Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लाखो रुपये उडवूनही संगमनेरात पैशांचा पाऊस पडेना!

Share

वस्तू शोधण्यासाठी अनेकांची भटकंती; बाबांची मात्र चलती

अंकुश बुब

संगमनेर – सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? हे गाणे एकेकाळी खूप गाजले होते. पावसाच्या प्रतिक्षेत असणार्‍यांंकडून हे गाणे गुणगुणले जायचे. हे गाणे मागे पडून सध्या संगमनेरात वेगळेच गाणे वेड्यासारखे गुणगुणले जात आहे. सांग सांग पैशाचा पाऊस पडेल का? हे गाणे अनेकजण मनातल्या मनात गुणगुणताना दिसत आहेत. पैशाचा पाऊस पडतो असे सांगणार्‍या अनेक भोंदू बाबांनी शहरातील अनेकांना कामाला लावले आहे. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लागणार्‍या वस्तू शोधण्यासाठी शहरातील अनेकांनी डोंगरदर्‍यांत भटकंती सुरू आहे. भोंदू बाबांनी या मंडळींना लाखो रुपयांना लुटूनही त्यांच्या घरी मात्र अद्याप पैशाचा पाऊस पडलेला नाही.

संगमनेरातील मोठे टोळके गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनले आहे. या टोळक्यात उच्चशिक्षितपासून अंगठेबहाद्दरांचाही समावेश आहे. स्वतः इंजिनियर असणार्‍या काही युवकांनाही पैशाच्या पावसाने वेड लावले आहे. पैशाचा पाऊस पडतो असे सांगणारे काही भोंदूबाबा याला कारणीभूत आहेत. अतिशय दुर्मिळ असणारे कासव, गांडमांडूळ व इतर वस्तूंचा वापर करून पैशाचा पाऊस पाडता येतो असे बोलले जाते. यामध्ये 12 नखी कासव, 27 नखी कासव व सुमारे अडीच ते तीन किलो वजनाचे गांडूळ या वस्तूंना मोठे प्राधान्य आहे. गांडूळ, कासव सहसा सापडत नसल्याने त्यांच्या शोधासाठी अनेकांची दिवसभर भटकंती सुरू असते. अकोले तालुक्याच्या डोंगरांमध्ये भंडारदरा परिसर व गुजरातमधील काही गावांमध्ये या वस्तूंच्या शोधासाठी अनेकजण भटकंती करत आहेत.
अनेक युवकांनी यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

मात्र त्यांच्या पदरी अद्याप निराशेशिवाय काहीच आलेले नाही. पैशांच्या मोहापायी अनेकजणांना कर्जबाजारीपण झाले आहे. गांडूळ, कासव या शिवाय ‘कुकी’ नावाची वनस्पतीही या कामासाठी आवश्यक असल्याने या वनस्पतीचा शोध जंगलात घेतला जात आहे. सर्व वस्तू दुर्मिळ असल्याने कोणत्याही दरात या वस्तू खरेदी करण्याची काहींची तयारी असते. गांडूळ 10 ते 15 लाख, कासव 40 लाख रुपये असा भाव देण्याची तयारी अनेकांची असते. गांडुळाची किंमत जास्त असल्याने गांडुळाची वजन वाढण्यासाठी काही जण पकडलेल्या गांडुळाला माठात ठेवून अंडी खाऊ घालतात. त्यामुळे गांडूळाचे वजन लवकर वाढते. मात्र असे गांडुळ खरेदी करणारे या गांडुळाला लवंग व हिंग खाऊ घालून त्यांची तपासणी करतात. लवंग व हिंगामुळे गांडुळाला उलटी होऊन त्यांचे वजन कमी होते. त्यामुळे त्याला कमी किंमत द्यावी लागते.

अशा वस्तू शोधण्यासाठी या चांडाळ चौकटीला काही वन कर्मचार्‍यांचीही साथ मिळत आहे. वनस्पती शोधण्यासाठी हे कर्मचारी सहकार्य करताना दिसत आहेत. यातून त्यांचीही कमाई होत आहे. वनस्पतीच्या शोधासाठी काहींनी थेट नेपाळ दौराही केल्याची चर्चा आहे. काही भोंदू बाबा पुणे व इतर ठिकाणचे रहिवासी असून ते मोठ्या प्रमाणावर फसवणूक करीत आहेत. 10 लाखांचा पाऊस पडतो. अडीच लाख रुपये द्या असे सांगून या भोंदू बाबांनी अनेकांची लूट केली आहे. अनेक प्रयत्न करूनही पैशाचा पाऊस पडत नसल्याने काहीजण वैफल्यग्रस्त झाले आहेत. नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून दूर रहावे असे आवाहन जागृत नागरिकांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!