BLOG : मी अहमदनगर महापालिका बोलतेय…

0

मी महापालिका बोलतेय…
दि. 30 जून 2003 रोजीच्या रात्री नगरला माझे आगमन झाले. महापालिका शब्दाने सगळे नगरकर हुरळून गेले. फटाके फोडून माझे स्वागत झालं. बघता बघता मी 14 वर्षाची झाले. या काळात मी बरेच भले-बुरे अनुभव घेतले. शहाण्यांनी माझा उपयोग करून घेण्याऐवजी ‘वापर’ केला. त्यामुळेच आजही आम नगरकरांना मी सुख-सुविधा देऊ शकले नाही, ही खंत आजही मला मनाला बोचते. त्याला कोण कारणीभूत आहे हे तुमचं तुम्ही शोधा. सात महापौर, आठ आयुक्त (त्यातही तीन आयएएस) यांनी माझ्यावर सत्ता गाजविली. त्यांनी केलेल्या घोषणांना तुम्ही भुललात तसं मीही. माझ्या नावाने कराचा बोजा तुमच्या माथी मारला पण त्यातून विकास करावयाचा असतो याचे भान राज्यकर्त्यांना राहिले नाही. तुम्हीही त्याचे स्मरण त्यांना करू दिले नाही, याला काय म्हणायचं?
माझं नाव लांबलं तसं शहरही पसरलं, पण त्यासोबत आला बकालपणा. कोणी छोटं शहर म्हणतं, कोणी मोठं खेडं म्हणून हिणवतं. पण कोणालाच काही वैषम्य वाटत नाही.
आयुक्तांनी धडाकेबाजपणा दाखवित नेहरू भाजी मार्केट, दिल्लीगेटबाहेरीला गाळे भूईसपाट केले. पण तेथे नवनिर्माण करण्याचा विसर त्यांना पडला. पहिल्यावर्षी 75 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक झालं. त्यात हवा भरवून आता ते साडेपाचशे कोटीच्या पुढे जावून धडकले. वसुली मात्र शून्य. वसुलीसाठी कोणी अधिकारी हात धुवून नगरकरांच्या मागे लागला की त्याला सत्ताधारी आडकाठी करतात. त्यामुळे प्रमोटीव्ह असो की डायरेक्ट आयएएस कोणताही आयुक्त आला तरी मागील पानावरून पुढे.. सुरूच राहिले. त्यामुळेच नगरकरांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली आजही मी दबलीय, गुदमरलेलीय. जुनाट खरे तर ऐतिहासीक असलेल्या इमारतीमधून मला नव्या इमारतीत आणले गेले. पण तरीही मी नगरकरांना काही देऊ शकले नाही. जकातीचा मलिदा गेला अन् तुटपुंज्या अनुदानावर, सत्ताधार्‍यांनी आणलाच तर मिळालेल्या निधीवर माझी गुजराण सुरू आहे दात टोकरून पोट भरल्यासारखी. सत्ता फक्त मिरवण्यापुरती याच भावनेतून आजपर्यंतच्या महापौरांनी माझ्याकडे पाहिलं. कारभार्‍याने उत्पन्न वाढवायचं असतं, उधारी गोळा करायची असते, हे काम आपलं नाहीच, असे ते मानित आले. उलट खर्चाचे आकडे वाढवित राहिले. खरी, खोटी बिले निघाली. मी आपली मुकपणे सगळं पाहत राहिले. त्यामुळे मी तसे पाहिले तर कर्जबाजारीच झाले आहे. शुध्द, मुबलक पाणी तुम्हा नगरकरांना मिळावे ही माझी मनोमन इच्छा. पण सात वर्षापासून सुरू असलेली फेज टू पाणी योजना अजूनही पूर्णत्वाकडे जात नाही, हे माझे अन् तुम्हा नगरकरांचे दुर्भाग्यच.
माझ्याकडे तुम्ही (रस्ते, पाणी, वीजेसारख्या पायाभूत सुविधा) आस लावून बसलेत. पण देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. सदानकदा माझी झोळी फाटकीच. सगळेच ‘वाटेकरी’ तयार झाल्यावर मी तरी काय करणार?
बारा गावाची शिव माझ्यात मिसळण्यात आली. माझं कुपोषण होऊ नये म्हणून ‘सरकार’ मला अनुदानाचा बुस्टर डोस देणार होतं. बुस्टरचे ते इंजेक्शन त्यांना अजून सापडलं नाही. मी राहिले कुपोषित मुलासारखी तशीच. तरीही कोठी, बालिकाश्रम रस्ता, केडगाव देवी रस्ता, बुरूडगाव रस्त्यावर शॉपिंग कॉम्पलेक्स, स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत, गंगा उद्यानासारखी कामे करून सिटीचा लूक देण्याचा प्रयत्न केला. मला निरंतर तुमच्यासाठी झटायचंय. पण आधी तुम्ही शहाणेसुरते कारभारी निवडायला शिका. मग बघा मी कशी बाळसं धरते ते.

LEAVE A REPLY

*