सर, आजही आपल्यात आहेत!

0

‘‘मरणात खरोखर जग जगते
आधी मरण अमरपण ये मग ते’’
कविवर्य गोविंदाग्रजांच्या कवितेतील या ओळी आज का आठवल्या याला निमित्त झाले कर्मयोगी भीष्मराजजी बाम यांच्या महानिर्वाणाचे! नाशिककरांना अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला आहे. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात अशा अनेक व्यक्तिमत्त्वांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे रामाच्या पदस्पर्शाच्या रामायण कथेचा वारसा सांगणार्‍या नाशिकची आधुनिक प्रतिमा खूपच उंचावली.

परवा मृत्यूने अनपेक्षित व अचानक आपणातून नेलेले भीष्मराजजी बाम हेही एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व! नाशिक शहरातील महात्मानगर सभागृहात एका कार्यक्रमात सहभागी झाले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची इहलोकीची यात्रा संपवली. केवळ नाशिककरच नव्हे तर देशभरातल्या लाखो तरुण मनांत पोरकेपणाची व जीवाभावाचा सखा-मार्गदर्शक गमावल्याची भावना निर्माण झाली.

अलीकडच्या काळात भारतातील क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीने मोलाची भर घालणार्‍या अनेकांना आपला आधारच गेल्यासारखे वाटले. तशी भावना व्यक्त करणारांत अनेक नामांकित खेळाडू, खेळांचे प्रशिक्षक, कार्यकर्ते, पोलीस व हजारो सामान्य माणसे आहेत. ही बातमी ऐकल्यानंतर प्रत्येकाची अवस्था ‘मन नि:शब्द झाले..’ अशीच झाली होती. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेकांनी नाशिकला धाव घेतली.

जो भेटेल त्याला आपलेसे करणारे विलक्षण आकर्षण बाम सरांच्या ऋजू व्यक्तिमत्त्वात होते. त्यामुळेच तर्‍हेतर्‍हेच्या समस्येवर मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी हक्काने जाण्यात कोणालाही कधीही संकोच वाटला नाही. सरांनीही कधी कोणाला ‘नाही’ म्हटले नाही. सरांकडे गेले म्हणजे आपले प्रश्‍न नक्कीच सुटतील असा दृढविश्‍वास प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्याची हातोटी त्यांना लाभली होती. हजारो-लाखो मनांना जगण्याची उभारी देणे, कार्यरत राहण्याची प्रेरणा देणे, सकारात्मक दृष्टिकोन देणे, हजारोंचा आधारवड बनणे सोपे असते का? त्यासाठी आपपरभाव, माया, मोह, मत्सर, अहंकार, द्वेष, आवेश या मर्यादा समूळ नष्ट व्हाव्या लागतात.

बाम सरांच्या भाषेत या ‘उपटसुंभ भावनांना मूठमाती देता आली पाहिजे.’ हा दुर्मिळ योग सरांना साधला होता व तोही आयुष्यभर पोलीस खात्यात सेवा करून. त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक पद भूषवले आणि सेवानिवृत्तीनंतर क्रीडा मानसोपचारतज्ञ म्हणून सर्व भारताला परिचित झाले. तथापि ‘माणसे जोडणारा माणूस’ हीच त्यांची खरी ओळख होती. शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते नाशिकला स्थायिक झाले.

त्यानंतर ते अगदी मनोमन नाशिककर झाले होते. लौकिकार्थाने ते निवृत्त झाले होते; पण क्रीडा मानसोपचार या आपल्या आवडीच्या क्षेत्रात त्यांनी आपली ‘नवी कारकीर्द’ पूर्ण उत्साहाने सुरू केली होती. भारताचा खंडप्राय आकार लक्षात घेता क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावे लागेल. आपण केवळ ‘चॅम्पियन’ घडवण्याचा विचार करीत आहोत; पण त्याआधी ‘चॅलेंजर’ कोण तयार करणार? पदकासाठी प्रयत्न करतील, आपली गुणवत्ता जोपासू शकतील, असे अनेक ‘चॅलेंजर’ आहेत. त्यांच्या पाठीशी कुणीच उभे राहत नाही.

बहरलेल्या फळांना पाणी द्यायला अनेक जण सरसावतात; पण रुजणार्‍या मुळांना जास्त गरज असलेल्या काळात पाणी घालण्याची कुणाचीच तयारी नसते. असे केवळ विचार व्यक्त करून सर थांबले नाहीत. तर अशा कित्येक कळ्यांना, मुळांना पाणी देण्याचे, त्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम सरांनी अखेरपर्यंत केले. अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, गगन नारंग, अभिनव बिंद्रा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, गीत सेठी, अपर्णा पोपट, गोपीचंद, कविता राऊत, मोनिका आथरे, मोनाली गोर्‍हे, संजीवनी जाधव अशी अनेक फळे त्यांनी केलेल्या मशागतीला आली आहेत.

ही यादी बरीच मोठी आहे. या सार्‍या युवक-युवतींनी देशाचा मान व शान उंचावली आहे. भविष्यात दडलेल्या सावध हाका ऐकण्याचे द्रष्टे मन बाम सरांना लाभलेे होेते. ‘खेळांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून आपण आपल्या पुढल्या पिढ्यांचा घात करीत आहोत. हार व जीत पचवू शकणारे कणखर मन आणि बळकट शरीर खेळाच्या मैदानावरच तयार होते. खेळ व योग यांचे महत्त्व देशाला अद्याप कळायचे आहे’ अशी खंत सर कधी कधी व्यक्त करत. वयात येणार्‍या मुलांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगणारे अनेक चिंताजनक अहवाल रोज प्रसिद्ध होत आहेत.

लहान वयातच मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार अशा व्याधी मुलांना ग्रासू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरांनी व्यक्त केलेल्या भावनेची यथार्थता लक्षात यावी. चांगले खेळाडू निर्माण करण्याची महत्त्वाची जबाबदारी धनिक वर्गाकडे, व्यापारी व उद्योजकांकडेसुद्धा आहे असे ते मानत. शक्य असेल तिथे खेळ व खेळाडू दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण आणि विकासाची जबाबदारी त्यांनी घ्यावी यासाठी शब्द खर्च करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. खेळाडूंच्या सुविधा, उपकरणे, प्रायोजकत्व याबाबत ते नेहमी जागरुक असायचे.

‘मना सज्जना’ या पुस्तकात बाम सर मृत्यूविषयी बोलताना लिहितात, ‘मृत्यू म्हणजे काय आहे? शिव आणि रूद्र ही त्याची दोन रुपे आहेत. माझ्यात जे वाईट आहे त्याचा रूद्र नाश करेल व जे मंगल आणि उत्तम आहे त्याचा शिव सांभाळ करेल आणि त्याला अमर करेल.

प्रकाश आणि अंधार, सत्य आणि असत्य यांच्यात योग्य निवड मी करत राहिलो तर साक्षात शिव माझी निवड करणार आहे, अमरत्वाकरता!’ संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांनी पेरलेल्या प्रेरणा, संकटांना सामोरे जाण्याची व आव्हाने स्वीकारण्याची जिद्द, सकारात्मकता आणि विजिगिषू वृत्ती या गुणांच्या रूपाने सरांनी घडवलेल्या हजारो मनात बाम सर त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा अमर झालेले आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादनपूर्वक श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

*