Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राजकीय सत्तानाट्य : झोपेतून उठलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; चर्चांना उधाण

Share

नाशिक । भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याची बातमी झळकताच झोपेतून उठलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याची चर्चा सोशल मीडियावर झालीच परंतु सकाळी चौकाचौकांत याबाबत चर्चा झडताना दिसत होत्या.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून गेले महिनाभर अगदी काल रात्रीपर्यंत चालू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे त्यातही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार याबाबत लोकांनीही गृहीत धरले होते.

चोवीस तास प्रसिद्धी माध्यमांद्वारे राजकीय घडामोडींच्या प्रामुख्याने काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, त्यांचे प्रमुख, त्यांचे प्रमुख नेते यांच्या बैठकांच्या बातम्यांचा भडीमार चालू होता. कोणता नेता कोठून निघाला, कोठे पोहोचला, काय बोलला याचे इत्यंभूत वार्तांकन सुरू होते. यामुळे राज्यातील जनताही वैतागली होती. अखेरच्या तीन दिवसांमध्ये काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी या महाशिवआघाडीस हिरवा कंदिल दिल्याचे व यानंतर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा झडल्या.

शुक्रवारी रात्री शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अखेरची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तसे सूचीत केले होते. अखेरीस आज शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार असे निश्चित झाले असतानाच आज सकाळी 8 वाजेपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातम्या झळकताच नागरिकांची झोपच उडाली.

या बातम्या झळकताच सर्व सोशल मीडिया ग्रुप, प्रामुख्याने व्हॉटस्अ‍ॅपवर जोरदार बातम्या व त्याबरोबरच विनोदी कमेंट पास झाल्या. तर सकाळी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेले नागरिक, महिला ग्रुप करून याबाबत चर्चा करताना दिसत होते. शहरातील चौकाचौकांतील चहाच्या टपर्‍या, नाश्ता सेंटर या ठिकाणी जमलेले नागरिक केवळ हीच राजकीय चर्चा करताना व आश्चर्य व्यक्त करतानाचे शहरभर चित्र होते.

अनेक ठिकाणी भाजप समर्थकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला, तर इतर पक्षीय राग व्यक्त करताना दिसत होते. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!