलांना वेगळं सांगावं लागायचं नाही की पालकांना निरोप द्यावा लागायचा नाही. मुलांना हुंदडायला चांगल्या दोन महिने सुट्ट्या मिळायच्या.

 

नववीतुन दहावीत गेलेली मुलंही किमान दीड महिना तरी सुट्टीवरच असायची. दहावीची तयारी आधीपासुनच करायची म्हणून त्यांना सुट्टीतही शाळेत जावं लागायचं नाही. दहावीची तयारी आठवीपासुन सुरु होते असं शिक्षक तेव्हाही म्हणायचे पण त्यासाठी मुलांच्या सुट्ट्यांचा बळी द्यावा लागायचा नाही.

सुट्ट्यांचं हे गणित कधीपासून आणि का बरं चुकलं? परीक्षेनंतरही पंधरा वीस दिवस, काहींच्या महिना-महिना शाळा सुरु का राहायला लागल्या? शाळेला सुट्टी 1 मे पासुनच का लागायला लागली? मुलांच्या सुट्ट्या आकुंचन का पावल्या?
काही जणांशी मी यावर बोलत होते, तेव्हा कुणीतरी म्हणालं, अहो, स्पर्धा किती वाढली आहे. दहावीचे वर्ष किती महत्वाचे. मुलांची तयारी व्हायला नको. मग शाळेचे दिवस वाढले तर एवढा गहजब कशाला?

चर्चेसाठी स्पर्धेचा मुद्दा सेकंदभर मान्य केला तरी काही प्रश्न उरतातच. बहुतांश मुलांच्या परीक्षा 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान संपल्या. पुढच्या पंधरा दिवसात मुलांचा खरंच किती अभ्यास झाला असेल? पंधरा-वीस दिवसात कोणती पूर्वतयारी करुन घेतली गेली असेल? बरे शाळा तशी तयारी करुनही घेत असतील पण मुलांचे लक्ष तरी लागत असेल का? सध्याच्या पालकांच्या दृष्टीने हे सगळे योग्यच असले तरी पण…

या दोन महिन्याच्या सुट्य्या कितीतरी मोठं काम करतात. अहो, अती ताण आला तर घरातला कॉम्प्युटर देखील हँग होतो. काही वेळासाठी झोपून जातो. त्याला ‘रिफ्रेश’करावं लागतं. ताण जास्तच झाला असेल तर शटडाऊन करावं लागतं. थोडावेळ थांबावं लागतं. या अल्पशा विश्रांतीनंतरही तो मोठ्या जोमाने सुरु होतो आणि वेगाने काम करु लागते.
सुट्ट्या मुलांसाठी हेच तर काम करतात. सुट्ट्या मुलांना ‘रिफ्रेश’ करतात.

मशिन सुद्धा अती ताण आला तर हँग होतं. ही तर तुमची आमची जितीजागती मुलं. वर्षभराच्या आणि विविध प्रकारच्या ताणांमुळे हँग होत नसतील का? एरवी बिच्चारे वर्षभर आठ तास शाळा-किमान दोन तास क्लास आणि त्यानंतरही पालकांना बरे वाटावे म्हणून (की त्यांच्या धाकापोटी?) किमान एक-दोन तास तरी सेल्फ स्टडी अशा चरकात पिसत असतात. शाळेतले खेळांचे तास फक्त वेळापत्रकातच असतात. त्या तासांनाही अभ्यासच करावा लागतो बर्‍याच जणांना.
सुट्टीत हे सगळं रुटीन ब्रेक होतं. दप्तरं कोपर्‍यात ठेवा (मुलांच्या भाषेत फेका) कधीही झोपा, कधीही उठा. मित्रमंडळी जमवा. धुडगूस घाला. आई ओरडली तर पाच मिनिटांची शांतता आणि नंतर गोंधळ सुरु. गोट्या, डबा डिमडिम, आबाधोबी लोप पावले असले तरी क्रिकेटचा डाव तर रंगायचाच. मुलं खेळायची. भांडायची आणि पुन्हा एकत्र यायची आणि कोणीही न शिकवता आपापलं शेअरींग शिकायची.

मे महिना संपता संपता मुलं सुट्टीला कंटाळायची. शाळेची वाट पाहायला लागायची. नवीन दप्तरं, नवी कोरी पुस्तकं, कंपास यांचे वेध लागायचे. शाळेतील मित्रांची आठवण यायला लागायची. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी एकदा शाळा सुरु होते असं मुलांना व्हायचं. आणि मग शाळेच्या पहिल्याज दिवशी मुलं उत्साहात शाळेत जायची. कारण मुलं दीड-दोन महिन्यांच्या सुटट्यांनी रिफ्रेश झालेली असायची.

आता त्यांना सुट्टी लागते कधी आणि ती संपते कधी हेच लक्षात येईनासे झाले आहे. कारणं काहीही असोत त्यांची मोठी सुट्टी थोडीशी छोटी झाली आहे.

पालकांच्या मनात सुट्ट्या कमी का झाल्या याची हजार कारणं तयार असली तरी तुम्हाला पटतं सुट्ट्या कमी होणं आणि मुलांना ‘रिफ्रेश’ व्हायचा वेळ न देणं?
मला तरी नाही पटतं बुवा…

  • वैशाली शहाणे (E-Mail – chiefsubnsk@deshdoot.com)
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!