BLOG: अहमदनगर @ 527 : सोडा वॉटर बॉटल पॉलिटिक्स सोडा…

0

अहमदनगर शहराचा रविवारी बर्थ डे म्हणजे वर्धापन दिन. तो सेलिब्रेट करण्यासाठी रसिक ग्रुपसह इतिहासप्रेमी संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. या वाढदिवशी विकासाबाबत चर्चा होते. अस्सल नगरीपणाबद्दल भरभरून बोलले जाते. मात्र पुढे होत काहीच नाही. राजकीय नेत्यांना नावे ठेवली जातात. पण नगरविकास ही लोकचळवळ व्हायला हवी. याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. नगर टाईम्सने शहरातील राजकीय विश्‍लेषक, प्राध्यापक, व्यापारी, उद्योजकांची मते जाणून घेतली. त्यांनी सूचविलेले उपाय नगरकरांनी अंमलात आणले तर नक्कीच नगरचे रूपांतर खेड्यातून मेट्रो सीटीत होईल, त्याचाच हा परामर्श.

ऐतिहासिक वारशाबद्दल अहमदनगरकरांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. परंतु हा वारसा आजच्या समाज जीवनाचा आधार बनला पाहिजे. कोणत्याही शहराच्या विकासाबरोबर त्याचा राजकीय तसेच सामाजिक, सांस्कृतिक चेहरासुद्धा विकसित होणे गरजेचे असते. तो चेहरा नसेल तर तेथील समाज कणाहीन असतो, असं समाजशास्त्र सांगतं. त्या दृष्टीने नगरचं अवलोकन केल्यास खेड्याचे शहर झालं. एवढाच सहजसोपा निष्कर्ष निघेल. शहरकडून खेड्याकडे अशी जी नगरची उलटी गंगा सुरू आहे, तिचा शोध राजकीय धुरीणांनी घेत सोडा वॉटर पॉलिटिक्स बाटली बंद केले पाहिजे.

कुठल्या शहराला मोठेपण हे सर्वांगीण विकासातून मिळते. अहमदनगर शहराच्या राजकारणाचा विचार करता नवनीतभाई बार्शीकर यांचे सातत्याने नाव घेतले जाते. त्यांनी या शहराला रूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्देवाने असे नेतृत्व लाभले नाही, असं सामान्य नगरकराचे निरीक्षण. राज्याचे राजकारण हलवणारे राजकीय नेते आहेत. परंतु ते जिल्ह्यात. शहराशी त्यांना काही देणेघेणे नसते. या अलिप्ततावादाचाही फटका नगर शहर विकासाला बसला.
हे शहर स्वतःच विस्तारत गेलं. शहरीकरणाच्या आकर्षणातून ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या वस्त्या निर्माण केल्या. परंतु ते इथल्या समाजजीवनाशी म्हणावे तसे एकरूप झालेले दिसत नाहीत. आपला नोकरी, बायको आणि पोरं एवढंच त्यांचं विश्‍व आहे. मुळात शहराच्या लोकसंख्येत व मतदारांच्या संख्येत प्रचंड तफावत आढळते. खरेतर हे मराठवाड्यातील लोकांसाठी सर्वात आवडते शहर आहे. परंतु ते एकरूप झाले नाहीत. कायम अंतर ठेवून फटकून वागत आले. इथल्या अस्मितांशी त्यांना काही देणघेणं नाही. त्यामुळे शहराविषयी आपुलकी, स्वाभीमान हे प्रकरण त्यांच्या पुस्तकात नाही. हे मुख्य कारण मानायला पाहिजे.
गेल्या 40 वर्षात नगर शहरात कुमार सप्तर्षी यांच्यानंतर स्वतःची प्रतिभा राज्यपातळीवर निर्माण करणारा नेता निर्माण झाला नाही. 25 वर्षे या शहराचा लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचा राहिला. खरतर या नेतृत्वाचा उदय आणि विकास हा आश्‍चर्यकारक मानावा लागेल. कसलीच राजकीय पार्श्‍वभूमी नसताना सलग 25 वर्षे शहराचे नेतृत्व करताना कोणताच विकासाचा मुद्दा नसताना निवडून येण्यापेक्षा निवडून देणे हीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आजही या शहराची मानसिकता त्याच अंगाने जाणारी आहे.

निवडणुकीच्या गणितात बेरीज-बजाबाकीत सामान्य नगरकरांचा झालेला हा पराभव आहे हे मान्य करावे लागेल. एकच मुद्दा सातत्याने चर्चेत ठेवणे त्याला पूरक अशा घटना सातत्याने घडवत ठेवणे हे खरेतर अतिशय सोपं. राजकीय प्रगल्भता दाखवली नाही. याला जबाबदार नगरकरच. अहमदनगर शहराचा खर्‍या अर्थाने जो इतिहास प्रत्येक नगकरांना अभिमान वाटावा असा असताना राजकारणात मात्र सौहार्द टिकून राहत नाही. मुळात अहमदनगर शहरात जी निजामशाही होती.

त्या निजामाच्या गादीवर बसलेला या शहराचा संस्थापक अहमदशाह हा ब्राह्मण होता. धर्मांतर करून तो मुस्लिम झाला, असा दाखला काही इतिहासकार देतात. त्याचा वजीर मलिकांबर तर इराकच्या बगदाद शहरातून विकत घेतलेला गुलाम होता. ज्यावेळेस अहमदनगर शहरावर मोगल सैन्य प्रचंड संख्येने चालून आले. हे शहर बेचिराख करून इथली निजामशाही नष्ट करण्याचा इरादा होता. मात्र, शहाजीराजे भोसले यांनी भातोडीच्या लढाईत बुद्धीमत्तेच्या जोरावर मोगलांचा पराभव केला. या लढाईत त्यांचे बंधू शरीफराजे धारातीर्थी पडले.
बाल निजामशाहला गादीवर नव्हे स्वतः मांडीवर घेऊन इथला कारभार पाहिला, हा इतिहासाचा दाखला देण्याचा उद्देश एकच. या शहराला कधीही धार्मिक किंवा जातीय संघर्ष माहिती नव्हता. ब्राह्मण धर्मांतरीत मुस्लिम राजा, गुलाम तुर्की वजीर व मराठा सेनापती असा ऐकोप्याने राज्यकारभार करण्याचा इतिहास या शहराला असताना हे शहर सातत्याने धार्मिक संघर्षात होरपळत राहिले.तेही राजेशाही गळून पडलेली असताना. ही खरेतर शोकांतिकाच.

शिवशाहीची बिजे याच शहराच्या मातीत रूजली. आणि औरंगजेबाला याच मातीत शेवटचा श्वास घ्यायला लावणार्‍या शूरांची ही भूमी. मात्र, आज कोणाकडून तरी आणि कोणापासून संरक्षण होईल म्हणून मतदान करणे हे भ्याडपणाच लक्षण मानायला हरकती नाही. या मानसिकतेचा अहमदनगर शहराच्या सामाजिक जीवनावर या राजकारणाचा अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम झालेला दिसतो.
शहरात वेगवेगळ्या समाजाच्या स्वत:चे वेगळेपण जपणार्‍या वस्त्या शहरात दिसतात. त्यांच्या विकासात सोई सुविधांमध्ये मोठी तफावत दिसून येते. सर्वच समाजाच्या नेतृत्वाने अतिशय जाणीवपूर्वक हे वेगळेपण जपलेले दिसेल. ती अस्मिता निवडणुकीच्या माध्यमातून समोर येतेे.

प्रा. डॉ. बाळासाहेब पवार
8805392200

या अस्वस्थतेतून अनेकदा तणाव निर्माण झालेला दिसतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने दगडफेक, मारामार्‍या त्यांना प्रसारमाध्यमांतून मिळणारे अवाजवी महत्त्व त्यामुळे हे शहर अस्वस्थ राहते. एका राजकीय अभ्यासकाच्या मते नगर शहराचे राजकारण म्हणजे ‘सोडा वॉटर पॉलीटिक्स’ आहे. प्रत्येकवेळी अल्पसंख्यांक समाज भावनेच्या भरात चुका करुन चुकीचे कौल देत राहतो. त्यामुळे शहराच्या विकासाची चर्चा बाजूला पडते. विधायक दृष्टी असलेले नेतृत्व बाजूला पडते.

त्यामुळे शहराच्या विकासात भर पडण्याऐवजी जैसे थे स्थिती राहते. सामाजिक ऐकोपा व सांस्कृतिक जडणघडणीसाठी प्रयत्न होत नाहीत, असे नाही. परंतु अहमदनगर शहराची सांस्कृतिक चळवळसुद्धा उच्चभू्र वर्गीपुरती मर्यादित राहिलेली दिसते. शहरातील कोणतेही सार्वजनिक ठिकाण असेल रस्ते असतील चौक असतील त्याला आपल्याच लोकांची नावे देण्यापलीकडे व स्वजातीय बांधवांचे कौतुक सोहळे करण्यापालिकडे ही चळवळ मजल मारू शकली नाही. या प्रवाहाने सर्वांना आपल्या बरोबर घेतले नाही.

त्यामुळे या शहराच्या सांस्कृतिक चेहरा बहुआयामी झाला नाही. ख्रिश्‍चन, मुस्लिम, पद्मशाली समाजाची खूप मोठी लोकसंख्या असणार्‍या या शहरात या समाजाला सर्वच प्रवाहापासून अलिप्त ठेवले गेले किंवा ते स्वत:हून अलिप्त राहिले असे म्हणावे लागेल. प्रबोधनाची चळवळ एकाच समाजात असून चालत नाही तरी सर्व बाजूंनी असली पाहिजे.

शहराचा थांबलेला विकास, औद्योगिक वसाहतीची वाताहत, बहुजन समाज असेल किंवा अल्पसंख्यांक समाजातील कट्टरवादाला बळी पडत असलेली तरुण पिढी या धोक्याचा सर्व समाज घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

(लेखक हे न्यू आर्टस महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.)

 

LEAVE A REPLY

*