BLOG: अहमदनगर @ 527 : आम्ही नगरी… महानगरी होणार कधी!

0

अहमदनगर शहराचा रविवारी बर्थ डे म्हणजे वर्धापन दिन. तो सेलिब्रेट करण्यासाठी रसिक ग्रुपसह इतिहासप्रेमी संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. या वाढदिवशी विकासाबाबत चर्चा होते. अस्सल नगरीपणाबद्दल भरभरून बोलले जाते. मात्र पुढे होत काहीच नाही. राजकीय नेत्यांना नावे ठेवली जातात. पण नगरविकास ही लोकचळवळ व्हायला हवी. याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. नगर टाईम्सने शहरातील राजकीय विश्‍लेषक, प्राध्यापक, व्यापारी, उद्योजकांची मते जाणून घेतली. त्यांनी सूचविलेले उपाय नगरकरांनी अंमलात आणले तर नक्कीच नगरचे रूपांतर खेड्यातून मेट्रो सीटीत होईल, त्याचाच हा परामर्श.

 

सर्वच शहरांना बर्थ डे माहिती असतो असे नाही. आपल्या अहमदनगरचा माहिती आहे, हे भाग्य. कैरो, इजिप्त अशा शहरांशी व्यापार चालायचा म्हणजेच आपल्याकडे सुबत्ता होती. शहरातील कारंजी ऐश्‍वर्याची साक्ष देतात. हे शहर देशाच्या नकाशावर यायला हवं होतं. पण आपण सध्या आहोत कुठे? कशामुळे लागली ही उतरती कळा, याचा शोध घेतला तर आपल्या पराभूत मानसिकतेत सापडेल. केवळ राजकीय पुढार्‍यांना दोष देऊन चालणार नाही. ही जबाबदारी कॉमन मॅनलाच खांद्यावर घ्यावी लागेल. तशी चळवळ उभी राहायला हवी. त्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल एवढंच.


आपण बरं आणि आपलं काम बरं. शहर विकास किंवा डेव्हलपमेंट याच्याशी काही देणघेणं नाही, अशाच मानसिकतेत इथला सामान्य माणूस जगतो आहे. माझं भलं झालं ना मग कशाला भाजायच्या लष्काराच्या भाकरी. सर्वप्रथम ही मानसिकता बदलायला पाहिजे. इथल्या तरूण हुशार नाही का, इथल्या लोकांमध्ये स्किल नाही का.. सर्वकाही आहे इथे मग अडते कुठे?
आपल्याला समृद्ध वारसा आहे सर्वच बाबतीत. पण त्याचा आपल्याला अभिमानच नाही. आणि अभिमान नसेल तर शहराविषयी आपुलकी वाटत नाही, हे माझं निरीक्षण आहे. अनेकजण शहर सोडून गेले, त्यात उद्योजक, खेळाडू, कलाकार आहेत. आम्ही नगरकर म्हणून अभिमानाने मिरवणार कधी? आपल्या मातृभूमीचा अभिमान वाटत नसेल तर हा कृतघ्नपणा आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी कोणत्या राजकीय पुढार्‍याची गरज नाही. ते आपले आपण करू शकतो. दुसर्‍याने काय केले यापेक्षा मी काय योगदान दिले, याचे सिंहावलोकन केले पाहिजे आजच्या पिढीने.
कोणताही उद्योग रूजवायचा झाल्यास त्याला अगोदर सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा हव्या असतात. त्या आपण देतो का, उद्योजकांना काय हवंय, काय नकोय याचा विचार केलाय का. आपल्याकडे मनुष्यबळ आहे, जागा आहे मग असे का होते? उद्योग धडादड बंद पडत आहेत, एमआयडीसी मोकळी होत आहे. याचा विचार आपण कॉमन नगरकर विचार करणार आहोत की नाही. राजकीय पुढारी काम करीत नसतील कदाचित पण आपण हे रोखण्यासाठी काय केलं हा सवालही स्वतःला विचारायला हवा. उगाच औरंगाबाद,

वसीम हुंडेकरी
9604566666

नाशिकसारखी शहरं मागून पुढे गेली, असं दूषण देण्यात काहीच हाशील नाही.
उद्योगामुळे नोकर्‍या वाढतात. परिणामी लोकांच्या हाताला काम मिळाल्याने गुन्हेगारीलाही आळा बसतो. करमणुकीसाठी, विरंगुळ्यासाठी नवीन साधनं निर्माण होतात. परंतु आपल्याकडे आहे का असं. इथलं शिक्षण राज्यात प्रसिद्ध आहे. मग हे शहर एज्युकेशन हब म्हणून पुढे यायला हवं होतं. साधं मेडिकल कॉलेज नाही, सामान्य माणसाला उपचार मिळतील असं अल्प दरात सुविधा देणारं हॉस्पिटलही नाही. काही संस्थाचालकांनी आता प्रयत्न सुरू केलेत. पण ते यापूर्वीच व्हायला हवे होतं. दहावी-बारावी नाही तर डिग्री मिळवायची. सुशिक्षित बेकार म्हणून मिरवायला मोकळा. नाही तर घेतली एखादी रिक्षा, टाकली रस्त्याकडेल टपरी एवढीच उद्योजकता.

आज शहर विस्तारतंय. लोकांना वेळ कमी आहे. त्यांना सेवा देणार्‍या इंडस्ट्री विस्तारास मोठा वाव आहे. पाण्याच्या टाक्या साफ करणं, पेस्ट कंट्रोल, दळण आणणं, गॅस टाकी आणून देणं, डेली नीड भागवणं असं काहीही सुरू करता येऊ शकतं. त्यासाठी फार भांडवल लागतं अशातला भाग नाही. जग बदलतं आहे, त्याच्या वेगाने धावते आहे. तो स्पीड आपल्याला पकडता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकीय वरदहस्त असला पाहिजे,असं नाही.
नगरमध्ये ऐतिहासिक स्थळं आहेत. त्यांच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. गाईड, सहलींसाठी टुरिझम म्हणून नवा उद्योग सुरू करता येईल, खाद्य संस्कृती बहरेल. त्यातूनही लोकांना रोजगार मिळेल. या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागेल. आपण तसे करीत नाही. नावं ठेवणं,फालतू गोष्टीत जास्त इंट्रेस दाखविण्यातच आपल्याला रस आहे. ठीक आहे काही लोकांना नसेल इथे रोजगार. पण जे बाहेर पडले आहेत. त्यांनी आपल्या गावातल्या लोकांना शहाण करण्याचं काम हाती घ्यायला काय हरकत आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तसे करू शकतो. हे करायला कोणी अडवलंय. शहराविषयी आस्था असेल तर नक्की होईल बदल मानसिकतेत.
इथल्या लोकांची पेईंग कपॅसिटी नाही,अशी बोंब मारली जाते. परंतु ते खोटं आहे. दिवसेंदिवस नवी शो रूम येताहेत. हॉटेल सुरू होताहेत. मग स्कोप नाही असं कसं म्हणता येईल. बिग बझारचा मॉल आला होता त्यावेळी लोकांनी नाकडोळे मोडले. हे नगरचं कल्चर नाही. फार दिवस ते चालणार नाही, अशी काही लोकांची धारण होती. पण पडला का तो मॉल बंद. उलट किराणा दुकानदारांनी स्पर्धा करीत सुपरमार्केट उभारली. तीही चालताहेत ना. आपल्याकडे सर्व आहे पण सावध होत उठून उभं राहिलं पाहिजे. विशेषतः तरूण मंडळींनी. तरच स्पर्धेच्या जगात टिकून राहता येईल.

(लेखक हे हुंडेकरी उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.)

LEAVE A REPLY

*