आजीदेखत 3 वर्षांच्या नातीचा बिबट्याने घेतला जीव

jalgaon-digital
2 Min Read

गळनिंब (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे आपल्या आजीजवळ खेळत असलेल्या 3 वर्षाच्या नातीवर नरभक्षक बिबट्याने झडप घातली. जवळपासच्या नागरिकांनी या चिमुरडीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना काल (शुक्रवार) रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

काल सायंकाळी गळनिंब येथील ज्ञानेश्‍वरी नामदेव मारकड (वय 3) ही चिमुरडी अंगणात खेळत होती. तिच्याजवळ तिची आजीही होती. आजी आपल्या नातीला उचलून घेणार त्याचवेळी घराच्या पाठीमागून आलेल्या बिबट्याने ज्ञानेश्‍वरीवर झडप घातली. आजीने आरडओरडा केला. तोपर्यंत बिट्याने या चिमुरडीला घेवून जवळच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. आजीच्या आवाजाने जवळपासचे नागरिक जमा झाले. गळनिंब-खंडाळा रस्त्यानजिक ही वस्ती व उसाचे शेत असल्याने काही तरूणांनी उसात मोटारसायकली घातल्या. मोटारसायकलींच्या प्रकाशामुळे बिबट्याने या शेतातील विहिरीजवळ ज्ञानेश्‍वरीला टाकून तथून पळ काढला. तिच्या गळ्याजवळ व चेहर्‍यावर मोठ्या प्रमणावर जखमा झाल्याने तिला तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुगण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

प्रवरा नदीकाठचा हा बागायती पट्टा असल्याने या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी कुरणपूर येथे आपल्या चुलतीसोबत गणपतीची आरती करून घराकडे परत येत असलेल्या दर्शन देठे या मुलावर बिबट्याने झडप घातली होती. त्यात तो ठार झाला. या घटनेची पुनरावृत्ती या भागात पुन्हा घडल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन विभागाने या भागात तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *