BLOG : आता ‘इंडिया’ हटाव मोहीम!

0

पल्या देशात सरकारी मोहिमांचे नाव बहुदा इंडिया नावावर अधिक केंद्रीत असतात. काँग्रेसला ती सवय होती, तशी आताच्या सरकारलाही आहेच! अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना स्व.प्रमोद महाजन यांची शायनिंग इंडियाचे उदाहरण अद्याप आठवणीत आहे. अर्थात या फुग्यातील हवा देशातील नागरिकांनी काढून घेतली. तरिही असे फुगे फुगविण्याची हौस कोणतेही सरकार चुकवत नाही. अलिकडे स्टार्टअप् इंडिया, डिजिटल इंडिया अशा काही सरकारी मोहिम सुरू आहेत. तर विषय आहे इंडियाचा. या शब्दावर अलिकडे सरकारची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपत्ती आहे. इंडिया नको भारतच म्हणा, असा त्यांचा आग्रह! याचा वारंवार पुनरूच्चारही होतो. सगळे कसे शुद्ध असले पाहिजे, हा विचार यामागे असावा. नोटाबंदीसारखा वटहुकूम काढून एका दिवसात सरकारी कागदांवरील आणि देशात जिथे असेल तेथून इंडिया हद्दपार करता येईल. पण आंतरराष्ट्रीय इंडियाचे काय करायचे? मोदी सरकार तिकडे याची अंमलबजावणी कशी करणार? संघाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा देश भारत म्हणूनच ओळखला जावा, असे वाटते. त्यांना वाटते म्हटल्यावर मोदी सरकारला हातपाय हालवावे लागणार, हे ओघाने आलेच! सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत या शब्दाचे इंडिया असे भाषांतर होऊच शकत नाही, असे आधीच सांगून ठेवले आहे. गोहत्याबंदी, राष्ट्रवाद या विषयांसारखा आता इंडिया हटाव हा विचार संघ शाखांतून जोर धरू लागला तर काय होणार, याची उत्सुकता आहे. इंडिया या शब्दाचा उगम नेमका कसा झाला, याबाबत ठोस काही हाती लागत नाही. इंग्रजांसोबत हा शब्दही भारतात आला. हिंदू हा शब्दही तसा पर्शीयन! या शब्दाच्या इंग्रजी स्पेलींगमध्ये इंडस् हा शब्द ध्वनीत होतो. या इंडस् भूमीचे रहिवासी म्हणजे इंडियन असाही एक प्रवास सांगितला जातो. प्राचीन ग्रीक संस्कृतीतही भारतीयांचा उल्लेख इंडोई असा सापडतो. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हाच शब्द स्थापित करायचा झाल्यास इतिहासाचे खोलवर उत्खनन करावे लागणार आहे. कदाचित संघाने ते आधीच करून ठेवले असावे. त्यामुळे मोदींनी मनावर घेतले तर इंडियाची भारतातून हद्दपारी अवघड नाही! सोबत जातव्यवस्था, अतिधर्मवाद, कमालीचे दारिद्य्र यातूनही मुक्तीचा काही मार्ग असेल तर संघाने त्याच्या अंमलबजावणीची घाई करावी. त्यातून सामान्य माणसाच्या जगण्यावर काहीतरी फरक पडेल!

LEAVE A REPLY

*