BLOG : पुरूषोत्तम अन् पुरूषार्थ

0

गर शहराला आपलेच लोक गाव खेडं म्हणून हिणवतात. स्वतःला नगरी म्हणून घेणं अनेकांना हल्ली मागासलेपणाचे वाटते. बाहेर जाऊन मोठे साहेब, शेठ झालेले तर बहुतेकजण आपला हा ‘नगरी’ बाज लपवतात. आणि ज्यांनी गावकूस सोडले नाही त्यांना नगरी ते नगरीच अशी सांस्कृतिक शिवी घालून आपला डबल स्टँडर्डपणा मिरवतात. खरे तर नगरीपणा हा मिरवण्याची बाब. शाहू मोडक, सदाशिव अमरापूरकर, मामासाहेब तोरडमल, मिलिंद शिंदे, मधु कांबीकर यांनी तो नगरीपणा मिरवला. राम नगरकरांची नगरी नगरी तर आजही चर्चेत आहे. या नगरीपणाला मागच्या आठवड्यातील घटनांमुळे कोंदण मिळाले. एक होती क्रिकेटच्या मैदानातील. तर दुसरी होती रंगमंचावरील. न्यू आर्टस महाविद्यालयातील कृष्णा वाळके, विराज अवचिते अँड टीमने पुण्यातील मानाचा पुरूषोत्तम करंडक जिंकून कला जगताला मान वळवायला लावली. त्यांनी सादर केलेल्या संदीप दंडवते लिखित माईक एकांकिकेचा आवाज राज्यभर घुमला. एवढे सारे गुणी कलाकार आपल्या नगरीत असताना आपण उगाच त्यांना कल्लाकार म्हणून नावे ठेवण्याचा वावदूकपणा करतो. कलागुणांऐवजी त्यांच्यातील उखाळ्या पाखाळ्यांचीच चर्चा अधिक होते. खरे तर तो आपल्यातील कोतेपणा. तो वारंवार दाखवून कलाकारांना, क्रीडापटूंना नाउमेद करीत असतो. 1980 साली कळकीचे बाळ, त्यानंतर पुढच्याच वर्षी 1981मध्ये गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैतने पुरूषोत्तम जिंकून नगरी पताका फडकावली होती. माळीवाड्यातील विजय दळवी यांची ही कलाकृती. तर दुसरे म्हणजे क्रिकेटच्या मैदानात तेजतर्रार गोलंदाज अनुपम संकलेचा याने पुरूषार्थ गाजवला आहे. दुलीप करंडकात त्याची इंडिया ग्रीन संघात निवड झाली आहे. रणजी करंडकात त्याने महाराष्ट्राकडून खेळताना तब्बल 50 बळी मिळवले होते. याच कामगिरीची दखल घेत निवड समितीने त्याची दखल घेतली. मात्र, या घटनेला क्रिकेटप्रेमींनी फारसे डोक्यावर घेतलं नाही. याचेच खरेतर आश्‍चर्य आहे. अनुपम पूर्वी श्रीरामपूरच्या झहीर खानने टीम इंडियात नगरचा झेंडा रोवला होता. संबंधितांचे हे वैयक्तिक यश असले तरी तो सार्‍या गावासाठी अभिमान असतो. गावानेही त्यांच्या या पराक्रमाकडे डोळसपणे पाहून किमान कौतुक करण्याचा पुरूषार्थ केला पाहिजे. कारण भावी पिढीसाठी ते दिशादर्शक असतात. अनुपम आणि माईकच्या टिमने इतिहास रचला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार संग्राम जगतापांनीच काय तो सत्कार केला. मात्र, यावरच न थांबता सुविधांनी सज्ज असे कलामंदिर आणि क्रिकेट मैदान उभारण्याकडे लक्ष द्यावे. नाही तर त्यांचे कौतुकही वांझोटेच ठरेल.

LEAVE A REPLY

*