Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संघटनात्मक निवडीसाठी नगर शहराच्या दोन बैठका

Share

गांधी समर्थक आणि विरोधकांना निरीक्षक खासदार बापट स्वतंत्रपणे भेटले

अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी आलेले निरीक्षक खा. गिरीश बापट यांना येथे शहर जिल्हा भाजपच्या दोन बैठका घेण्याची वेळ आली. शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि त्यांच्या समर्थकांची गांधी यांच्या निवासस्थानी तर गांधी विरोधी गटाची विश्रामगृहावर बैठक घ्यावी लागली.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाले असून, त्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. खा. बापट यांची नगर शहर व ग्रामीणसाठी नियुक्ती झाली आहे. ते नगरमध्ये आल्यानंतर थेट माजी खा. गांधी यांच्या निवासस्थानी पोचले. तेथे गांधी व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासमवेतच ते विश्रामगृहावर आले. विश्रामगृहावर गांधी विरोधी गटाचे मानले जाणारे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, सदाशिव देवगावकर, मिलिंद गंधे, सचिन पारखी आदी होते. तसेच जिल्ह्याच्या बैठकीसाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्यासह प्रमुख नेते होते.

अगोदर ग्रामीणची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये खा. बापट यांनी निवडीची प्रक्रिया सांगितली. पहिल्यांदा बूथ प्रमुखांची निवड होणार असून, त्यानंतर हजारी भाग प्रमुख (एक हजार मतांमागे एक प्रमुख), मंडल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अशी प्रक्रिया आहे. 15 डिसेंबरपर्यंत संघटनात्मक निवडीची सर्व प्रक्रिया पूर्ण करावयाच्या आहेत.

माजी खासदार गांधीविरोधी गटांशी खा. बापट यांनी चर्चा केली. तेथेही निवडीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. निवडीसाठी निरीक्षक म्हणून खा. बापट यांची नियुक्ती झालेली असल्याने त्यांच्यासमोर आपसातील वाद किंवा तक्रारीचा प्रकार झाला नाही. मात्र बैठकीसाठी गांधी व त्यांचे समर्थक न फिरकल्याने भाजपमधील गटबाजीची चर्चा होती.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!