Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची अधोगती; भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची टीका

Share

नाशिक । प्रतिनिधी

देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र यांच्यामुळे मागील पाच वर्षांत राज्याच्या विकासाला डबल इंजिन मिळाले. या अगोदरच्या अस्थिर सरकारांमुळे राज्याचा विकास खुंटला. काँग्रेस व राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू होता. आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला.

भाजप, शिवसेना, रिपाइं यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे संमेलन गुरुवारी (दि.10) गंगापूर रोडवरील श्रद्धा लॉन्स येथे पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना नड्डा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. भारती पवार, प्रा. फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले यांसह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र देशातील महत्त्वपूर्ण राज्य. मात्र, पाच वर्षे स्थिर सरकार न मिळाल्याने महाराष्ट्राचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही.

विकासाऐवजी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने राज्यात भ्रष्टाचार केला. देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षे स्थिर सरकार दिले. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रात राज्याने मोठी झेप घेतली. शेतकरी, महिलांचा विकास केला. लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी यांना सत्ता दिली. त्यांनी तिहेरी तलाक रद्द करून मुस्लीम महिलांना न्याय दिला. काश्मीरमधील अन्यायकारी 370 व 35 ‘अ’ कलम रद्द करण्याची धमक दाखवली.

त्यामुळे काश्मीर देशाशी जोडले गेले असून तेथे संविधान लागू झाले. आयुष्यमान भारत, उज्ज्वला गॅस यासारख्या योंजनातून गोरगरिबांचा विकास केला. मोदी यांच्यामुळे देशभरात भारताचा डंका वाजत असून अमेरिकासुद्धा दखल घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात मोदी सरकार असून राज्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा महायुतीला सत्तेचा कौल द्या, असे आवाहन त्यांंनी केले. तसेच, गाफिल न राहता बूथ प्रमुखांनी विजयसाठी सर्व ताकद पणाला लावा, असा मंत्र त्यांनी दिला. यावेळी मनसेनेचे माजी शहराध्यक्ष अनिल मटाले यांंसह कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.


शिवसेनेचा बहिष्कार

जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होता. त्यास रिपाइं, रासप, शिवसंग्राम पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचा नेता दूरच त्यांचे कार्यकर्तेदेखील या सोहळ्याकडे फिरकले नाही. शहरातील तीन पैकी एकही मतदारसंघ न सुटल्याने शिवसेना नाराज आहे. नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेने बंडखोरी केली आहे. या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकत भाजपला एक प्रकारे इशारा दिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पहायला मिळाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!