पावसाळापुर्व कामांत सत्ताधार्‍यांकडुन मोठा भ्रष्टाचार – बोरस्ते; महासभेत सत्ताधार्‍यांना सेना विचारणार जाब

0

नाशिक । शहरात बुधवारी झालेल्या पाऊसामुळे महापालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळापुर्व कामांचे प्रभागानुसार 31 ठेके देतांना त्यांची स्थायी व महासभेत मंजुरी न घेता आयुक्तांच्या अधिकारात 5 ते 10 लाखांपर्यतची कामे देण्यात आली, मात्र यातील बहुतांशी कामांचे कार्यादेश देण्यात आले नाही.

अशाप्रकारे पावसाळापुर्व कामांत मोठा भ्रष्टाचार झाला असुन याची किमंत नाशिककरांना चुकवावी लागली असा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. यासंदर्भात आपण येत्या महासभेत लक्षवेधी देणार असुन याचा सत्ताधार्‍यांना जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे शहरात तलाव निर्माण झाल्याने नाशिककरांना बुधवारी त्यांची मोठी किंमत चुकवावी लागली. नाशिककरांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या सत्ताधार्‍यांच्या पारदर्शी कारभाराची नाशिककरांना माहिती व्हावीत म्हणुन आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी सांगितले.

कालच्या पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडल्याचे सांगत बोरस्ते म्हणाले, पावसाळापुर्व कामात प्रभागातील नाले सफाई, चेंबरमधील गाळ व कचरा काढणे, त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रभाग निहाय निवीदा काढण्याचे काम करण्यात आले. हे काम 31 मे पुर्वी होणे अपेक्षीत असतांना या कामांची मंजुरी महासभा व स्थायी समितीत न घेता आयुक्तांच्या अधिकारात हे काम मंजुर करुन घेतल्याचे सांगण्यात आले.

मात्र यातील बहुतांशी कामांच्या आजपर्यत (दि.15) वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हे कामच सुरू नाही. प्रत्येक प्रभागात सुमारे 5 ते 10 लाखापर्यत ही पावसाळापुर्व कामांना परस्पर मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात पावसाळापुर्व कामे झालेलीच नाही. बुधवारच्या पावसानेजागोजागी तलाव निर्माण झाले आणि पाण्याच्या प्रवाहाने कचरा वाहुन गेला आहे. प्रत्येक प्रभागासाठी 4 ते 5 कोटींची कामे 31 ठेकेदारांना देण्यात आली आहे.

आता हे ठेकेदार कोण ? हे शोधण्याची गरज असुन या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप बोरस्ते यांनी केला.
स्थायी समितीत भुसंपादनाच्या कोटीच्या कोटी रुपयांच्या प्रस्तावांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्याचे काम केले जाते. परंतु शहरातील पाणी निचरा होण्यासाठी व पावसाळापुर्व कामे स्थायीत मंजुर का झाले नाही ?

आयुक्तांच्या अधिकारात वर्क आर्डर का दिल्या गेल्या नाही ? असा प्रश्न उपस्थितीत करीत बोरस्ते म्हणाले, शहरात तलाव होण्यामागे हीच गोम आहे. नगरसेवकांना कामांसाठी भीक मागावी लागते, मग हा पैसा जातो कुठे ? यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल होत असली तरी सामान्यांच्या जीवनाशी निगडीत पावसांळी पाण्याच्या प्रश्न प्रशासन सोडवू शकत नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम सत्ताधार्‍यांचे आहे. हा पाऊस प्रशासनाची लिटमस चाचणी होती, जास्त पाऊस आला तर शहराचे काय होईल. प्रशासनातील अधिकार्‍यांना कामाला लावण्याऐवजी सत्ताधारी आमदार अधिकार्‍यांना सोबत पाहणी करीत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली.

यामुळे शहरात नगरसेवकांना रस्त्यावर काम करण्यासाठी उतरावे लागले. यासंदर्भात आपण येत्या महासभेत सत्ताधार्‍यांना जाब विचारणा असुन यासंदर्भात लक्षवेधी मांडणार असल्याचेही शेवटी बोरस्ते यांनी सांगितले. प्रशासनाने आता तात्काळ शहरात पेस्ट कंट्रोलची फवारणीचे काम हाती घ्यावेत अन्यता शहरात साथीचे आजार पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*