Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हा परिषदेचे 361 कोटी अखर्चित?

जिल्हा परिषदेचे 361 कोटी अखर्चित?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेमध्ये गेल्या पाच वर्षांत अधिकार्‍यांचा मनमानी कारभार व दिरंगाई व अधिकार्‍यांवर वचक नसलेले पदाधिकारी यांच्यामुळे जिल्हा परिषदेचे कोट्यवधी रुपये अखर्चित राहून पुन्हा शासनाकडे जमा करण्याची नामुष्की आलेली आहे. आता पुन्हा जिल्हा परिषदेचे 361 कोटी रुपये अखर्चित राहणार असल्याचा आरोप भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचा गेली पाच वर्षे नियोजनशून्य कारभार झालेला आहे. विकास कामांसाठी जो निधी मंजूर झाला, त्यापैकी 2016-17, 2017-2018, 2018- 2019 आणि 2019-2020 या आर्थिक वर्षात तब्बल 151 कोटी 89 लाख 63 हजार 419 रुपये अखर्चित राहिल्यामुळे परत गेले आहेत. याला जबाबदार कोण? तसेच ज्या अधिकार्‍यांमुळे निधी परत गेला. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी 208 कोटी 94 लाख 80 हजारांचा अजून खर्च करणे बाकी आहे. त्याचे योग्य नियोजन झाले नाही, ही रक्कम अखर्चित राहू नयेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यात लक्ष घालून ही रक्कम विकास कामांसाठी मार्चपर्यंत खर्च करावी लागणार आहे.

खरंतर राज्यात विकास आघाडीचे सरकार आहे. पालकमंत्री राष्ट्रवादीचे असून जिल्हा परिषद अध्यक्ष या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत. यामुळे निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी त्यांच्या पदाधिकार्‍यांना सांगायला हवे होते. एकीकडे सर्वसाधारण जिल्हा परिषद सदस्य आपापल्या गटात विकास कामे व्हावी, म्हणून पदाधिकार्‍यांना विनंती करत असतात. परंतु त्याकडे पदाधिकारी दुर्लक्ष करतात आणि म्हणून हा निधी खर्च झाला असता तर जिल्ह्याचा आणखी विकास झाला असता, असा आरोप वाकचौरे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या