भुसावळ : आगपेट्यांचा दुर्मिळ संग्रह – राकेश भावसार यांचा 29 वर्षांपासून छंद : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्न
Share

84 देशांमधील 30 हजारांपेक्षाही जास्त आगपेट्यांचा संग्रह
: निरज वाघमारे :
भुसावळ ।
मुळचे इंदुर येथील रहिवासी व हल्ली भुसावळ येथील सहकार नगरातील आयएमए हॉलच्या नजीक एकदंत अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. 1 मधील रहिवासी व रेल्वे खात्यात कमर्शियल इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले राकेश भावसार यांनी देश विदेशातील आगपेट्यांचा दुर्मिळ संग्रह तयार केला आहे. सुमारे 84 देशातील 30 हजारांपेक्षा अधिक आगपेट्या त्यांच्या खजिन्यात दाखल झाल्या आहेत. या सोबतच त्यांनी विविध टपाल तिकिट व देश विदेशी चलनांचा संग्रह देखिल केला आहे. लिम्का बुकमध्ये त्यांनी या संग्रहाची नोंद करण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.
राकेश भावसार मुळचे इंदुर येथील आहे. त्यांनी शालेय शिक्षण इंदुर व खंडवा येथे घेतले. त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. त्यांना लहानपणी पॉकेटमनी मिळायचा त्यातुन देखिल ते आगपेट्यांचे कव्हर जमा करित असत. त्यांचा हा छंद बहरत जाऊन त्यांनी देश विदेशातील आगपेट्या जमविण्यास सुरुवात केली. इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक अशी त्यावेळी कुठलीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांनी विदेशात असलेल्या त्यांच्या मित्रांना पत्र पाठवून ते आगपेट्या मागवून घेत असत. आज त्यांच्याकडे 84 देशांमधील 30 हजारांपेक्षा अधिक दुर्मिळ आगपेट्यांचा संग्रह जमा झाला आहे.
रेल्वे नोकरीचा फायदा – महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते आधी खाजगी कंपनीत नोकरीला लागले. त्यावेळी त्यांना नागपूर, पॉण्डेचेरी, चेन्नई, गुजराथ आदी ठिकाणी कामानिमित्त जावे लागत असे. याचा फायदा घेत ते ज्या ज्या ठिकाणी गेले. तेथून त्यांनी आगपेट्या आणल्या.पश्चात त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली. या नोकरीचा त्यांना संग्रहासाठी खुप फायदा झाला. ओडिशा, झारखंड, महाराष्ट्र आदी राज्यात त्यांनी नोकरी करत त्यांच्या संग्रहात वाढ केली.
देश विदेशातील आगपेट्या- राकेश भावसार यांच्या कडील संग्रहात अमेरिका, कॅनडा,जपान, इंडोनेशिया, स्पेन, इटली, थायलंड, इंग्लंड, रशिया, युक्रेन,इराण, ईराक आदी विविध देशातील आगपेट्या आहेत. सन 1910 पासूनच्या आगपेट्या त्यांच्याकडे आहे. अष्टविनायक, इंग्रजी अल्फाबेट्स, विविध कुत्र्यांची छायाचित्रे असलेल्या आगपेट्या, मार्लिन मोन्रो, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांचे फोटो असलेल्या तसेच प्राणी, पक्षी, वाहने, फुलांचे प्रकार, संगीत वाद्य, संगीतकार, राजकीय व्यक्तिंचे फोटो असलेल्या आगपेट्या आहेत. याच बरोबर त्यांच्या संग्राहात एक इंच आकाराचा कॅनडात तयार झालेला मॅचबॉक्स, एक फुट लांबीची जपान येथील आगपेटी,प्लॅस्टिक पत्र्याचे कव्हर असलेली आगपेटी, भारतातील आयनो कंपनीच्या पाच माचीसचा एक सेट, तळहातावर छोटीसी दिसेल अशी बायबल व कुराणाची आगपेटी देखिल लक्षवेधी ठरणारी आहे.
टपाल तिकिटे – आगपेट्यांच्या संग्रहासहच श्री.भावसार यांच्याकडे 20 देशांमधील चार हजार टपाल तिकिटे आहेत. त्यात वारली पेंटींग, योगासने, वाहतुकीची साधने, महात्मा गांधी, बालदिवस आदी चित्रे असलेली तिकिटे आहेत. याच बरोबर जपान येथील सम्राट व सम्राज्ञी दौर्याव असतांना काढण्यात आलेले. फस्ट डे कव्हर, इंदुर येथे दादाभाई नौरोजी यांच्यावर काढलेले फस्ट डे कव्हर, शिर्डी येथील साईबाबा यांच्या महासमाधी शतक वर्षा निमित्त काढलेले टपाल तिकट देखिल आहे.राकेश भावसार यांना राईडिंगची सवय असल्याने त्यांनी भारतातील भटकंती करुन अनेक प्रकारच्या आगपेट्या जमा करुन त्यांचा संग्रह बहारला आहे. या कामी त्यांची पत्नी भारती, मुलगी परिना, अनया यांची देखिल मोलाची साथ मिळत असल्याचे ते सांगतात.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्न
भविष्यात देखिल विविध देशांमधील आगपेट्या संग्रहित करण्याचा छंद सुरुच ठेवणार असून लिमका बुक ऑफ रॅकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. लहानपणापासून माचिस गोळा कारण्याचा छंद आहे. माचिस गोळा करणार्यांना फिलयुमॅनिस्ट म्हणात. माचिस पुष्कळ प्रकारच्या असतात. त्यात कागदाची, लकाडाची, इस्किलेंट अशा प्रकारच्या असतात. आज माचिस गोळा करण्याच्या माझ्या छंदाला 29 वर्षे झाली आहेत.
– राकेश भावसार