Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भाजपचा जल्लोष तर राष्ट्रवादीत शांतता

Share

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – आज सकाळी वाहिन्यांवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचे जाहीर होताच कर्जत शहर व तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व पेढे वाटत जल्लोष साजरा केला.
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि पवार यांना शपथ दिल्याचे सकाळी सर्वत्र माहिती होताच कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, काकासाहेब धांडे, बापूसाहेब नेटके, अमृत काळदाते, बाळासाहेब शिंदे, उमेश जेवरे, रामदास हजारे, अनिल गदादे, ज्ञानदेव लष्कर, सतीश पाटील, काका ढेरे, सचिन गुंड, गणेश पालवे यांच्यासह कायकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या. तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांचे यावेळी भाषण झाले.

राष्ट्रवादीत शांतता
सकाळी भाजप आणि राष्ट्रवादी असे एकत्रित सरकार सत्तेवर आल्याच्या बातम्या येत होत्या. नंतर मात्र राष्ट्रवादी पक्षाचा हा निर्णय नसून, अजित पवार यांनी बंडाचा झेंडा फडकविल्याचे समोर आले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते खासगीत बोलताना नाराजी व्यक्त करत होते. अजित पवार यांनी ही भूमिका घेणे गरजेचे नव्हते, असे त्यांचे म्हणणे होते.

रोहित पवार यांची पोस्ट
राज्यात राजकीय खळबळ उडालेली असतानाच आ. रोहित पवार यांनी ‘साहेब, तम्ही आशीर्वाद द्या, हा रोहित तुमचा वारसा चालविण्यास सक्षम आहे’, अशी पोस्ट व्हायरल केली. अजित पवार यांच्या बडंखोरीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्यातील कार्यकर्त्यांना संदेश देत पक्ष नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला.

महिलांची फुगडी अन गुलालाची मुक्त उधळण

नगर शहरात भाजपचा जल्लोष : एकमेकांना लाड़ू भरविले

अहमदनगर (प्रतिनिधी) – नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शनिवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. नगरला भाजप कार्यालयासमोर ढोल, ताशा, फटाके वाजवत, गुलाल उधळत व एकमेकांना लाडू भरवत जल्लोष करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे जाहीर होताच लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालयात सकाळपासून जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत व फटाके फोडून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व भाजपाची सत्ता पुन्हा आल्याचा जल्लोष साजरा केला. भाजप शहर जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी यांनी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांना लाडू भरवून सर्वांचे अभिनंदन केले.

लग्नासाठी मिरवणुकीने चाललेल्या नवरदेवाला देखील लाडू भरविण्यात आला. कार्यकर्ते मंत्रमुग्ध नाचत होते, तर महिलांनी फुगडी धरून आपला आनंद व्यक्त केला. यामध्ये उपमहापौर मालन ढोणे व महिला पदाधिकार्‍यांचा समावेश होता. जल्लोषात गांधी यांच्यासह महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, मनेष साठे, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदींसह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीगोंद्यात 145 तोफांची सलामी

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – राज्यात कुठल्याच पक्षाचे सरकार होत नसल्याने तालुक्यातील अनेकांच्या नजरा राजकीय घडामोडीकडे होत्या. मात्र सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी शपथ घेताच, श्रीगोंदा येथे भाजप कार्यकर्त्यांनी शनी चौकात जल्लोष करत तब्बल 145 तोफांची सलामी देत पेढे वाटले. श्रीगोंदा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बाजी मारली असली, तरी 2014 च्या निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर 2019 मध्ये मिळालेला विजय पाहता, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच सरकार स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
श्रीगोंदा शहरातील शनी चौक येथे भाजप समर्थक सकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर एकत्र आले. त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. यावेळी एम. डी. शिंदे, संतोष खेतमाळीस, सागर बोरुडे, संदीप नागवडे, दीपक शिंदे, महेश क्षिरसागर, राजेंद्र उकांडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीत सामसूम
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार घनशाम शेलार यांनी दमदार लढत दिली होती. श्रीगोंदामध्ये माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आहेत. शेलार आणि जगताप या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांत शांतता होती.

शेवगावमध्ये आतषबाजी करत भाजपची शहरात विजयी फेरी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होताच शेवगाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयाच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास पुष्पहार अर्पण करून बस स्थानक चौकात नगरसेवक अशोक आहुजा, नगरसेवक महेश फलके, भाजप तालुका उपाध्यक्ष नीलकंठ कराड, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, बंडूशेठ रासने, अरुण मुंढे, राहुल बंब, कैलास सोनवणे, गंगा खेडकर, विनोद मोहिते, जलिल राजे, नितीन दहिवाळकर, बंडू मेहेर, दिलीप सुपारे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत विजयाच्या घोषणा दिल्या. या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन भाजपचा झेंडा उंचावत विजयाच्या घोषणा देत विजयी फेरी काढण्यात आली. फेरीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

खर्डा चौकात फटाक्यांची आतषबाजी

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे समजताच जामखेड शहरातील खर्डा चौकात व नान्नज, जवळा, खर्डासह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करून भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत मात की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवान मुरूमकर. जि. प. सदस्य सोमनाथ पाचर्णे, भाजपचे निरीक्षक मृत्युंजय गर्जे, कर्जत-जामखेड मतदार संघाचे विस्तारक मनोज कुलकर्णी, बाजार समितीचे संचालक पोपट राळेभात, जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक, भाजपचे युवा नेते अमजद पठाण, नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश ओव्हळ, अमित चिंतामणी, गुलशन अंधारे, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण सानप, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान, गोरख घनवट, बाळासाहेब राळेभात, तात्याराम पोकळे, काशिनाथ ओमासे, प्रविण चोरडिया, अल्ताफ शेख, लहु शिंदे, उद्धव हुलगुंडे यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते.

एक महिन्यापासून कोणाचे सरकार स्थापन होईल याबाबत उत्कंठा ताणलेली होती. सकाळी जेव्हा फडणवीस व पवार यांनी शपथ घेतल्याचे समजताच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. तसेच ग्रामीण भागातही कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आऩंद साजरा केला. खर्डा चौकात झालेल्या जल्लोषवेळी तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांचे भाषण झाले.

राष्ट्रवादीतील घडामोडीवर नो कॉमेंट्स : शेलार

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – राष्ट्रवादी पक्षातील घडामोडींवर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले घनश्याम शेलार यांनी ‘नो कॉमेंट्स’ असे म्हणत आपण कुठलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र चित्र बदलेल, असेही म्हणाले. आपण कोणत्या पवारांबरोबर आहात, असे विचारतता त्यांनी उत्तर देणे टाळले. श्रीगोंदा तालुका तसा राजकीय पटलावर कायम चर्चेत असतो. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मावळते आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले घनश्याम शेलार यांनी भाजप उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना जोरदार लढत दिली. राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष असलेले शेलार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीत केवळ हे चित्र बदलेल अशी प्रतिक्रिया दिली. आपण कोणत्या पवारांबरोबर, यावर ‘नो कॉमेंट्स’ असे म्हणत बोलणे टाळले.

धक्क्यातून सावरत कार्यकर्त्यांचा जल्लोष

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – गेले महिनाभर राज्यात सरकार कुणाचे येणार, याचे उत्तर काल शनिवारी सकाळी धक्कादायक व अनपेक्षितरित्या मिळाले. तालुका झोपेतून जागा होत नाही, तोच मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याचे समजताच भाजप कार्यकर्त्यांसह सर्वच गोंधळात पडले. या धक्क्यातून सावरत भाजप कार्यकर्त्यांनी शहरात व ग्रामीण भागात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

गेले महिनाभर राज्यात कोण सत्तेवर या चर्चेला पूर्ण विराम मिळून आता बहुमत प्रस्ताव मंजूर होणार का, या चर्चेने कार्यकर्त्यांना ग्रासले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे पुन्हा विजयी झाल्या. आजच्या शपथविधीची त्यांनाही काहीच कल्पना नव्हती. भाजपचे अनेक नेतेही या बातमीने चकीत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी मात्र नेत्यांचा कल पाहुन प्रतिक्रिया व्यक्त करणे पसंत केले. राज्यात सरकार स्थापन होऊन दैनंदिन कारभार सुरू होणार म्हणून कार्यकर्ते सुखावले आहेत.

आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आहेत. भाजपबरोबर युती केल्यास जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. विश्वासदर्शक ठराव बारगळणार असून राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे सरकार सत्तेवर येईल. शिवसेनेला दिलेला शब्द पक्षाने पाळावा. लोकांना भाजप व देवेंद्र फडणवीस नको आहेत. पक्षाने लोकभावनेचा आदर करावा.
– बाळासाहेब ताठे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मी पुन्हा येणार अशी आत्मविश्वासपूर्ण ग्वाही देणारे देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा करून दाखविला आहे. तसेच विश्वासदर्शक ठरावही निश्चितपणे संमत होऊन राज्यात स्थिर सरकार येईल.
– माणिक खेडकर, तालुकाध्यक्ष, भाजप

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!