46 लाखांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी

jalgaon-digital
2 Min Read

भुसावळ

नागपूरातील प्लॉट विक्रीतून आलेले पैसे उकळण्यासाठी येथील पाच जणांनी 46 लाखांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील भारत मोतीराम गिरनारे यांचे वडिलांचा नागपुर येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट होता. तो त्यांनी नागपूर येथील प्रसन्ना टोकेकर यांना विकला असून त्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे. गिरनारे यांचेकडून पैसे उकळण्याच्या उद्देेशाने भुर्‍या बारसे याने फोन करून गिरनारे यांना संजय यांच्या कार्यालयावर बोलवले.

भारत गिरनारे तेथे आल्यावर भुर्‍या बारसे व अन्य एका अज्ञात व्यक्तिने गिरनारेंचा मोबाईल हिसकावून, नागपुरच्या प्लॉटचा विषय माझ्याकडे आला असुन त्या प्लॉटचे 46 लाख रु. मला आत्ताच हवे, अन्यथा तुझ्या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली. यानंतर आरोपी संजय याने देखील 46 लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्यावे लागतील नाहीतर तुझे काय खरे नाही अशी धमकी दिली. तसेच बोलेरो गाडीत बसवून संजय यांचे फार्म हाऊसवर घेऊन गेले.

तेथे गेल्यावर त्या सर्वांनी मिळुन गिरनारेंना मारहाण करून विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली. तसेच तेथे असलेल्या रशीद व एका अनोळखी इसमाने फिर्यादीस 46 लाख रुपयांची खंडणी मागुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी येथील बाजारपेठ पो.स्टे.ला. गु.र.नं. 60/2020, भा.दं.वि. 365, 384, 323, 143, 147, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत पा.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून डिवायएसपी गजाजन राठोड, पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, तसलीम पठाण, पोना रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, तुषार पाटील, समाधान पाटील, पोकॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने भुर्‍या बारसे (रा. वाल्मिक नगर), किशोर उर्फ सुधाकर टोके (रा.गांधीनगर) व अनिल किशोर डागोर (रा.वाल्मीक नगर) यांना वाल्मिक नगरातून ताब्यात घेतले होते. तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस (दि.26 पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *