बिग बी २ ऑगस्टला मानतात खास; वाचा काय घडले त्यादिवशी…

0

देशदूत डिजिटल विशेष

बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात. हे जरा विचित्र वाटेल पण ते खरे आहे.

आजच काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट करून २ ऑगस्ट १९८२ बद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. या दिवशी त्यांचा पुनर्जन्म झाल्याचे ते मानतात.

त्यांची जन्मतारीख आहे, ११ ऑक्टोबर १९४२, मात्र ३५ वर्षांपूर्वी आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्यांच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली.

त्यातून ते जगतात किंवा कसे असाही प्रश्न निर्माण झाला होता.

कुली हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वच अर्थाने मैलाचा दगड मानला जातो. बंगलोर येथे कुलीचे शुटिंग सुरू होते, त्यावेळची ही गोष्ट आहे.

कुलीचे पोस्टर आणि त्यातील अमिताभ यांच्या अपघाताचा हा सीन. (सौजन्य : युटयूब व्हिडिओ)

२४ जुलै ८२ ला बंगळूरू येथे या चित्रपटाचे शुटिंग सुरू असताना मारामारीच्या सीनमध्ये अभिनेता पुन्नीत इस्सरचा एक ठोसा अमिताभ यांच्या पोटाला जोरात लागला आणि ते बाजूच्या टेबलवर फेकले गेले.

हा सीन अगदी अस्सल झाल्याबद्दल सर्वांनी बच्चन यांचे कौतुक केले पण त्यांच्या पोटातून कळ येत होती. ज्या टेबलवर ते पडले, त्याचा एक भाग त्यांच्या पोटात जोरदार घुसला होता. रक्त कमी आले असले तरी पोटाच्या आत जखम झाल्याचे दिसत होते.

सुरुवातीच्या तपासणीत फारसे काही निदान झाले नाही. मात्र त्यानंतर २७ जुलैला डॉक्टरांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला, तेव्हा धक्काच बसला. बिग बींचे लहान आतडे फाटले होते आणि पोटातील अवयवांना जोडणारा पडदाही फाटला होता.

ब्रीच कँडीतून बरे होऊन बाहेर आले तेव्हाची अमिताभ यांची ही मुद्रा. छायाचित्र सौजन्य: बुकमायशो

२८ जुलैला ऑपरेशननंतर बच्चन यांना न्युमोनिया झाला आणि तब्येत आणखीनच खालावली. त्यांचे रक्त पातळ  होऊ लागले. आणि रक्तातील पेशी मुंबईहून मागवाव्या लागल्या.

पुढे त्यांना ३१ जुलैला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर ब्रीच कँन्डी रुग्णालयात विशेष कक्षात ठेवले. १ ऑगस्टला त्यांची तब्येत ठिक होती, पण २ ऑगस्टला पुन्हा बिघडली.  शरीरात विष पसरले होते आणि त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी झाली होती.

तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा एकदा ऑपरेशनचा निर्णय घेतला. ३ तास हे ऑपरेशन चालले. त्यावेळेस संपूर्ण देशात, सर्वच धर्मियांनी अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना केल्या.

कालांतराने त्यांची तब्येत सुधारली. मात्र अजूनही बिग बी २ ऑगस्ट आपल्या आयुष्यातला खास दिवस मानतात.

तुमच्या प्रार्थनांमुळे मी जिवंत राहिलो. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. ‍

पुढे याच घटनेचा संदर्भ घेऊन कुली चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला. अभिताभ यांना गोळ्या लागतात आणि ऑपरेशननंतर ते पुन्हा ठिक होतात. त्यांच्यासाठी सर्वजण प्रार्थना करतात असे या चित्रपटात दाखविले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील लोकांनी त्याला डोक्यावर घेतले.

 

 

LEAVE A REPLY

*