Blog : पक्षी, माझे सखेसोबती

0
हानपणी जेवण भरवताना आजी किंवा आईच्या तोंडी “एक घास चिऊचा, एक घास काउचा..” अशा गोड आर्जवांनी मुलांना अन्नाची चव कळायची. आणि मग इतकी सवय होते की चिऊ, काऊ, पोपट, मैना जेवणासोबत नसली की मुलांना जेवण जायचे नाही. आयुष्यात पक्ष्यांची ओळख व्हायची ती अशी.

मला मुळातच निसर्गाविषयी प्रेम. लहानपणी गड, किल्ले, खेडी यांच्याशी सततचा संपर्क होता. पुढे जावून आकाशात दिवसा पक्षी आणि रात्री ग्रह-तारे पाहण्याचा छंद लागला. नाशिकला आले आणि मला पक्ष्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली. मी एच.पी.टी. मध्ये संशोधन करत असताना माझे गाईड डॉ. बालसुब्रमण्यम आणि गाडगीळ काका यांच्यामुळे पक्षी निरीक्षणाला जायला सुरुवात झाली. पक्षी मित्र मंडळाचे थोडेफार कामही करु लागले.

तेव्हा आमच्या कॉलेजमध्येच इतके पक्षी दिसायाचे की कुठे बाहेर जायची गरज नसायची. तरी देखील नांदूर मध्यमेश्वरला वर्षातून एकदा का असेना पण भेट द्यायचो. नाशिक वाढले, झाडे कमी झाली, सिमेंटचे जंगल उभे राहिले, मोबाईल्सचे मोठे टॉवर्स उभे राहिले आणि पक्षी दिसणे कमी झाले.

ही आवड अधिक जोपासली गेली ती सध्याच्या घरात रहायला आल्यावर. आमच्या घरामागे थोडी जागा होती. पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी. परिसंस्थेचे चक्र हे अनेक घटकांमुळे जरी पूर्ण होत असले तरी यामध्ये पक्ष्यांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. सभोवताली आपल्याला समृद्ध निसर्ग हवा असेल तर झाडे लावणे आणि तीही अशी की भरपूर पक्षी येतील अशी झाडे लावणे याला पर्याय नाही.

आम्ही भरपूर झाडे लावली. अवघ्या वर्षाच्या आत पक्ष्यांची ये-जा सुरु झाली. सुरुवातीला अगदी चिमण्या दिसल्या तरी मजा वाटायची. एका वेळी अगदी तीस-चाळीस चिमण्या एकत्र यायच्या. मग कॅमेरा घेतला आणि फोटो काढणे सुरु झाले. फेसबुकवर टाकलेल्या पक्ष्यांच्या फोटोवर आलेल्या कॉमेंट्सनी एकूणच शहरी भागात पक्ष्यांचे दर्शन किती दुर्लभ झाले आहे आणि किती जणांना ते हवेहवेसे वाटते आहे याची जाणीव झाली.

आजपर्यंत आमच्या बागेत मला दिसलेल्या साधारण वेगवेगळ्या ५० पक्ष्यांचे मी फोटो काढून ठेवले, काही व्हिडिओ रेकॉर्डिंग पण केले. हळूहळू त्यांच्या सवयी, नर, मादी आणि पिल्लांचे नाते, त्यांचे कॉल्स, प्रत्येक पक्ष्याचे वेगळेपण लक्षात यायला लागले.

मला या सगळ्याची गम्मत तर वाटतेच पण निसर्गाच्या अजोड आविष्काराची प्रचीती पदोपदी येते. खंड्याचे सुंदर रंग, सुगरणीचे घरटे बांधण्याचे कौशल्य, शिक्रा पक्ष्याची भेदक नजर आणि शिकार, भारद्वाजाचा डौल आणि कोकिळेचे धूर्त वागणे जवळून पाहायला मिळते.

एकदा तर निळाशार निलांग अवघ्या दोन फुटावर बसला होता हे पाहून तर मी चाट झाले होते, किती वेळ मला आनंदामुळे फोटो काढण्याचे भानही राहिले नाही. मला हे सगळे एखाद्या थेरपीसारखे वाटते. काम करताना अधून मधून खिडकीतून ही निरीक्षणे करणे म्हणजे एक उत्तम ब्रेक असतो.

मी आमच्या परिचयातल्या लोकांना हे फोटो दाखवायला लागले. हळूहळू काही जण आमच्या बागेला भेट द्यायला लागले. मी या सगळ्या फोटोंचे पीपीटी प्रेझेन्टेशन तयार केले. लहानसा छंद माझ्यासाठी एक चळवळ बनला. पुस्तके जमा केली.

अनेक ठिकाणी खास पक्षी निरीक्षणासाठी जाऊ लागले. पक्ष्यांच्या लीलया पाहताना इतके हरपून जायला होते की अनेकदा त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ घेणेसुद्धा लक्षात राहत नाही. छंदातून जे काही मी जमा केले आहे ते संचित एक दस्तावेज आहे असे अनेक जणांनी मला सांगितले. ब्लॉगमधून इतरांपर्यंत पोहोचवायाला सुरुवात केली. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळायला लागला.

चिमणी, कावळा, कोकीळ, घार, कापशी घार, कोतवाल, साळुंकी, चष्मेवाला, शिंजीर, जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी, रामगंगा, नाचरा, शिंपी, बुलबुल, धनेश, राखी वटवट्या, सातभाई, सुभग, हळद्या, तांबट, भारद्वाज, पावश्या, पोपट, ठिपक्यांचे कबुतर, खवल्यांचा मुनिया, काळा मुनिया, पिवळा धोबी, पांढरा धोबी, हुदहुद, थिरथिरा, तीरचिमणी, दयाळ, चीरक, खाटीक, खंड्या, मुनिया, होला, ब्राह्मणी मैना, वेडा राघू, टिटवी आणि कितीतरी पक्षी हे सगळे मला सखेसोबती वाटतात.

माझ्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे नाशिकच्या आसपास अनेक ठिकाणी उत्तम पक्षीनिरीक्षण करता येते आणि नाशिकमध्ये अनेक निसर्ग प्रेमी आणि पक्षी प्रेमी आहेत. यांच्यामुळे मला पक्ष्यांच्या अनोख्या जीवनाबद्दल नेहमी प्रेरणा मिळत असते!

  • सुजाता बाबर

 

LEAVE A REPLY

*