Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमला इतर पक्षांकडून ऑफर, करोना संकटानंतर निर्णय घेणार – खडसे

मला इतर पक्षांकडून ऑफर, करोना संकटानंतर निर्णय घेणार – खडसे

सार्वमत

जळगाव – विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचे म्हटले आहे. करोनाच्या संकटकाळात कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही, पण करोनाच्या संकटानंतर आपण राजकीय निर्णय घेणार आहे, विधान परिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. पण ज्यांचा पक्षाशी संबंध नाही किंवा पक्षविरोधी काम केली आहेत अशा व्यक्तींना संधी देण्यात आल्याचंही, ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

ते म्हणाले, मला संधी दिली नाही तरी ठीक आहे. पण पक्षात अनेक लोक तिकीट मिळेल या आशेने गेली कित्येक वर्ष निष्ठेने काम करत आहेत. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना तिकीट देऊ असं आश्वासन दिलं होतं. भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते, नेत्यांचे मला फोन येत आहेत. तुमच्यावर अन्याय होत आहे, तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती करत आहेत. काही पक्षही आपल्याकडे यावं यासाठी विचारणा करत आहेत, पण करोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता सध्या असा निर्णय घेणे योग्य राहणार नाही. करोनासारख्या गंभीर स्थितीत राजकीय विचार करणं तसंच राजकारणावर चर्चा करणं योग्य ठरणार नाही. आज तशी परिस्थिती नाही.

त्यामुळे जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करुन योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या