BLOG: नावात काय आहे?

0
नावात काय आहे?…जगप्रसिद्ध लेखक विलियम शेक्सपियर यांचा गाजलेला प्रश्‍न! आता याचा नगरशी काय संबंध? तर शहराच्या नावावरून सध्या पडणार्‍या मागणीच्या ठिणग्या. अलिकडच्या काळात अस्मितेच्या आगीवर राजकारण तापवण्याचा प्रघात बर्‍यापैकी वाढला आहे.

अस्मिता आणि त्यांची प्रतीके वापरून समाज ढवळता येतो, हे सिद्धही झाले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आणि राजकारण्याला नव्या अस्मितांचा शोध घेत आपले स्थान मजबूत करण्याची झालेली घाई नजरेस पडले.

नवे प्रकरण अहमदनगर शहराच्या नामांतराशी निगडीत! शिवसेनेने शहराचे नामकरण श्रीरामनगर करावे, अशी मागणी करत नव्या विषयाला तोंड फोडले आहे. त्यात आता राष्ट्रवादीतील पदाधिकार्‍याने ‘वैयक्तिक’ उडी घेत नामांतराच्या मागणीची हनुमानउडी लांबवर जाण्याचे संकेत दिले आहेत.

मुळात नगर शहरातील राजकारणाशी या मागणीचा थेट संबंध आहे. या शहरावर गेली अडीच दशके शिवसेनेने वर्चस्व राखले. किंबहुना अनिल राठोड यांचे नगर शहरातून आमदार होणे, ही एकप्रकारे दंतकथा होण्याच्या मार्गावर होती. 2014च्या विधानसभेने अपघाताने ती मोडली. राठोड पराभूत झाले. तो एकप्रकारे धक्काच होता. त्यानंतर या शहरावर वर्चस्वाचा एक छुपा खेळ सुरू झाला. कधी गणेश विसर्जन तर कधी रामनवमी मिरवणुकीच्या निमित्ताने या खेळातील मोहरे आपल्या उपद्रवाची ‘चुणूक’ दाखवत आले आहेत.

गेल्या दोन वर्षात शहरातील रामनवमीच्या मिरवणुका नजरेत भरणार्‍या ठरल्या. या मिरवणुकांमध्ये खा.दिलीप गांधी यांच्या पाठीराख्यांचा वावरही नोंद घेण्यासारखा! तर गणेश विसर्जन मिरवणूका भव्य करण्याकडे आधी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड आणि अलिकडे राष्ट्रवादीचे विद्यमान आ.संग्राम जगताप यांचा कटाक्ष! थोडक्यात काय तर ‘भक्तीतील शक्ती’ येथील राजकारण्यांना चांगलीच अवगत आहे. दीड-दोन वर्षांनी महापालिका निवडणुकीचा पट सजेल. त्यासाठी काही मुद्देही लागतील. नवा असेल तर उत्तम! जुनं किती दिवस उगाळणार? त्यामुळे सेनेने आघाडी घेत एक नवा मुद्दा शहरवासीयांना दिला आहे.त्यांना काय प्रतिसाद मिळतो, हे अद्याप स्पष्ट नसताना थेट राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍याने सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी भुमिका मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरे तर लिखीत इतिहास असलेल्या मोजक्या शहरांपैकी अहमदनगर एक! आगामी 28 मे रोजी शहराचा स्थापनादिनही साजरा होईल.

त्याच्या तोंडावर ही मागणी येते, सोबत शहराच्या इतिहासाला थेट रामायण काळाशी जोडण्याचा प्रयत्न होणे नक्कीच दुर्लक्षून चालणार नाही. सेनेने आपली मागणी केवळ चर्चेपुरती आणि निवेदनात अडकवून चालणार नाही. त्यांना त्यासाठी आपल्याच सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. पण प्रश्‍न आहे तो, यातून काय साधणार? गेल्या तीन दशकात नगर शहराची प्रगती यथातथाच! नव्या योजना नाहीत. कल्पक विकास नाही. कंपन्यांसाठी आश्‍वासक वातावरण नाही. त्यामुळे तरूणांच्या हाताला काम नाही. हे शहर चांगल्या अर्थाने बदलत नाही, हा आक्षेप तर खुद्द येथील नागरीकांचाच! तेव्हा नामकरणाने यात काय बदल घडणार? पहुडलेले शहर कसे धावायला लागणार? नागरी प्रश्‍न चुटकीसरशी मिटणार का? मुळात मानसिकता बदलणार का, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने समोर येतील.

या प्रश्‍नांची उत्तरे अर्थातच मागणी करणार्‍यांनी द्यायची आहेत. केवळ कागदी मागणीपलिकडे याचे स्वरूप नसेल तर त्यासाठी जनतेने आपला वेळ का घालवावा?

LEAVE A REPLY

*