मुख्यमंत्री फडणवीस 21 रोजी भुसावळात!

विविध विकासकामांचे उद्घाटन - आ. खडसे यांची माहितीः मेरा परिवार भाजपा परिवार मोहिमेचे उद्घाटन

0
भुसावळ । शहर व परिसरातील विविध विकास कामे जोमाने सुरु असून या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनासाठी निधी मंजुर केला आहे. शहरातील अमृत योजना एक वर्षाच्या कालावधीत पुर्ण होईल. तसेच खा.रक्षा खडसे यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा व शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा दि.21 फेब्रुवारी रोजी भुसावळ दौरा निश्चित झाला आहे, अशी माहिती माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी दिली. यावेळी ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ या दि.12 फेबु्र्रवारी ते दि. 2 मार्च पर्यंत सुरु असलेल्या अभियानाचे उद्घाटन आ. खडसे यांचे हस्ते करण्यात आले.

नगरसेवक प्रा.डॉ.सुनिल नेवे यांच्या अटल निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरातील सोमाणी गार्डन जवळील ग्रीन स्पेस अंतर्गत निर्माणाधीन असलेल्या उद्यानाची तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील तयारीची पाहणी आ.खडसे यांनी दि.12 रोजी केली.

बैठकीत बोलतांना आ. खडसे पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षांमध्ये खा.रक्षा खडसे यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रकाशन व विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होेणार आहे. या अहवाल प्रकाशनामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ग्राम पातळीपर्यंत कसे पोहचविण्यात आलेे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शहरातील विविध कामे सुरु असून यातील एलईडी लाईट बसविण्याचे कार्य जवळपास 100 टक्के पुर्ण झाले आहे. भुमिगत गटारींचा प्रस्ताव तयार करणे सुरु आहे. शहरातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपये नव्याने मंजुर केले आहे. रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारक बेघर झाले असून त्यांना घरे मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी येण्याचे मान्य केले असून दि.21 फेबु्रवारी रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

भुसावळ-मुंबई व्हाया नंदुरबार 16पासुन धावणार – मागील अनेक वर्षांपासून मुंबईसाठी भुसावळहुन स्वतंत्र गाडी असावी या प्रलंबित मागणीची पुर्तता होत असून दि.16 फेब्रुवारी 19 पासून व्हाया नंदुरबार ही गाडी सुरु होणार आहे, अशी माहिती आ. एकनाथराव खडसे यांनी यावेळी दिली. नव्यानेच सुरु झालेल्या राजधानी एक्सप्रेसला भुसावळ येथे थांबा कधी मिळणार? अशी विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, राजधानीला सध्या भुसावळ येथे थांबा नसला तरी लवकरच या गाडीला तांत्रिक थांबा देण्यात येणार आहे. तसेच ही गाडी सध्या आठवड्यातून दोन दिवस असली तरी लवकरच ती दररोज धावणार आहे. यासाठी लागणार्‍या रेल्वे रॅकची जुळवाजुळव सुरु असल्याचेही ते म्हणाले.

पाच नव्या उद्यानांची निर्मिती: नगराध्यक्ष – शहरातील विविध भागांमध्ये पाच उद्यानांची निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर असून ग्रीन स्पेस योजनेंतर्गत सर्वात मोठे 10 एकर जागेवर अडीच कोटी रुपये खर्चून सोमाणी गार्डनच्या बाजूला उद्यान निर्मिती करण्यात येत आहे. विकास समतोल असावा यासाठी दक्षिण भागातील हनुमान नगर येथे अडीच ते तीन एकर जागेत नगरपालिका उद्यान विकसीत करत आहे. निवडणुकीत दिलेला शब्द पाळला जात असून विकास कॉलनीसह गडकरीनगरातही उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गणेश कॉलनीजवळ 75 लाख रुपये खर्चुन उद्याननिर्मिती करण्यात येत आहे. उन्हाळयात पाणी टंचाई भासू नये यासाठी नगरपालिका 10 टँकर खरेदी करणार असून एकुण 17 टँकरद्वारे भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी यावेळी दिली.

बैठकीप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, गटनेते हाजी मुन्ना तेली, युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, किरण कोलते, अमोल इंगळे, अ‍ॅड. बोधराज चौधरी, देवा वाणी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, रिपाइंचे रमेश मकासरे, मुकेश पाटील, निर्मल (पिंटू) कोठारी, संतोष बारसे, परीक्षित बर्‍हाटे, शैलजा पाटील, राजू नाटकर, गिरीश महाजन, दिनेश नेमाडे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.ई.जी. नेहते, दिनेश नेमाडे, सुमित बर्‍हाटे, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*