नगरमध्ये महाविकास आघाडी भाजपकडून चीत

jalgaon-digital
3 Min Read
महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी खरंच एकत्र होते का?
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात एकसंध दिसत असलेल्या महाविकास आघाडीची अवस्था नगरमध्ये काय आहे, हे महापालिकेच्या पोटनिवडणुकीतील निकालावरून दिसून आले. शिवसेनेचा अक्षरशः दारूण पराभव झाला, तर सार्वत्रिक निवडणुकीत हुकलेली जागा मिळवत भाजपने या प्रभागात आपणच नंबर एक असल्याचे दाखवून दिले. भाजपने मिळविलेल्या मतांच्या आकडेवारीवरून राष्ट्रवादीने खरच शिवसेनेला मदत केली का, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे.
महापालिकेच्या प्रभाग सहा (अ) मध्ये पोटनिवडणूक झाली. या जागेवर अगोदर शिवसेनेचा नगरसेवक होता. मुळात भाजपचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपकडेच संशयाने पाहिले जात होते. या प्रभागातून सध्याचे महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधीत्त्व करत आहेत. त्यांच्यासह तीन उमेदवार भाजपचे आणि एकमेव सारिका भूतकर या शिवसेनेच्या उमेदवार निवडून आल्या. भूतकर आणि वाकळे यांच्या सख्याबाबत त्यावेळी चर्चा झाली होती. त्याला पूरक अशी घटना लगेच घडली. महापौरपदाच्या निवडणुकीत भूतकर अनुपस्थित राहून त्यांनी अप्रत्यक्ष वाकळे यांना मदतच केली होती. सार्वत्रिक निवडणुकीनंतर वर्षभरातच भूतकर यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र फेटाळल्याने रद्द झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली.
ही निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी भाजपचे प्रयत्न होते. मात्र शिवसेनेने ही आमची जागा असल्याने अर्ज मागे घेणार नाही, असे सांगितल्याने निवडणूक झाली. त्यापूर्वी भाजपच्या उमेदवार पल्लवी जाधव यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेने अनेक आक्षेप घेत जंगजंग पछाडले. ते देखील फेटाळल्याने या दोन पक्षात सरळ लढत झाली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे नगरमध्ये कधी नव्हे, तो शिवसेनेच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या दारी मदतीसाठी जावे लागले. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना शिवसेनेच्या नेत्यांची विनंती मान्य करत आमदार जगताप यांनी प्रभागात चक्कर मारली. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे काम करतील, असा शब्द दिला.
राष्ट्रवादीच्या या शब्दाने शिवसेनेच्या काही नगरसेवकांच्या अंगावर मांस चढले. आपणच जिंकून येणार, यावर ते ठामपणे दावा करू लागले. मात्र घडले वेगळेच. थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल एक हजार 712 एवढ्या मोठ्या फरकाने भाजपच्या पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या अनिता दळवी यांचा पराभव केला. एखाद्या प्रभागातील निवडणुकीत एवढा मोठ्या फरकाने पराभव होणे म्हणजे मोठी नामुष्की म्हटली पाहिजे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन राज्यात भाजपचा वारू रोखण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना नगरमध्ये मात्र मतदारांनी नाकारले, हे यातून स्पष्ट झाले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदानाला दोन दिवस शिल्लक असेपर्यंत निवडणुकीकडे पाठ केलेल्या राष्ट्रवादीचा इरादा शिवसेनेच्या लक्षात येऊ नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
महाविकास आघाडीचा तोरा
महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे आणि राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नगरसेवक यांची जवळिक आता सर्वश्रूत आहे. तसेच महापालिकेत शिवसेना सत्तेच्या जवळ येणार नाही, यासाठी भाजपपेक्षा सर्वाधिक प्रयत्न राष्ट्रवादीचेच असतात. असे असताना शिवसेना महाविकास आघाडीचा तोरा मिरवत होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *