BLOG : ‘मृग’जळ?

0

गेले काही वर्षे पावसाने हात दाखवल्यामुळे आपण पोळलो. अर्थ घडी विस्कटली. शेतीचे नुकसान झाले. बाजार अडखळला. गेल्यावर्षी पाऊस चांगला होता. पण मग काही धोरणी(?) निर्णयांमुळे कोंडी झाली. अद्याप व्यवस्थेची गाडी रूळावर आलेली नाही.

अलिकडे शेतकरी संपाने जो उद्रेक उफाळून वर आला, त्यासाठी गेल्या 5 वर्षात बिघडत जाणारी घडी देखिल कारण होतीच! सलग 3 ते 4 वर्षे दुष्काळाला सामोरे गेल्याने झालेले नुकसान एकाच वर्षात भरून येणे कठीण. यावर्षी पाऊस आश्‍वासक आहे. हवामान खात्याचे अंदाज हिंमत बांधणारे आहेत. सरासरीच्या 100 टक्के पावसाचे भाकीत असल्याने पेरण्या उत्तम होतील, अशी आशा आहे.

मान्सूनच्या पावसाने नगर जिल्ह्यातही धडक मारली आहे. अवघ्या 5 दिवसात मृगाच्या सरींनी सरासरी पावसाच्या 20 टक्क्यांचा आकडा गाठणे आनंददायीच! यंदा पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. याच काळात गेल्यावर्षी पावसाची सरासरी हजेरी 10 टक्के होती, यावरून यंदा वरूणराजाने प्रारंभालाच दाखवलेली कृपा लक्षात यावी! नेवासा, राहता तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला आहे. थोड्याबहुत फरकाने जिल्ह्यात सर्वत्र कोसळलेल्या पाऊससरींनी पुन्हा उमेद बांधण्याचे बळ दिले आहे.

कृषीमालाला भाव मिळेल की नाही, याबाबत शंका असली तरी बळीराजा संपानंतर पुन्हा मशागत आणि पेरणीसाठी जोमाने कामाला लागला आहे. सोयाबीन आणि कपाशीची लागवड मोठी राहील, असा अंदाज आहे. यंदा ऊसाचे पिकही मोठ्या प्रमाणावर हाती येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगामही उत्तम राहण्याची चिन्हे आहेत. दुग्धव्यवसायासाठीही पुढील काळ चांगला ठरेल, असे म्हटले जाते. देशाची अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत आहे.

राष्ट्रीय सकल उत्पन्नाने संपलेल्या आर्थिक वर्षात दोन टक्क्यांनी गटांगळी खाल्ली! याचा परिणाम शेतीव्यवस्थेवरही अपरिहार्य आहेच! पुढे देशभर जीएसटी लागू होणार आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. एकूणच देशाच्या अर्थव्यवस्था मंदावलेली असताना आणि नवे प्रयोग सुरू असताना पावसाने दिलेली साथ महत्त्वाची ठरते. यंदा वरूणकृपा उत्तम राहावी, अशी प्रार्थना करतानाच सध्याची सुरूवात मृगजळ ठरू नये, अशीही कामना करूया!

LEAVE A REPLY

*