Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भाजपमधील निष्ठावंत आक्रमक; नेत्यांची दादागिरी अमान्य

Share

-सुहास देशपांडे

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर गटबाजीचे सावट

अहमदनगर – प्रत्येक जिल्ह्यातील मोठमोठे नेते पक्षात घेऊन पक्ष बलवान करण्याचे स्वप्न पाहणार्‍या भाजपला आता निष्ठावंत आणि दलबदलू यांचा संघर्ष मिटविताना नाकीनाऊ येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात हा संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने उफाळून आला असून, दलबदलू नेत्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास निष्ठावंत तयार नाहीत. प्रसंगी जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत हे निष्ठावंत आहेत.

भाजपने आपले बळ वाढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला काही मतदारसंघांपुरती मर्यादित वाटत असलेली ही मेगा भरती आता सरसकट सर्वच ठिकाणी होऊ लागली आहे. एरवी शिस्तीचा पक्ष म्हणून पाठ थोपटून घेणार्‍या भाजपला आता कोणतेच सोयरसुतक राहिलेले नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यांना पावन करून घेतानाच ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी बाताड्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केला, त्यांनाच आता पक्षाच्या निष्ठावंतांना नेता म्हणण्याची वेळ आली आहे. दररोज त्यांच्या दारात जाऊन पक्षाचे काम स्वीकारण्याची नौबत आली आहे.

भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत पाथर्डी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव येथे नेते आयात केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात नगर मतदारसंघात जिल्ह्यातील मोठे घराणे भाजपमध्ये पावन करून घेण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकोले येथील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचे पक्षात वाजत गाजत स्वागत केले. यातून पक्ष वाढविण्यात येत असल्याचे चित्र निर्माण केले असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजीला खतपाणी यामुळे घातले गेल्याकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले. आता हीच गटबाजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या तोंडचे पाणी पळविणारी ठरत आहे.

अकोले येथे नव्याने पक्षात आलेल्यांना भाजपचे निष्ठावंत स्वीकारायला तयार नाहीत. भाजपचा मित्रपक्ष असेलल्या शिवसेनेलाही पिचड पितापुत्रांचा भाजप प्रवेश मान्य नाही. ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांचीच तळी उचलायची का, असा प्रश्‍न या निष्ठावंतांचा नेत्यांना आहे. शिर्डी मतदारसंघातील निष्ठावंत तर अगदी तलवार परजून तयार आहेत. नव्याने पक्षात आलेल्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पूर्वी दिलेल्या त्रासाच्या कहाण्या सांगण्यात येत आहेत. पक्षाला नेते हवे की कार्यकर्ते, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीगोंदा येथे पाच वर्षानंतरही कार्यकर्ते नव्यांना स्वीकारायला तयार नाहीत. नेवासा येथे तर आमदारांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बंड करण्याची तयारी सुरू आहे. नगर दक्षिणेतही नव्या खासदाराला स्वीकारणे निष्ठावंतांना जड जाऊ लागले आहे. पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी केलेली टीका अद्यापही निष्ठावंत विसरायला तयार नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हा संघर्ष उफाळून आला आहे. महाजनादेश यात्रेचे नियोजन करताना आता आयात नेत्यांचे ऐकायचे का, असा प्रश्‍न ते उपस्थित करत आहेत. आजपर्यंत पक्षाकडे कोणतीही ताकद नसताना नेत्यांच्या दौोर्‍याचे नियोजन काटेकोरपणे करणार्‍या निष्ठावंतांना आता दलबदलूंच्या तालावर नाचावे लागत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!