गेल्या पाच वर्षांपासून सायकलींचे वाटप ठप्प

0

पंचायत समितीचा अजब कारभार; यावर्षी सर्व सायकलींचे वाटप करणार : पटारे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –श्रीरामपूर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील गरीब शालेय विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून सायकल वाटप ठप्प असल्याचे उघडकीस आले आहे. यावर्षी लवकरच या सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे यांनी दिली.
पंचायत समितीचे सभापतिपदी दीपक पटारे यांची निवड झाल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींचे वाटपच होत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना बोलावून विचारले असता ग्रामीण भागातून कोणाचेही प्रस्ताव न आल्यामुळे सायकल वाटप करण्यात आलेले नाही. परंतु जे काही प्रस्ताव आले होते, त्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे त्यांना देण्यात आली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
अधिकार्‍यांनी तीच कागदपत्रे पूर्ण करण्यास मदत करून त्या सायकली त्याच वर्षी वाटप करण्यात आल्या असत्या तर त्यांना त्याचा लाभ घेता आला असता.
आता पाच वर्षापूर्वी ज्या मुलींनी सायकल मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले, एकतर त्यांची दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असावे, नाहीतर त्यांची लग्ने झाली असावीत. आज त्यांचे नाव पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाकडे असलेल्या यादीत दिसून येत आहे. अशा प्रकारच्या कामकाजामुळे अनेकांना हसू आले आणि अनेकांनी चीडही व्यक्त केली.
वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांनीही याबाबतची चौकशी केली नाही किंवा जे निवडून आले त्यांनीही या सायकलींकडे ढुंकूनही पाहिले नसावे. केवळ एक शो पीस म्हणून या सायकली पंचायत समितीच्या गोडावूनला रचून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक सायकलींचे पार्ट खराब झाले आहेत तर अनेक सायकलींचे नुकसान झाले आहे. आता अशा सायकलींचे यावर्षी वाटप होणार का? असा सवाल करण्यात येत आहे.
  यावर्षी ज्या लाभार्थींचे प्रस्ताव आले आहेत, त्या सर्वांना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या 150 पैकी 38 प्रस्ताव मंजूर झाले असून या 38 सायकलींचे वाटप या आठवड्यात करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 122 लाभार्थ्यांच्या प्रस्तावात कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करुन सगळ्यांनाच सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावर्षापासून प्रत्येक गावातून अशा प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सभापती दीपक पटारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*