BLOG : शोभेची ‘बाहुली’

0

कोणाची नजर लागू नये यासाठी घराला, वाहनाला अपघात होऊ नये म्हणून काळी बाहुली बांधली जाते. यातून नेमका किती बचाव होतो हा संशोधनाचा विषय. ही श्रद्धा की अंधश्रध्दा हा वादाचा विषय असला तरी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही महापालिकेवरून उतारा केला.

अधिकार्‍यांच्या गळ्यात काळे फडके टाकून काळी बाहुली भेट दिली. आमदारांची ही कृती निषेधार्थ असली तरी त्यातून अनेक अर्थ निघतात. आता कोणाची तरी महापालिकेला नजर लागली. मग पूर्वी सारे अलबेल होते की काय? नजर लागली असेल तर ती कोणाची? अन् लागलेल्या नजरेचा जगताप यांना साक्षात्कार झाला कसा? या प्रश्‍नांसाठी त्यांच्याकडे काही उतारा आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. ‘बाहुली’ देऊन त्यांना नेमके कोणावर निशाणा साधायचा होता. महापालिकेचे पदाधिकारी की अधिकारी बाहुले बनलेत, असे त्यांना सूचवायचे नाही ना? महापालिकेच्या ‘गल्ल्याला’ कोणाची नजर लागली की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे! कोणी किती काही म्हणत असले तरी महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याचे जे चित्र रंगवले जाते तसे नक्कीच नाही. जमा-खर्चाचा अवमेळ झाल्याने त्याचे गणित बिघडले हे नाकारता येत नाही.

कुटुंबप्रमुख घरखर्च भागविताना मांडतो ते गणित वापरले की प्रश्‍न चुटकीसरशी सुटेल. पण तेच ‘कमाई’चे बघत असेल तर दाद कोणाकडे मागायची. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती पदाच्या खुर्चीत जो कोणी बसतो तो फक्त ‘कायद्याचे’ बोलत असतो. हा अनुभव नवा नाही. या भाषेमुळे पदाचे ‘बाहुले’ कधी होते हे त्यांनाही कळत नाही. महापालिका न उमगणार्‍यांच्या हातात गेली की काय होते, हे नगरकरांनी आतापर्यंत अनुभवले आहेच. महावितरण कंपनी अन् त्यापाठोपाठ पाटबंधारे विभागाने थकबाकी वसुलीसाठी कनेक्शन कट करून महापालिकेचे नाक दाबलेे. त्यामुळे महापालिका गुदमरून गेली आहे. महापालिकेला घरघर लागलीय तरीही ‘देणी’ तशीच आहेत.

आजपर्यंत ‘देणी’ मिळावी यासाठी प्रशासनाला धारेवर धरणारे ‘ठेकेदार मात्र कोणतेच आंदोलन करत नाही’ हे मात्र खटकणारे आहे. त्याअर्थी त्यांचे ‘पोट भरले’ असावे असे समजायचे का? तसे असेल तर टक्केवारीच्या ‘खेळात’ महापालिकेचे ‘बाहुले’ झाले असा अर्थ काढला तर चुकीचे ठरू नये! पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेली महापालिका नगरकरांच्या नजरेत शोभेची ‘बाहुली’च झाली आहे. कोणीही यावं अन् टपली मारून जावं’ असं चित्र महापालिकेत दिसतं आहे. ते का झालं याचं आत्मचिंतन मात्र कोणीच करायला तयार नाही, हे नगरकरांचे दुर्भाग्य!

LEAVE A REPLY

*