PHOTOS : भीमा-कोरेगाव प्रकरण : अहमदनगरमध्ये दगडफेक.. बंद..

माळीवाडा, केडगाव, मंगलगेट परिसरात तणाव

0

अहमदनगर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे पडसाद आज (मंगळवारी) सकाळी नगरमध्येही उमटले. सोमवारी रात्रीच नीलक्रांती चौकात जमावाने बसवर दगडफेक केली. सकाळी भिंगार बंदची हाक देत बंद पुकारला आहे. रेल्वेस्टेशन, कायनेटिक चौक, माळीवाडा, मंगलगेट, केडगाव भागात दगडफेक झाली. नगर शहरात ठिकठिकाणी जमाव जमल्याने परिस्थिती तणावात्मक झाली होती.

कोरेगाव भीमा येथे विजयीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये हिंसाचार उफाळला. त्यात एका 28 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी विविध संस्था-संघटनांनी सोमवारी अलोट गर्दी केली होती. या कार्यक्रमानंतर सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. सोशल मिडियावर अफवांचे पीक जोमात पसरले. त्याचे पडसाद लगेचच नगरमध्ये दिसले. निलक्रांती चौकात जमावाने बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे नगरमध्ये सकळीच चौकाचौकात जमाव जमा होण्यास सुरूवात झाली. रेल्वेस्टेशन, केडगाव, मंगलगेट, निलक्रांती चौक आणि मार्केट यार्ड चौकात जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत दोन बसेस, एक खासगी बस आणि कार अशा 10 वाहनांचे नुकसान झाले आहे. कोतवाली पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. दगडफेक करणार्‍यांविरुध्द गुन्हा नोंदविण्याचे काम तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत सुरू होते.

औरंगाबादसह राज्यभर अफवांचे पीक पसरले आहे. बीड, परभणी, सोलापूर, जालना, बुलडाणा, हिंगोली आदी शहरातही तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी एसटी बस फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे तेथे वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 • एसपी मैदानात
  नगरमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील परिस्थितीचा दर अर्ध्या तासाला आढावा घेतला जात आहे. एसपी रंजनकुमार शर्मा हे स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी शहरभर फिरून परिस्थितीचा आढावा घेत शांततेचे आवाहन केले.
 • कापडबाजारात तणाव
  सकाळीच तरुणाच्या काही टोळक्यांनी कापडबाजारात फेरी मारत बंदची हाक दिली. व्यावसायिकांनीही भितीपोटी दुकाने बंद केली. पोलिसांना माहिती समजताच त्यांनी कापडबाजारात धाव घेतली. त्यानंतर जमाव पांगला. त्यानंतर बाजारपेठ पुन्हा सुरू झाली.
 • पोलिसांचा पहारा
  नगरमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागात पोलिसांनी काल रात्रीपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
 • दिल्लीगेटला तोडफोड
  जमावाने सिध्दीबाग परिसरातील एका टेलरिंग दुकानाची तोडफोड केली. दुकानाची तोडफोड करणारे समाजकंटक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*