लोडशेडिंगमुक्त दिवाळी

0

सेनेचा अल्टीमेटम, काँग्रेसचे निवेदन, भाजपचा घेरावो

अहमदनगर (प्रतिनिधी)– नगर शहरात सुरू असलेल्या भारनियमनामुळे नगरकर त्रस्त झाले आहेत. स्वत:हून रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांच्या ‘व्होट बँकेचा’ विचार करत मग भाजपनेही त्यात उडी घेतली. महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना भाजपने घेरावो घातला तर सेनेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. काँग्रेसनेही पिण्याच्या पाण्याचे कारण पुढे करत महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. भारनियमनाचे झटक्यांनी सलग दोन दिवस अधिकारी घायाळ झाले.

नगर शहरात अचानकपणे भारनियमन सुरू झाले. राष्ट्रवादी अन् शिवसेनेने महावितरण कंपनीसमोर आंदोलन करून ते मागे घेण्याची मागणी केली होती. गुरूवारी रात्री मध्यनगरातील नागरिक स्वत:हून रस्त्यावर उतरले. ‘व्होट बँक’ समोर दिसत असल्याने मग भाजपनेही त्यात उडी घेतली. नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नरेंद्र कुलकर्णी, सागर गोरे, रोहन डागवाले यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांनी अधीक्षक अभियंता बोरसे यांना घेरावो घातला. ज्यंचे वीज बिल थकले त्यांचे कनेक्शन कट करा. राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नगरलाच वाढीव भारनियमन का? असा सवाल करत बोरसे यांना धारेवर धरले. सणासुदीचे दिवस असल्याने अन् मुलांच्या परिक्षा सुरू असल्याने भारनियमन बंद करा अशी मागणी भाजपने केली. खासदार दिलीप गांधी यांच्याशी तेथूनच संपर्क करत त्यांनीही अधिकार्‍यांना भारनियमन बंद करण्याची सूचना केली. त्यानंतर अधिकार्‍यांनी दिवाळीच्या काळात आठ दिवस भारनियमन करणार नाही असे सांगितले. दिवाळीत दिव्यांचा झगमगाट दिसणार असल्याच्या आंनदात भाजपचे पदाधिकारी तेथून निघाले.
थोड्या वेळानेच युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निखील वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, कुलदिप भिंगारदिवे, अजय औसरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते महावितरण कार्यालयात धडकले. वसंत टेकडी येथून अख्ख्या नगर शहराला पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथील भारनियमन बंद करा अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र 25 लाखाची थकबाकी असल्याने ते शक्य नाही असे सांगत बोरसे यांनी असमर्थता दर्शविली. त्यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संयुक्त बैठक घेऊन वसंत टेकडी परिसरातील भारनियमनाचे वेळापत्रक बदलण्यात बोरसे यांनी सहमती दर्शविली.
शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत भारनियमन बंद करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. तीन दिवसांत भारनियमन बंद न झाल्यास सेनास्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला. पंतप्रधान मोफत वीज कनेक्शन देण्याची घोषणा करतात. राज्यातील मंत्री कोळशाची कमतरता नाही, सरप्लस विज असल्याचे सांगतात, मग तरीही भारनियमन कशासाठी असा सवाल करत सेनेने जिल्हा प्रशासनाला अल्टीमेटम दिला.

पोलिसांमुळेच बिघडली कायदा सुव्यवस्था
जनतेच्या प्रश्‍नासाठी शिवसेनेने भारनियमनाविरोधात महावितरण कंपनी कार्यालयात आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना खालच्या पातळीची वागणूक दिल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांमुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असल्याची बाब शिवसेनेने निदर्शनास आणून दिली.

LEAVE A REPLY

*