भाजपा सरकार उलथवून टाका! : खा. गुलाम नबी आझाद

0

 काँग्रेसचा ‘जनआक्रोश’, मोदी-फडणवीसांनी धोका दिला

अहमदनगर (प्रतिनिधी) – देशातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने जनतेला धोका दिला आहे. ‘जनआक्रोश’च्या माध्यमातून ही सरकारे उलथवून टाका, असे आव्हान राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते खा. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली विदेशी ताकदींना देश विकून टाकतील, असा गंभीर आरोप, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी केला. 

मंगळवारी नगर येथून काँग्रेसच्या राज्यस्तरीय जनआक्रोश मेळाव्याला प्रारंभ झाला. या मेळाव्यात काँग्रेसने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजप सरकारशी संघर्षाचे रणशिंग फुंकत कार्यकर्त्यांना चेतविण्याचा प्रयत्न केला. राज्य प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री अब्दूल सत्तार, आ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. निर्मला गावित, आ. आसिफ शेख,

आ. नसीम खान, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी मंत्री शोभा बच्छाव, रत्नाकर महाजन, युवक नेते डॉ. सुजय विखे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकार्‍यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना नेत्यांनी अभिवादन केले.

काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. खा. आझाद म्हणाले, भाजप सरकारने देशाला वेठीस धरले आहे. नगर शहराला मोठा राजकीय इतिहास आहे. त्यात डोकावून पाहिले तर अनेक सरकार घडविणे आणि पाडण्याची चळवळ याच शहरातून झाल्याचे आढळून येते. या शहराने ज्या सरकारविरोधात चळवळ उभारली ते सरकार टिकत नाही. आता जनआक्रोशच्या माध्यमातून या सरकाविरोधातील संघर्षाला प्रारंभ झाला आहे. आक्रोशाच्या या वादळात भाजप सरकारला पायउतार केल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन त्यांनी पदाधिकार्‍यांना केले.

मोहन प्रकाश यांनी स्व. पंडित नेहरू आणि नगर शहराच्या संबंधांचा उलगडा केला. नेहरू जेवढा काळ अलाहबादला राहिले नाहीत, तेवढा काळ त्यांनी नगर शहरात व्यतित केला. त्याच नेहरूंनी या देशाच्या विकासाचा पाया रचला. आज ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे, ते त्यावेळी इंग्रजांची दलाली करीत होते. याच शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली. स्व. इंदिरा गांधींनी सामान्य जनतेसाठी धोरणे आखली. बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे सामान्य माणसाला बँकांचे दरवाजे खुले झाले.

मात्र आताचे भाजप सरकार सामान्य जनतेचे नाही. शेतकरी भरडला जात आहे. जीएसटीमुळे व्यापारी हैराण आहेत. कामगारांचा रोजगार हिसाकवून घेतला आहे. नोटाबंदी केली, त्या रात्री पंतप्रधान मोदी अमेरिकेत गेले. अमेरिकन अध्यक्षाला सांगितले, नोटाबंदी केली. ज्या दिवशी जीएसटी लागू केली, त्याच दिवशी जपानला रवाना झाले. शिंजू आबे यांना भेटून जीएसटी लावल्याचे सांगितले. हे विदेशी ताकदीच्या इशार्‍याने काम करीत आहेत. मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली हा देश विकून टाकतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजप सरकारने देशाचा आणि राज्याचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप करून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणुकीपासून या सरकारच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे, असा विश्‍वास व्यक्त केला. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी हा जनआक्रोश आहे. जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम देशात केवळ काँग्रेस करू शकते.

जनतेचा हा आक्रोश पुढे न्यायचा आहे. 2019 मध्ये भाजपचा अंत झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात फडणवीस सरकार नसून फसवणीस सरकार आहे. जनतेच्या पैशावर सरकारी जाहिराती सुरू आहेत. तीन वर्षे पूर्तीचा सरकारी जल्लोष नेमका कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. सोशल मीडियावर तरुणांनी सरकारचा विरोध केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. एसटी कर्मचार्‍यांनी संप केला म्हणून 36 दिवसांचा पगार कापून घेतला. सरकारचे निर्णय देशोधडीला लावणारे आहेत, असे खा. चव्हाण म्हणाले.

भाजप सरकारला तीन वर्षांतील कामगिरीचा हिशेब विचारावा, असे आवाहन आ. ठाकरे यांनी केले. खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत बसलेल्या भाजपची पावले विकासाच्या दिशेने कधीही पडली नाहीत. सातत्याने धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 65 वर्षांत काँग्रेसने या देशाचा विकास केला. मात्र कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा अपप्रचार करत सत्तेवर आलेल्या या सरकारला आता तोच सवाल केला पाहिजे.

शेतीमालाला हे सरकार भाव देत नाही. कर्जमाफीच्या नावाने शेतकर्‍याची फसवणूक होत आहे. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले हे सरकार आहे, असे आ. ठाकरे म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून कर्जमाफी, नोटाबंदी, जीएसटी, महागाई आदी विषयांवरून सरकारवर टीका केली. डॉ. सुजय विखे यांनी आभार मानले.

आक्रोश मंत्रालयावर धडकणार ः ना. विखे
भाजप सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. काम शून्य आणि घोषणांचा गाजावाजा सुरू आहे. सामान्य जनता आता रस्त्यावर उतरली आहे. हा आक्रोश कधी मंत्रालयावर धडकेल याचा नेम नाही, असे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. नगरच्या भूमीने अनेक चळवळी उभ्या केल्या. आता जनआक्रोशाला प्रारंभ झाला आहे. सामान्य माणसाचा विकास आणि सर्वधर्मसमभावाची यशस्वी गुंफण स्व. इंदिरा गांधी यांनी केली होती. ती उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. नोटाबंदीचे घातक परिणाम जनतेला भोगावे लागले. कामगार, शेतकरी यामुळे मोडून पडला. अद्यापही जनतेला यातना सोसाव्या लागत आहेत. अच्छे दिनचा वादा केला. पण शेतीला वीज नाही. शेतमालाला भाव नाही. ऐतिहासिक कर्जमाफी नव्हे तर ऐतिहासिक फसवणूक भाजप सरकारने केली. कर्जमाफीचे खोटे प्रमाणपत्र वाटणारे हे देशातील पहिलेच सरकार असावे, अशी टीकाही  
त्यांनी केली. भाजपाच्या उद्योगमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे. शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही. सेनेत किती वाघ शिल्लक आहेत, हे बघावे लागेल. बहुधा मातोश्रीवरील शेळ्या वर्षावर चरायला गेल्या आहेत, असा चिमटा ना.विखेंनी काढला.

बुरे दिन उगवले ः आ. थोरात
जनआक्रोश हा केवळ शब्द नव्हे. ती या देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी आणि जनतेच्या मनात निर्माण झालेली चीड आहे, असे आ. बाळासाहेब थोरात म्हणाले. भाजपने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले पण बुरे दिन उगवले. आज स्व. इंदिरा गांधींचा स्मृतिदिवस आहे. त्यांनी सामान्यांच्या विकासासाठी आयुष्य वेचले. या देशासाठी रक्त सांडले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी या देशासाठी बलिदान दिले. आता सामान्य माणसाला धीर देण्याची जबाबदारी काँग्रेसची आणि पर्यायाने आपली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यावर गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने जबाबदारी सोपविली. तेथे 182 जागांसाठी पक्षाकडे 2200 अर्ज आले आहेत. गुजरातमधूनच देशातील भाजप हटावला सुरुवात होणार आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहायचे. आताचे सरकार कर्जमाफीच्या नावाने शेतकर्‍यांकडून माफीनामे लिहून घेत आहे. ही कर्जमाफी फसवी आहे आणि हे सरकारही अत्यंत फसवे आहे, असे आ. थोरात म्हणाले. 

एकही भूल, कमलका फूल!
नांदेड महापालिकेत काँग्रेसच्या विजयात व्यापार्‍यांचा सहभाग होता. जीएसटीमुळे हैराण झालेले व्यापारी आता ‘एकही भूल, कमलका फूल’ असे म्हणू लागले आहेत, अशी टीका खा. अशोक चव्हाण यांनी केली. नोटाबंदीत देशभरात दीडशेवर मृत्यू झाले. त्यांच्या हत्येचा गुन्हा भाजप सरकारवर दाखल केला पाहिजे. पंतप्रधान मोदी म्हणतात चाय-चाय…उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात, गाय-गाय…आता सामान्य जनतेने या सरकारलाच म्हटले पाहिजे, बाय-बाय…असा चिमटाही त्यांनी काढला.

 

LEAVE A REPLY

*