Type to search

Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

मी भाजपचाच नव्हे तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस

Share

मीच पुन्हा मुख्यमंत्री, जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

मुंबई – राज्यातील सरकार हे महायुतीचे सरकार आहे. मी आधीच सांगितलंय की, मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपाचाच नव्हे तर शिवसेना, रिपाई आणि रासपचाही मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपाच्या विशेष कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र लढणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनात संभ्रम आणू नये. कोणतीही जागा आपण गमावणार नाही, युतीतील जागा वाटपात कोणतीही जागा आपल्याकडे येऊ शकते, असं सांगतानाच मुख्यमंत्री जनता ठरवित असते. प्रसारमाध्यमे संभ्रम निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष करा, आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणार्‍या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन. असेही ते म्हणाले. आरक्षण, संरक्षणाचे प्रश्न सोडवू शकलो, शेतीतील अस्वस्थता कमी करू शकलो, अनेक आंदोलने झाली, पण त्यावर आपण समर्थपणे तोडगा काढू शकलो. जे कोणत्या सरकारला जमले नाही, ते आपल्या सरकारला जमू शकले.

त्यामुळे आता नव्या दमाने पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असं सांगतानाच आपल्याला पराभूतांशी लढायचे आहे, तरीही सहज घेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढचे 15-20 वर्ष विरोधी पक्ष म्हणून तयार करणे ही जबाबदारी आपल्यावरच आहे, असा टोला त्यांनी लगावला.

 नड्डा यांचे आवाहन
आगामी निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत, त्या पद्धतीने तयारी करा. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी येथे केले.

कामाच्या मूल्यमापनावरच आमदारांना तिकीट
लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले म्हणून समाधान मानू नका. ते मताधिक्य तुम्हाला नाही, मोदींना दिले आहे. पाच वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 भाजपची महाजनादेश यात्रा
लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाजनादेश यात्रा काढणार आहेत. ही यात्रा 1 ते 31 ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

टार्गेट 220; कामाला – चंद्रकांत पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने 220 जागा जिंकल्याच पाहिजे, तसा निर्धार करा आणि कामाला लागा, असे आवाहन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मुंबईत आयोजित पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केले. गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित विशेष कार्यसमितीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील बोलत होते. युतीचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी जाहीर करतील. तो निर्णय आपण त्यांच्यावर सोपवला पाहिजे. पण आपण सर्वांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागले पाहिजे, असेही ते म्हणाले.

गडकरींसह महत्वाचे नेते गैरहजर
भाजपच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीची बैठक काल मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यभरातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. दुसरा कार्यक्रम असल्याने पूर्वकल्पना देऊन अनुपस्थित राहिल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर गडकरी गटाचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार पहिल्या सत्रात गैरहजर होते. दुसर्‍या सत्रात राजकीय ठराव मांडण्यासाठी मुनगंटीवार सहभागी झाले. मंत्री पंकजा मुंडेही कालच्या बैठकीला अनुपस्थित होत्या. वैयक्तिक कारणांसाठी परदेशात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यातील ही शेवटची कार्यसमितीची बैठक आहे. यामुळे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे एक गट नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!