Type to search

ब्लॉग

Blog: बायोपिक वेडे बॉलिवुड!

Share

नव्वदचे दशक. शेखर कपूरचा बँडिट क्वीन झळकला आणि बॉलिवूडमध्ये एकच गजहब झाला. फुलनदेवीच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आरोप-प्रत्यारोप-संस्कार-संस्कृती-गल्ला अशा सर्वार्थाने चर्चा झालेल्या बायोपिक! पण म्हणून बायोपिकचे पीक काही बॉलिवूडमध्ये अवतरले नाही. पण अलिकडच्या काही वर्षात त्यांची वाढणारी संख्या आणि त्यांना मिळणारे प्रेक्षक कमालीचे दखलपात्र आहेत.

बँडिट क्वीन झळकला ते वर्ष होते 1994. त्यानंतर 2000च्या सुमारास जब्बार पटेलांची ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ ही एक उत्तम कलाकृती. 2001 मध्ये शाहरूखचा अशोका, 2002मध्ये अजय देवगणचा भगतसिंग, 2004 मध्ये बोस दी फॉरगॉटन हिरो, 2005 मध्ये मंगल पांडे, 2007 मध्ये गांधी माय फादर आणि गुरू, 2008 मध्ये जोधा अकबर अशी काहीशी आहिस्ते बायोपिक येत होते आणि जात होते. पण अलिकडे काही वर्षात बायोपिकचा वेग वाढला आणि प्रेक्षकांना काही शानदार चित्रपटही अनुभवता आले.

मेरी कोम, मांझी : दी माऊंटेन मॅन, सुरमा, सरबजीत, मॉन्टो, भाग मिल्खा भाग, पानसिंग तोमर, शहिद, सचिन : ए बिलियन्स ड्रीम, एम.एस.धोनी : अनटोल्ड स्टोरी, दंगल, निरजा, सूरमा, गोल्ड, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा कलाकृतींनी प्रेक्षकांना आनंद दिला. सोबतच डट्री पिक्चर, हसिना पारकर, मै और चार्ल्स, डॅडी, अझहर, संजू आदी प्रेक्षकांच्या भेटीला आले. मराठीतही हेमलकसा, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी, एक अलबेला असे बायोपिक हाताळले. अलिकडे हिंदीत मणिकर्णिका, ठाकरे, पीएम नरेंद्र मोदी, दी अ‍ॅक्सीडेंटल प्राईममिनिस्टर, ताश्कंद फाईल्स, केसरी आदी चित्रपट प्रदर्शित झाले. हृतिकचा सुपर-30 लवकरच प्रेक्षक भेटीला येईल. अर्थात ही यादी वाढतच जाणार आहे.

आता बॉयोपिकवर आपण चर्चा का करत आहोत, याविषयी! नुकतेच एक गॉसिप बॉलिवूडमार्गे माध्यमात चर्चेत होते. सलमान खानवर बायोपिक येणार, हे ते गॉसिप. भारतीय प्रेक्षकांना अशाच महान(?) व्यक्तीमत्वांच्या पडदादर्शनाची गरज आहे का, येथपासून बायोपिकने त्यांच्या इतिहास बदलणार का, येथपर्यंतच्या प्रश्‍नांची चर्चा तर होणार!

बॅण्डीट क्वीन आधीही भारतीय चित्रपटांनी बायोपिक हाताळले होते. स्वातंत्र्यसेनानीच्या जीवनावर आलेले ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट जमान्यातील चित्रपट रूढार्थाने बायोपिकच! पण अलिकडे मात्र या प्रयोगाला ग्लॅमर आलं आहे. त्याच कारण आहे, मुख्य श्रेणीतील अभिनेते आणि अभिनेत्रींनी गंभीरपणे घेतलेला हा प्रकार. अमीर, शाहरूख, सलमान, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, कंगणा रनौत, विद्या बालन, रणवीर या स्टारकास्टवरून नजर फिरवली तरी बायोपिकचा बॉलिवूडला किती मोह आहे, याचा अंदाज येतो.

यातील काही चित्रपट खरंच रोमांच उभे करतात. मेरि कोम, भाग मिल्खा भाग, मांझी, दंगल आदी चित्रपट उत्कट आनंद देतात. त्याचवेळी संजूसारखे गल्लाभरू प्रयोगही प्रचंड यशस्वी होतात. गल्लाभरू असले तरी दिग्दर्शन आणि अभिनय लाजवाब होता, हे वेगळे सांगणे नको. डर्टी पिक्चर तर बॉलिवूडच्या व्यवस्थेलाच फटकारतो.

संजय दत्तच्या चाहत्यांनी संजू डोक्यावर घेतला. चित्रपटाने नैतिक पातळीवर मोठी चर्चा घडविली. त्याला कारण संजय दत्तचा जीवनप्रवास. मादक पदार्थ, अवैध शस्त्रसाठा, गुन्हेगारांना मदत, जेल असे जीवनातील सर्व काळ्या बाजू असलेला तरूण कुटुंब आणि मित्रांमुळे सावरला गेला. तरिही समाजाने त्याच्यापासून कोणता आदर्श घ्यावा, हा आक्षेप घेणार्‍यांचा प्रश्‍न. त्याला समर्पक असे उत्तर काहीच नाही.

आता तोच प्रश्‍न पुन्हा सलमानचा बायोपिक आला तर पुढे येण्याची शक्यता आहे. दारूच्या नशेत कारखाली फुटपाथवर निजलेले जीव चिरडण्यापासून, आघाडीची अभिनेत्री एश्‍वर्याच्या दारावर धिंणागा घालण्यापर्यंत अनेक प्रताप सलमानच्या नावे जमा आहेत. सुप्रसिद्ध काळवीट प्रकरणात तर तो कुप्रसिद्ध आहे. तरिही सलमान आदर्शाचे लेप लावून उजळवला जाणार असेल तर यास काय म्हणावे?

बॉलिवूड बायोपीकमध्ये अपवाद वगळता उत्तम कथामांडणीने प्रेक्षकांना निखळ आनंद आणि प्रेरणा दिली आहे, हे नाकारता येणार नाही. तेव्हा सलमानसारखे तद्दन गल्लाभरू बायोपिक येणार असतील तर येवो, पण सोबतीला मेरि कोम, निरजा, मांझीसारखे ‘प्रेरणा’चित्र पडद्यावर येत राहो, अशी अपेक्षा करूया!

– अरविंद आरखडे
   9689602039

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!