भाजपाचे नगरसेवक रवी पाटील यांचा राजीनामा

0

बेकायदा बांधकामाच्या तक्रारींची पालिकेने दखल घेतली नाही

राजीनामा स्विकारला नाही : अनुराधा आदिक
रवी पाटील यांचा राजीनामा दुर्दैवी : प्रकाश चित्ते
समज-गैरसमज दूर करु : दीपक पटारे
14 नोव्हेंबरपर्यंत बांधकामाला स्थगिती

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आमच्या भागातील कोणतेही कामे केली जात नाहीत व फ्लॅटशेजारी बेकायदेशीररित्या बांधकाम चालू असून त्याबाबत केलेल्या तक्रारींची पालिकेने साधी दखलही घेतली नाही त्यामुळे नाराज झालेल्या महाआघाडीतील भाजपाचे नगरसेवक रवी पाटील यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे दिल्याने खळबळ उडाली आहे.

या निवेदनात रवी पाटील यांनी म्हटले की, प्रभाग 6 मध्ये असणार्‍या आरती चेंबर्स अपार्टमेंटला पालिकेने कंजेस्टेड झोन म्हणून मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी माझ्यासह अनेक नागरिक या ठिकाणे अनेक वर्षांपासून रहात आहेत. परंतु या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांची परवानगी न घेता पालिकेनेच शेजारी चालू असलेल्या बांधकामाला सर्व नियम धाब्यावर बसवून प्लॅन मजूर करुन घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी रात्रंदिवस जोरदारपणे काम सुरु झाले आहे. या बांधकामामुळे बाहेरुन येणारी हवा पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच पाण्याची पाईप, ड्रेनेज लाईन बंद झाली आहे.

या ठिकाणी कोणता व्यवसाय चालणार नाही. याबाबत होणार्‍या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मी स्वतः तक्रार अर्ज केले आहेत. परंतु पालिकेच्या अधिकार्‍यांनी या तक्रारींकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. नगरसेवकांनी दिल्या गेलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

जर लोकहिताची कामे नगरसेवकांकडून होत नसतील तर नगरसेवकपदावर राहण्याचा आम्हाला अधिकारच काय? असा सवाल केला. ज्या पालिकेत नगरसेवकांचीच कामे होत नसतील तर त्या पदावर राहण्यास मलाच रस नाही. त्यामुळे मी आपणाकडे राजीनामा देत असून माझा राजीमाना तातडीने मंजूर करावा अशी विनंती रवी पाटील यांनी या पत्रात केली आहे.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यासाठी आलेल्या नगरसेवक रवी पाटील यांच्यासमवेत या भागातील विकी शर्मा, मोती बालाणी, रशिद खान, छोटू पठाण, निवृत्ती जाधव, ईस्माईल शेख, प्रशांत खैरनार, नरेंद्र सोमाणी, शिवाजी उगले, नाना मोरे, विनोद वाघमारे, रवी चव्हाण, उत्तमराव शेख, श्री. वायदेसकर,गणेश जाधव, राजू गमले, किशोर उमाप, शरद शिंदे, मनोज जाधव, अकील पठाण, आकाश गायकवाड, संदीप काळोखे, उमेश पवार, नाना वराडे, प्रतिक ससाणे, सागर कांबळे, सद्दाम शेख, गोरख वाघ, उमेश बिडवे, सुनील गुरव, रवी रोकडे, कलीम सय्यद, फिरोज शेख, दिपक जठार, ज्ञानेश्‍वर वराडे, पंकज बाविस्कर, सुहास भामरे, जाकीर शेख, राजू गमले, मनोज जाधव आदी उपस्थित होते.

रवी पाटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे महाआघाडीत सुरु असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे महाआघाडीतील नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रवी पाटील यांचा राजीनामा दुर्दैवी ः प्रकाश चित्ते
लोकनियुक्त नगराध्यक्षांना निवडून आणण्यासाठी महत्वाच्या वाटा उचलणार्‍या भाजपाच्या नगरसेवकाला एक वर्षाच्या आत राजीनामा द्यावा लागतो यासारखी दुर्दैवी बाब नाही. पालिकेच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व महाआघाडीची नेते प्रकाश चित्ते यांनी दिली.
त्यांच्या फ्लॅट शेजारी चालू असलेल्या बांधकामाचा प्लॅन नगराध्यक्षांच्या सहीनेच मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक रवी पाटील यांनी लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्या तक्रारींची नगरपालिकेने साधी दखलही घेतली यासारखे दुर्दैव काय असावे? अशी परिस्थिती असेल तर आम्ही आदिकांच्या सत्तेच्या विरोधात संघर्षास सुरुवात करत आहोत. नेहमीच चुकीच्या कामांना पाठिंबा देत भ्रष्टाचाराच्या गटारगंगेला अभय देण्याचे काम त्यांनी केले आहे. आता पूर्वीची महाआघाडी राहीली नसून महाआघाडीची बिघाडी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.नगरसेवक रवी पाटील यानच्या भागातील अनेक कामे अपूर्ण आहेत. ठराविक नगरसेवकांच्या भागातील कामे केली जात असून याबाबत विचारले असता त्याचे उत्तर दिले जात नाही.

राजीनामा स्विकारला नाही ः आदिक
नगरसेवक रवी पाटील हे एक पत्र घेऊन आले. त्यांना सांगितले की, आज मुख्याधिकारी रजेवर आहेत. उद्या ते आले की याबाबत सविस्तर चर्चा करु. परंतु आपण राजीनामा देवू नका. मी त्यांचा राजीनामा स्विकारला नाही. त्यांच्या फ्लॅट शेजारी चालू असलेल्या कामाबाबत मला काहीच माहित नाही. त्या बांधकामाच्या प्लॅनविषयीही काहीच माहित नाही. मुख्याधिकारी आले की, त्यांच्याशी चर्चा करुन तुमचा प्रश्‍न सोडवू असे सांगितले होते. त्यामुळे उद्या याबाबत संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या प्रश्‍नाबाबत बोलणार असल्याचे ते म्हणाले. तक्रारी सगळ्यांच्याच असतात सगळ्यांच्याच तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे तसाच त्यांच्या तक्रारीची दखल घेऊ असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.

समज-गैरसमज दूर करु-दीपक पटारे
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या महाआघाडीतील भाजपाचे नगरसेवक रवी पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे. याबाबत जे काही समज गैरसमज झाले ते दूर करुन पुन्हा पूर्ववत कामकाज होईल यादृष्टीने प्रयत्न करु, असे महाआघाडीतील नेते पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे यांनी सांगितले. त्यांनी राजीनामा देणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मी चार ते पाच दिवस बाहेरगावी असल्यामुळे याबाबत फारशी कल्पना नाही. श्रीरामपूरात आल्यानंतर याबाबत नक्की काय झाले याबाबत महाआघातील सर्व नगरसेवक व नेत्यांशी चर्चा करुन यातून चांगला तोडगा काढण्याचा प्रयत्न करु.

14 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती
या बेकायदेशीर सुरु असलेल्या बांधकामाबाबत न्यायालयात सुनावणी सुरु असून काय याबाबत तारीखही होती. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयात 14 नोव्हेंबरपर्यंत सदरचे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या सुनावणीची पुढील तारखे 15 नोव्हेबर अशी आहे. त्यामुळे 15 तारखेला न्यायालयात या बेकायदेशीर बांधकामाबाबत काय निर्णय याकडे लक्ष लागले आहे.
रवी पाटील हे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे खास मर्जीतले असून गेल्या पालिकेच्या निवडणुकीत त्यांनीच रवी पाटील यांना भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगितले होते. याबाबत महाआघाडीचे नेते म्हणून असलेल्या सिध्दार्थ मुरकुटे यांना विचारले असता त्यांनी याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत आपण मोठ्या साहेबांनाच विचारा. असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

*