Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगकळ्या उमलायच्या राहून गेल्या..!

कळ्या उमलायच्या राहून गेल्या..!

मुलांची घुसमट पालकांच्या लक्षात येत नसावी का? कदाचित येतही असेल, दिसून न दिसल्यासारखं करत असतील. मुलं बंडखोर असतात. कुटुंब, समाज आणि शिक्षण व्यवस्था संस्काराच्या नावाखाली त्यांच्यातील बंडखोरी नाहीशी करते. संस्कार म्हणजे काय तर आपलं स्वतंत्र संपवून कोणाच्या तरी समाधानासाठी कृत्रिम जीवन जगणं ? मुलांची वाढ स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकरूपता असावी.

पहाटेची साखर झोप कोणाला नको असते. तसं पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात अस म्हणतात. सकाळी आईने किती वेळा आवाज दिला पण मी स्वप्नाला ब्रेक लागू दिला नाही. कधी नव्हे एवढं गोड स्वप्न पडलं होत. गेली दोन वर्षे कॉलेजमध्ये जिच्या एका स्माईलसाठी झुरत होतो ती सुमी आज माझं चुंबन घेणार होती. पण माझ्या स्वप्नाचा रंगाचा बेरंग केला तो संक्याच्या ओक्साबोकसी रडण्याने. असा बेरंग होण्याचं दुःख संक्याला कसं कळणार? आता कुठं तो चौथीच्या वर्गात जातोय. कॉलेजमध्ये असताना मला कधी सकाळचा अलार्म लावायची गरज लागली नाही. संक्याचा भोंगा अन खालच्या वाड्यातील कोंबडा हेच माझे अलार्म होते. संक्याचा अलार्म वाजला अन मी उठून डोळे चोळत बाहेर आलो. आईची सडा-रांगोळी झाली होती. आप्पा गोठ्यात म्हशींची धार काढत होते. तिकडं सदा एकुलत्या एक पोराला (संक्या) धोपटीत असल्याचा आवाज येत होता. संक्याच रडणं रोजचं असल्याने कोणी लक्ष देत नव्हतं. आप्पा धार काढताना म्हणाले, आज संक्यावर संक्रात तुटून पडलीय. काव्हं काय झालं मी विचारलं. काय कि बुवा, मी धार काढाय बसल्यापासून सदा पोराला मारतोय आप्पा म्हणाले. तेव्हढ्यात हेमा वहिनी माझ्याकडं धावत आल्या, भाऊजी ! त्यासनी जरा आवरा, सकाळी सकाळी लेकराला मारतायत. म्या मधी जाऊन धरलं तर मला दोन लाथा घातल्या. वहिनीच्या प्रार्थनेपेक्षा मला संक्याची कीव आली. चला, काय केलंय त्यानं? मी विचारलं. वहिनी रडत म्हणाल्या आव काय नाय, सकाळी त्यांचा मोबाईलमधी संक्या गेम खेळत होता. त्याच्याकडून मोबाईल बंद पडला तसे नुसते मारतेत. संक्याला बाजूला घेत सदाच्या तावडीतून त्याची सुटका केली. वाघाच्या तोंडातून शिकार काढावी तसा सदा दिसत होता. जन्म दिला म्हंजी मुलांना मारण्याचा अधिकार कसा मिळाला? मुलं म्हंजी देवा घरची फुलं ना? मग अशी फुलं चुरगळता कशी?

- Advertisement -

संक्याची अवस्था बघितल्यापासून मी दिवसभर अस्वस्थ होतो. दोन्ही हात जोडून संक्या बापाकडे दयेची भीक मागत होता. अन सदा वरून पट्ट्याने मारत होता. त्या झटापटीत मला दोन पट्टे बसले होते, त्याचे वळ माझ्या हातावर अजून तसेच होते. दुपारी कॉलेजमधून आल्या आल्या संक्याकडे गेलो. तर संक्या पेन्सिलने पाटीवर चित्र काढीत होता. काय र संक्या ! काय करतो. तसा तो डचकला. काय नाय म्हणत त्यानं पाटी पिशवीत घातली. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. दादांनी (सदा) परत मारलं का? संक्या खाली मान घालून पेन्सिलने भुईवर रेघा ओढयाला लागला. तो काहीच बोलला नाही. माझ्याबर बी बोलणार नाहीस का? मी परत विचारलं. संक्या म्हणाला, गुरुजीने शाळेत मारलं त्याचा रुसवा घालवण्यासाठी मी म्हणालो, चल दुकानाला जाऊ संक्याने माझ्याकडं न बघताच मुंडी हलवून नाही म्हणून सांगितलं. त्याच्या उभ्या आडव्या रेघांची भाषा मला समजत नव्हतं. पण त्याची घुसमट होतीय हे कळत होत.

दोन दिवसानंतर संक्या नॉर्मल झाला. नेहमी प्रमाणे त्याचे प्रश्न अन खोड्या करणं सुरु झालं. त्याच्या प्रश्नाला मी सकारात्मक उत्तर द्यायचो. कधी रागवत नव्हतो, त्याला आवडणार्‍या गोष्टी करण्याचं त्याला स्वातंत्र्य होत. त्यामुळे कदाचित त्याला माझ्यापाशी सुरक्षित वाटत असल. त्याच्या दिवसभरातील सगळ्या गंमतीजमती मला सांगायचा. त्याचं स्वतंत्र आणि महत्व मी स्वीकारलं होत. लहान मुलांना हेच तर हवं असत.

एकदा तो सकाळीच माझ्याकडे आला आणि म्हणाला, काका ! आज किनाई म्या दादाच्या (सदा) फोनमधी एक गंमत बघितली. मी त्याला कुतूहलाने विचारले, काय रे तो लवकर सांगना. पायाच्या अंगठ्याने माती उकरत तसाच उभा राहिला. आपल्या काकाला सांगणार नाहीस का? मी म्हणालो. मोठाले माणसं करतात ना तसंल बघितलं. त्याच्या बोलण्याने मी गोंधळून गेलो. त्याला काय सांगावं कळेना. कसतरी वेळ मारून नेहणार होतो पण त्याच्याशी खोटं बोलायचं नाही, हे मी ठरवलं होत. कदाचित त्याला मी सांगितलेलं समजणार नाही पण अज्ञानातून अपराध घडतो. हे टाळण्यासाठी त्याला त्याच्या भाषेत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला.

संक्याचा बाप (सदा) बाहेर समाजात खूप माणुसकीने वागायचा मात्र घरात संक्याला आणि वहिनीला कधी नीट बोलत नव्हता. त्याला दारूचं व्यसनही नव्हतं. पण त्याची घरात चिडचिड व्हायची. अशा वागण्याने संक्याला अन वहिनीला कधी सुख लागलं नाही. सदाचं शिक्षण मास्टरपर्यंत झालं होत. नोकरीसाठी प्रयत्न केले होते पण थोडक्यात त्याची संधी हुकली. मग तो शेतीत रमला. आज मात्र त्याच्या वर्गातील अनेक मित्र चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. कदाचित यामुळे सदा अस्वस्थ होत असावा.

त्यामुळे संक्याच्यामागं सारखा अभ्यासाचा धोशा असायचा. पण संक्याचं मन शाळेत रमत नव्हतं. त्याला शाळेपेक्षा इतर विषयात अधिक गोडी वाटत होती. शाळेत त्याला जास्त मित्र नव्हते. अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे शिक्षकांचा प्रिय विद्यार्थी नव्हता. त्याचं आणि छडीच घट्ट नातं होत. त्यामुळे संक्याला घरी सदाचा आणि शाळेत गुरुजींचा धाक लागला होता. सदाला वाटायचं आपल्या पोरानं इतर पोरासारखे मार्क पाडावेत. आपल्याला नोकरी नाही लागली निदान पोराला तरी नोकरी लागावी. सदाची अपेक्षा रास्त होती पण सदाला मार्कशीटचे गुण म्हणजे यश वाटत होत. तो संक्याचा विचार करत नव्हता. संक्याचं मन कशात रमत? त्याला काय आवडतं? अभ्यास समजून घेण्यात त्याला कोणत्या अडचणी आहेत? त्याच्यातील कलागुण सदाला दिसत नव्हते.

संक्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे तब्बल दोन वर्षांनी मी त्याला भेटलो होतो. आज मला भेटलेला संक्या दुसराच होता. आई-वडिलांच्या अपेक्षा आणि शाळेतील जीवघेण्या स्पर्धेने त्याच बालपण कोमेजून गेलं होतं. बंडखोर संक्या आता समाजशील प्राणी झाला होता. समाजाला अपेक्षित असलेल्या सभ्यपणाची झालर पांघरली होती. त्याच्या निरागस प्रश्नाची उत्तर समाजाकडे नव्हती. त्यामुळे त्याने परिस्थितीशी समझोता करून प्रश्न विचारणं सोडून दिल होत. त्यालाही आता खोटं खोटं हसता येत होतं.

कुटुंब, शाळा, मित्र आणि सामाजिक परिस्थिती मुलांचे व्यक्तिमत्व घडवत असतात. येथे मिळणारे अनुभव जितके सुखाचे आणि सुरक्षित असतील तेवढा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. मुलांचे व्यक्तिमत्व परिस्थितीच्या प्रभावाने विकसित होते. व्यक्तिमत्त्व सतत बदलणारी गतिमान प्रक्रिया असते. मुलांना मित्र, कुटुंब व समाजातून पोषक वातावरण मिळाले तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, धीटपणा व परिस्थितीला समोर जाण्याचा दृष्टिकोन तयार होतो. याउलट मुलांवर कठोर शिस्त, सतत टीका आणि प्रेमाचा अभाव असल्यास त्यांच्यामध्ये न्यूनगंड, भित्रेपणा, नकारात्मक विचारसरणी तयार होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही. आई वडीलामध्ये ताणतणाव असणे, मुलांमध्ये सतत दोष काढणे आणि टीका यामुळे मुले दुखावली जातात. त्यांच्यातील आत्मविश्वास, निर्णयशक्ती कमी होते. शारीरिक व मानसिक बदलामुळे प्रत्येक मुलाला परिस्थितीशी जुळवून घेता येईलच असे नाही. मुलं सतत स्वतःचा शोध घेत असतात. तिखट शब्दाचा वापर, मोठ्या आवाजात बोलणं, धारदार स्वरात आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न पालक व समाजाला उद्धटपणा वाटतो. दोन पिढ्यातील फरकामुळे विचारात सुसूत्रता नसते. त्यामुळे मुलांना समजून घेणं ही पालक आणि शिक्षकांची जबाबदारी आहे.

प्रशांत शिंदे
9673499181

- Advertisment -

ताज्या बातम्या