BLOG : घसरणारा उद्योग!

0

राजकारणाचा उद्योग नेहमीच एकमेकांवर घसरणारा. दुसर्‍यापेक्षा आपण कसे उत्तम हे दाखविण्यासाठी राजकीय नेते कोणते दाखले, कधी वापरतील याचा नेम नाही. मात्र या मुद्यांमध्ये अनावधानाने का होईना, एखादा उपयोगाचा निघतो. खासदार दिलीप गांधी यांनी काल असाच एक मुद्दा समोर आणला आहे. नगरच्या औद्योगिक पतनास कारणीभूत असलेल्यांवर त्यांनी भाष्य केले. रोख अर्थातच शिवसेना आणि माजी आमदार अनिल राठोड! मालमत्ता कराच्या वसुलीसाठी नगर महापालिकेने नगरमधील काही मालमत्ता सील केल्या. त्यात कायनेटीकचा समावेश आहे. या शहराने उद्योजकतेचे पहिले पाऊल टाकले, ते कायनेटीकच्या निमित्ताने! एकाअर्थी या शहराच्या औद्योगिक विकासातील पहिल्या टप्प्यातील प्रतीक म्हणजे ही कंपनी. पण 3 कोटीवर मालमत्ता कराच्या निमित्ताने महापालिकेने कारवाईचे पाऊल उचलले. येथे सेना आणि भाजपाची संयुक्त सत्ता नांदते! या दोघांना आता कायनेटीकच्या कामगारांचा कळवळा आला आहे. सेनेने त्यासाठी मोर्चा काढला. हा मोर्चा म्हणजे सेनेचे नाटक होते, हे खा.गांधी यांनी केलेले विश्‍लेषण! एवढेच नव्हे तर उद्योजकांना केलेली मारणार, त्यामुळे कंपन्यांनी नगरमधून घेतलेला काढता पाय, उद्योग क्षेत्रात या शहराची झालेली बदनामी या मुद्यांनाही खा.गांधी यांनी हात घातला. नगरच्या औद्योगिक इतिहासातील वास्तव नगरकरांना ठावूक आहेच! खा. गांधी यांनी त्याला उजाळा दिला. हे पण बरेच झाले. कधीतरी मागे वळून पहावे लागणार आहे. तरूणांच्या फौजा तयार होत असताना त्यांच्या हाताला काम देण्याची सोय करावी लागणार आहे. अपेक्षा राजकीय नेत्यांकडूनच केली जाणार. मात्र आपले उद्योग वाढीचे राजकीय धोरण कामगार हिताची जपणूक करताना कधी उद्योगाच्या मुळावर उठते, याची जाणीवच होत नाही. कामगार हीत हा प्राधान्यक्रम असलाच पाहिजे. बहुधा आता सेनेलाही ते कळले असावे. पण त्यासाठी उद्योग टिकावा लागतो. तो मोडून हित कसे साधणार? गेल्या दोन दशकात नगरच्या औद्यगिक वाढीचा वेग अगदीच मंद आहे. तो वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झालेच नाहीत. संवाद, चर्चेच नाटक तेवढं वठवलं जातं! पुढे काय, याचे उत्तर उद्योजकांनाही मिळत नाही. अद्यापही हे शहर उद्योगवाढीसाठी योग्य आहे, हा विश्‍वास गुंतवणूकदारांना देता आलेला नाही. यासाठी कोणतीही योजना येथील राज्यकर्त्यांमध्ये नाही. कोणी तसा प्रयत्न केलाच तर त्याच्यावर संकट ओढावले म्हणून समजा! आता येथील नागरिकांनी, विशेषत: तरूण नागरिकांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. किती दिवस रोजगारासाठी पुुण्या-मुंबईची वारी करायची? आपल्यासाठी या शहरातच रोजगार का विकसीत होत नाही? त्यासाठी प्रयत्न का होत नाही? याचा जाब त्यांनी येथील तथाकथीत नेतृत्वांना विचारायला हवा! कायनेटीकच्या निमित्ताने सुरू झालेली चर्चा पुढे नेण्याचा याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही!

LEAVE A REPLY

*