Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

Share

नाशिक । प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील आंबोडा शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने भिवतास धबधब्याच्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली असून तिच्याकडे एक चिठ्ठी देखील सापडली आहे. तिने आत्महत्या केली का? याबाबत तपास केला जात आहे.

अतिदुर्गम असलेल्या केळावण गावाजवळील भिवतास धबधबा आहे. या धबधब्याची उंची साधारणतः 150 ते 200 फूट असून त्यात 30 फूट पाणी आहे.

धबधब्याच्या कड्यावरून चंद्रकला तुकाराम गायकवाड (16) या विद्यार्थीनीने घरगुती कारणातून मंगळवारी सायंकाळी उडी घेतल्याचा संशय व्यक्त होत असून धबधब्याच्या काठावर तिची ओढणी, चपला, बांगड्या, पायातील साखळ्या, शाळेची वही आढळून आली आहे. त्याचबरोबर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली आहे.

या घटनेची माहिती समजताच केळावणचे पोलिस पाटील विजय चौधरी यांनी पोलिस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कळवणचे पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, बार्‍हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, भिवतास धबधबा अत्यंत अवघड असून घटनास्थळी जाणेही कठीण आहे. त्यामुळे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले असून तिचा शोध घेतला जाणार आहे.

अंधार असल्यामुळे शुक्रवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केळावणचे पोलिस पाटील विजय चौधरी यांनी दिली. ही विद्यार्थिनी आजारपणामुळे तिच्या भावाबरोबर दररोज शाळेत ये-जा करत होती. तिचा मृतदेह हाती लागल्यावरच नेमकी घटना काय घडली आणि तिने आत्महत्या केली का हे निष्पन्न होणार आहे. आधिक तपास आता स्थानिक प्रशासन व पोलीस करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!