BLOG : निर्भयाचं वर्षश्राद्ध..!

0

कोपर्डीतील निर्भयाचं आज वर्षश्राद्ध. वर्षानंतर पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. सरकारने काय आश्‍वासनं दिलं. कोणत्या संघटनेने काय केले याचा हिशेब तिच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने प्रसार माध्यमांनी मांडला. सरकारी आश्‍वासनं नेहमीप्रमाणेच लालफितीत अडकली. पोलीस चौकीला, दवाखान्याला जागा नाही. विद्यार्थी विम्याचं काय झालं हे यंत्रणेला अजून सांगता आलेलं नाही. घटनेनंतर राष्ट्रीय नेत्यांपासून गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी कोपर्डीत पायधूळ झाडली. काय झालं, कसं झालं, असे सवाल करीत पुन्हा एकदा पीडितेच्या कुटूंबाच्या दुःखावरची खपली काढली गेली. पीडित ही मराठा समाजातील. जातीत, भावबंदकीत, पक्षात, संघटनांत विखुरला गेलेला मराठा कोपर्डीनंतर एकत्र झाला. न भूतो असे क्रांती मोर्चे निघाले. एक मराठा लाख मराठा अशी गर्जना आसमंतात दुमदुमली. यातून मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली. किती मागण्यांची पूर्तता झाली. कोणी कशी पोळी भाजून घेतली. हा भाग अलाहिदा. पण एकंदर निर्भयामुळे संपूर्ण समाजजीवन ढवळून निघालं. लाखोंची गर्दी जमते म्हणाल्यावर सरकार हादरलं. आकडेवारीचे नवनवे उच्चांक गाठले गेले. आता तर या दुःखाचं सेलिब्रेशन होतं की काय असा मोड आलाय. कोपर्डीत निर्भयाचं स्मारक होऊ घातलंय. गावातल्या मुली स्मारकात दररोज दिवा तेवत ठेवतात अन नैवेद्यही दाखवतात. काहींना हे दैवतीकरण वाटतंय, तर काहींना मराठा स्त्रीयांच्या अब्रूवरील अत्याचाराचं प्रतीक वाटायला लागलंय. यावरून भेदाभेद सुरू झालेत. अगोदरच मोर्चेकर्‍यांनी श्रेयवादातून एकमेकांची डोकी फोडलीत. आता त्याची पुनरावृत्ती होणारच नाही, असे छातीठोकपणे सांगेल याची शाश्‍वती नाही. निर्भयामुळे एकत्र आलेल्या मराठा समाजाची मोळी विस्कटली गेली असली तरी अनेक चांगल्या गोष्टी घडून गेल्या. मराठा शेतकर्‍यांना आपल्या प्रश्‍नांची जाणीव झाली. तरूण जागा झाल्याने तो किमान सोशल मीडियावरून का होईना आपल्या नेत्याला जाब विचारायला लागला. मोर्चासाठी केलेल्या लोकवर्गणीतून तब्बल पाऊण कोटी उरले. यातून गरीब मराठा तरूणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, सांस्कृतिक भवन उभारायचंय. वर्षभरात त्यासाठी अजून जागा सापडली नाही, हा भाग वेगळा. एकंदर मराठा क्रांती मोर्चाने सारा समाजच ढवळून काढला. त्यातून शेतकरी आंदोलन उभे राहिलं. इतर राज्यातील किसानांच्या आंदोलनालाही त्याने हवा दिली. हे कोणी नाकारू शकणार नाही. हो, नाही म्हणणार्‍या राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केलीय. खोट्या अ‍ॅट्रोसीटीचा मुद्दा चर्चेत आला. परंतु दुसरीकडे निर्भयाचे मारेकर्‍यांना अद्यापि सजा झालेली नाही. एवढं घडूनही सर्व समाजातील मुली सुरक्षित नाहीत. यासाठी समाजशास्त्रज्ञांनी व्यवस्थेवर चिंतन करण्याची गरज आहे. अन्यथा दरवर्षी कोपर्डीसारखी प्रत्येक गावात पुण्यतिथीचा इव्हेंट व्हायचा.

LEAVE A REPLY

*